चला शाळा बोलावतेय...

शिक्षण विवेक    16-Jun-2022
Total Views |

chala shala bolavtey 
सकाळपासून आद्या आनंदाने बागडत होती. जणू फुलपाखरांचे पंखच तिला मिळाले होते. आजी कौतुकाने तिच्याकडे पाहत होती. आद्याच्या आईला आजी म्हणाली, ‘आज आद्या खूप खूश आहे. अगदी हॅपी बर्थडेच्या दिवशी असते तश्शी!’ आद्याने ते ऐकलं आणि पटकन म्हणाली, ‘अगं आज्जी!, उद्यापासून माझी शाळा सुरू होणार! नवं दप्तर, नवी वॉटर बॅग आज आई घेऊन देणार. आज्जी, कोणत्या रंगाची घेऊ गं वॉटर बॅग? कार्टूनची चित्रं असलेली घेऊ की छानछान फुलपाखरांची?’ आद्याची आई ते ऐकून हसली. म्हणाली, ‘आद्या, किती वेळा विचारून झाले हे प्रश्न?’ आजी म्हणाली, ‘अगं, असते मुलांना उत्सुकता.. शाळा सुरू होणार म्हटल्यावर शाळेच्या वस्तूंविषयीच बोलावसं वाटतं त्यांना.’ हे ऐकलं आद्याने आणि पुन्हा एक छानसी टुणकन् उडी मारली सशासारखी! गाणं गुणगुणायला लागली -
‘कोणास ठाउक कसा, पण शाळेत गेला ससा ऽऽ’
दोस्तांनो, तुमच्याही मनात असाच आनंद असेल! मोठ्ठी सुटी संपली की, शाळेची ओढ लागते ना? नवं दप्तर, नवा गणवेश, नवीन वह्या, नवी पुस्तकं, शालेय नवीन वर्षात सगळं नवंनवं मनापासून हवं असतं. दोस्तांनो, नव्या वह्या-पुस्तकांना कव्हर 
घालणं हे एक मोठ्ठं काम असतं. तुम्हाला सांगू, तीसुद्धा एक कला आहे. आई-बाबा, आजी-आजोबा किंवा मोठा दादा-ताई तुम्हाला मदत करतात. कव्हर घालायला शिकवतात. तुम्हीसुद्धा ते मन लावून शिकलं पाहिजे. नाहीतर वह्या-पुस्तकं द्यायची मोठ्यांकडे, घालून द्या कव्हर असं म्हणायचं नि मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळत बसायचं. असं मुळीच करायचं नाही. तुम्ही स्वत: कव्हर घालणं शिकून घ्यायचं. दोस्तांनो, हे सगळं करतांना वह्या-पुस्तकांचा स्पर्श तुम्हाला आनंद देणारा असतो. नव्या पुस्तकात कोणकोणते धडे आहेत, हे बघण्याचीसुद्धा फार मोठी उत्सुकता असते. ही उत्सुकता ज्या मुलांना असते, त्यांची पुस्तकांशी दोस्ती होते. यंदाचा अभ्यास अवघड की सोपा असा प्रश्न त्यांना पडत नाही. फरक एवढाच असतो की, कुणाची मैत्री गणिताशी होते, कुणाची इतिहासाशी, कुणाची भूगोलाशी, कुणाची विज्ञानाशी, तर कुणाची कवितेशी; भाषा विषयाशी...
विद्यार्थी मित्रांनो, शालेय जीवनात ज्या विषयाची गोडी अधिक; त्या विषयात तुम्ही प्रावीण्य मिळवता. शाळा तुम्हाला सांगत नाही की, तुम्ही अमुकच व्हायला पाहिजे, तमुकच व्हायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शास्त्रज्ञ, पत्रकार, संपादक. शाळा तुम्हाला सगळं भरभरून देते. ते तुम्ही कशा प्रकारे आत्मसात करताय हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतं; आकलनशक्तीवर अवलंबून असतं. ती क्षमता, ती आकलनशक्ती वाढवण्यासाठी आपले शिक्षक आपल्याला मदत करतात, मार्गदर्शन करतात. यात आपल्या पालकांचाही सहभाग असतो.
शाळेचं नवं वर्ष सुरू होतं, त्या वेळी पावसाळ्याचीही सुरुवात होते. हा मोठ्ठा योगायोग वाटतो. पाऊस सुरू झाला की, सर्वत्र हिरवे-पोपटी लवलवणारे कोंब धरतीच्या कुशीतून बाहेर पडत असतात. तुम्हीसुद्धा शाळेसाठी घराबाहेर पडता. हिरव्या, कोवळ्या रोपट्यांना आपण जीवापाड जपतो. अगदी तसंच शाळा, तुमचे गुरुजन तुम्हाला जपत असतात. तुमची बौद्धिक वाढ व्हावी; म्हणून शाळा प्रयत्न करते. तर चौरस आहार तुमच्या डब्यातून तुम्हाला कसा मिळेल, याचा विचार आई करते. दोस्तांनो, शाळा सुरू झाली की तुम्ही छानछान रंगीत डबा आणि वॉटरबॅग मागता. आई-बाबा तुम्हाला आणून देतात. मग डबा संपवण्याची जबाबदारी तुमची, हो की नाही? जाहिरातीत दाखवलेल्या पदार्थांसाठी हट्ट न करता आईने प्रेमाने बनवलेले पदार्थ तुमचं आरोग्य चांगलं राखतात.
शाळा सुरू होणार असं म्हटल्याबरोबर शाळेचं दप्तर, वह्या-पुस्तकं, मित्र-मैत्रिणी यांची वाट तुम्ही पाहता; तसंच शाळाही तुमची वाट पाहत असते. शाळेचं ग्राउंड तुमची वाट पाहतं. वेगवेगळे मैदानी खेळ खेळायला शिकाच; पण त्याबरोबर खिलाडूपणाही शिका. ‘निरोगी शरीरात निरोगी मन राहते’, हा सुविचार तुम्ही ऐकला-वाचला असेल. या सुविचाराप्रमाणे आपण वागलो तर शाळेला, आई-बाबांना, गावाला, शहराला अभिमान वाटेल, असं आपण बनू शकतो. दोस्तांनो, शालेय नववर्षात नव्या नव्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. शाळा आदर्श कधी मानली जाते, तर ज्या शाळेत आदर्श विद्यार्थी असतात. यंदाचं शालेय नववर्ष सुरू होताना प्रतिज्ञा करू या, मी एक उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट माणूस, उत्कृष्ट नागरिक बनण्याचा प्रयत्न करीन. स्वच्छता आणि पर्यावरणाचं रक्षण करायला शिकवणारी माझी शाळाही उत्कृष्ट शाळा म्हणून विख्यात होईल. चला शाळा बोलावतेय...
‘या बाळांनो या रे या
आनंदाची बाग फुलवू या।’
- डॉ. प्रतिमा विश्वास, पुणे