एकदा भारी गंमतच झाली. झाडाला एक स्वप्न पडले. स्वप्नात झाडे माणसे झाली. झाडांनी जे-जे मनात ठरवले ती ते कृतीत उतरवू लागली. परिस्थिती एकदम बदलून गेली. माणसे एवढी कशी बदलली? असा प्रश्न सर्व प्राणी-पक्ष्यांना पडला. सगळी जीवसृष्टी आनंदून गेली. माणसांना धन्यवाद देऊ लागली.
नक्की काय घडले झाडाच्या स्वप्नात? माणसे झालेली झाडे निसर्गाचे नियम पाळू लागली. त्यांनी स्वत:ला एक नियम घालून घेतला. तो म्हणजे Be natural! Be local! Be seasonal! म्हणजे काय, तर -
माणसे झालेली झाडे नैसर्गिक वस्तूंचा वापर करू लागली. वसुंधरेला, जीवसृष्टीला घातक असे कोणतेही काम करायचे नाही, असे त्यांनी ठरवले. दैनंदिन व्यवहार निसर्गाच्या मदतीने पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले. दैनंदिन व्यवहार निसर्गाच्या मदतीने पूर्ण करू लागली. प्लास्टिकचा वापर टाळू लागली. निसर्गातूनच स्वत:च्या गरजा भागवू लागली. निसर्गातून घेतलेल्या गोष्टी निसर्गात जिरवू लागली. शाकाहाराचे नियम पाळू लागली. विषारी घटक टाळू लागली. झाडे, जंगले आनंदाने डोलू लागली. नद्या स्वच्छ झाल्या. आनंदाने खळखळू लागल्या. सर्व प्राण्या-पक्ष्यांना त्यांचे स्वातंत्र्य त्यंानी परत केले. निसर्गाच्या ओढीने निसर्गाकडे धावली. निसर्गही त्यांच्या मदतीला धावून आला. समृद्धीचा वर्षाव करू लागला. माणसे आता भरून पावली.
प्रत्येक प्रदेशातील भौगोलिक परिस्थिती जाणून निसर्गाचे संवर्धन करू लागली. ‘फॅशन’ म्हणून निसर्गातील ढवळाढवळ त्यांनी थांबवली. जिथे राहतो तिथले निसर्गचक्र जपू लागली. इतर सजीवांच्या हक्कांची जाणीव त्यांना झाली. सर्वांशी सन्मानाने वागू लागली. आपल्या परिसरातील जैवविविधता जपू लागली. डोंगर-टेकड्यांना कुरवाळू लागली. निसर्गाच्या अंगा-खांद्यावर पळू, खेळू लागली. आपल्याच शिवारात पिकवलेले अन्न खाऊ लागली. सर्वच मला हवे अशी हाव त्यांनी सोडली. निरोगी अन् उत्तम जीवन जगू लागली.
ॠतूचक्राचे भान आले. त्या-त्या ॠतूतील नैसर्गिक जिवांना सांभाळू लागली. निसर्गाचा समतोल सावरू लागली. सगळीकडे आनंदाचे वारे वाहू लागले. प्रत्येक जण त्यात न्हाऊन निघाला. झाडाला स्वप्नात दिसले, ‘खरंच माणसे शहाणी झाली. खरोखर असेच वागू लागली.’ झाडाला खूप आनंद झाला. त्याने सर्वांना आशीर्वाद दिला.
‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तू निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:ख भाग्भवेत्।’
चला तर नक्की ठरले. झाडाचे स्वप्न पूर्णच करायचे!
- सुनिता वांजळे
शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंवडवणे