‘कु कु च कू’ या आवाजामुळे सई झोपेतून उठली आणि इकडे, तिकडे बघू लागली. ‘‘हा कुठला अलार्म? वेगळाच आहे.’’ सई घड्याळ शोधू लागली, पण ते काही सापडेना. ‘आई, आई गं’ सईनं मोठमोठ्यानं आईला हाका मारायला सुरुवात केली. आठ, दहा खोल्या, मागचं, पुढचं अंगण सगळीकडे आईला शोधलं, परंतु आई कुठेच दिसेना. आता मात्र सई रडवेली झाली. ‘‘कुठे गेले घरातले सगळे जण?’’ सईच्या रडण्याचा आवाज ऐकून मोठ्या दगडी जिन्यातून आई धावतच खाली आली. आईनं सईला पोटाशी, हृदयाशी धरलं. ‘‘काय झालं बाळा? रडतेस का?’’ सई मुसमुसत म्हणाली, ‘‘अगं आई, वेगळ्या आवाजात अलार्म झाला आणि मी उठले. बघते तर घड्याळ नव्हतं आणि घरातही कुणीच नव्हतं. मला वाटलं, या आजीच्या घरात भूतबित आहे की काय? म्हणून मी घाबरून रडायला लागले.’’ यावरून आई खळखळून हसली. म्हणाली, ‘‘वेडाबाई, तो अलार्म नव्हता बरं! परसामधला कोंबडा आरवला. सूर्य उगवणार हे त्याला कळलं ना म्हणून. आणि आम्ही सगळे जण छतावर म्हणजे गच्चीवर आहोत. सूर्योदय बघण्यासाठी. तूपण चल.’’ फुलाफुलांचा सुंदर फ्रॉक घालून सई गच्चीवर गेली. बघते तर काय? आजी, मामा, मामी, मावशी, सर्व भावडं जमून लाल, पिवळं, केशरी आकाश बघत होती. आकाश खूप छान रंगांनी नटलं होतं. मामानं सईला कडेवर घेतलं आणि तो म्हणाला, ‘‘बघा, सईबाई आमच्या गावामधला बाळ सूर्य. तुमच्या शहरात हे दृश्य दिसायचं नाही.’’ सई कडेवरून उतरून धावत-धावत खाली गेली आणि चित्रकलेची वही, रंगीत खडू, पेन्सिल घेऊन आली. तिचे हात आणि डोळे सुंदर चित्र रेखाटू लागले. निळ्या आकाशात उमटलेेली रंगपंचमी आणि बाळासारखा दिसणारा लाल सूर्य. सईनं खूप छान चित्र काढलं. सर्वांनी तिचं कौतुक केलं. मग काय सईला छंद लागला. आजीच्या गावात दिसणारी बैलगाडी, नदी, नाव, शिंपले, हिरवीहिरवी झाडं, पिवळ्या निंबोण्या, कौलारू घरं, काळी मांजर आणि खूप छान नवनवीन चित्रं सई काढू लागली. सईला तिच्यापेक्षा छोट्या मनूनं विचारलं, ‘‘सईताई, ही चित्रे तू कुणाला दाखवणार?’’ तेव्हा सई म्हणाली, ‘‘मने, मी आता पहिलीतून दुसरीत जाणार ना? आता नवा वर्ग, नव्या टीचर, नवी पुस्तकं, नवे मित्रमैत्रिणी असतील ना? त्यांना दाखवणार आहे ही चित्रं. शहरामधल्या मुलांसाठी हे सगळं नवं असणार आहे.’’ आजोळी आलेली सई खूश होऊन आपल्या घरी परतली.
सईच्या आईनं सईच्या शाळेची तयारी जरा लवकरच सुरू केली. नवा युनिफॉर्म, नवे शूज आणि नवी कोरी छान छान पुस्तकं बघून सईला फार आनंद झाला. सईची आई पुस्तकांना सुबक व्यवस्थित कव्हर्स लावत होती. आई म्हणाली, ‘‘सई, या कोर्या पुस्तकांना किती छान वास येतोय बघ. सईनं तो गंध श्वासात भरून घेतला. नंतर ती आईला हळूच म्हणाली, ‘‘आई, तू मला पुष्कळ वस्तू नव्या घेऊन दिल्यास पण एक नवी गोष्ट मला हवी आहे.’’ ‘‘कोणती?’’, आईनं विचारताच सई आईच्या गळ्यात हात टाकून म्हणाली, ‘‘मला नं नवी स्कूलबॅग पाहिजे.’’ आई म्हणाली, ‘‘सई, हट्ट नाही करायचा. तू आता नव्या वर्गात जाणार. मोठी होणार. नव्या अभ्यास शिकणार. नव्या गोष्टी शिकणार. तुला दर वर्षी सगळं नवं नवं मिळतं, पण एक सांगू? आपल्या घरी काम करणार्या नंदामावशीच्या मुलीला नव्या वर्गात प्रवेश करताना दुसर्या मुलांनी वापरलेलं जुनं दप्तर, जुनी पुस्तकं, जुना गणवेश असंच वापरावं लागत.’’ ‘‘का बरं?’’ सईनं विचारलं. ‘‘तिचे आई-बाबा तिला नवंकोर का नाही घेऊन देत?’’, आईनं सईला नीट समजावून सांगितलं. ‘‘बरं का सई बेटा. तिचे आई-बाबा खूप कष्ट करतात. परंतु त्यांना जास्त पैसे मिळत नाहीत. नंदामावशींना दोन मुलं आहेत. त्यांची शाळेची फी आणि इतर खर्च ते करतात. आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. त्याची मुलं शहाणी आहेत म्हणून ती इतरांची जुनी पुस्तकं, बॅग, लंचबॉक्स हट्ट न करता वापरतात. या वर्षी मी ठरवलंय की, नंदामावशीच्या मुलांना नवी स्कूलबॅग घेऊन द्यायची. त्यांना एखाद्या वर्षी नव्या वस्तूचा आनंद घेऊन द्यावा. तुझी मागच्या वर्षी घेतलेली स्कूलबॅग अजून छान आहे, ती जर पुढे खराब झाली तर आपण नवीन घेऊ. चालेल ना तुला?’’
सईच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, ‘‘आई तू खूप गोड आहेस गं. रोज नव्या गोष्टी सांगतेस, शिकवतेस त्यामुळे मलासुद्धा नवंनवं झाल्यासारखं वाटतं.’’ सईला आईनं जवळ घेतलं
सई आणि तिची आई दुकानात गेल्या आणि नंदामावशींच्या मुलांसाठी छान स्कूलबॅग्ज घेऊन आल्या. त्या बॅग्ज बघून नंदामावशींची मुलं टाळ्या पिटत नाचू लागली. हे बघून सईला फार फार आनंद झाला आणि ही गोष्ट आपल्या नव्या मित्रमैत्रिणींना कधी सांगते असं तिला वाटलं. ती शाळेच्या पहिल्या दिवसाची वाट बघू लागली.
- स्नेहा शिनखेडे