पाऊस पडून गेला की...

23 Jun 2022 10:26:43

paus padun gela ki 
 
पाऊस पडून गेला की
आकाशात सुंदर इंद्रधनुष्य
उमलतं; त्याला पाहून मातीनं रुसावं का?
सगळे रंग आकाशात तसेच ठेवून आलास,
मला काय दिलंस म्हणून भांडाव का?
नाहीच भांडत ती,
मान्य करून टाकते की,
त्याचा रंगहीन होऊन आपल्याकडे येणं,
उगीच मनाला लावून घ्यायचं नाही,
त्या कोरड्या सुंदर रंगापेक्षा आपल्याला काय मिळालं हे पहायचं..
तो भरभरून बरसतो, तेव्हा रंगहीन असतो हे खरं;
पण तो तिला जगण्याची, उमलण्याची,
स्वतःतून रंग फुलवण्याची जादू देतो.
त्या जादूनं,
काळया मातीतून किती रंग उमलतात,
आणि रंगच कशाला, किती गंध, किती आकार,
किती प्रकारच जगणंही बहरत!
क्षणभर उजळणार्‍या रंगापेक्षा
स्वतः अनेक रंगांत उमलण्याची जादू
म्हणून तर काळया मातीला
किती युगं झाली, हवीच असते त्याच्याकडून
जगण्याचा तोल हा असा असतो,
कुणाला क्षणभराचे रंग मिळतात,
कुणाला सुंदर क्षण मिळतात,
कुणाकडे जग सहज मान उंचावून पाहतं,
तर कुणाला मिळतं फक्त जगण्याचं बीज.
त्यातून आपापल फुलायची जादू मात्र शिकून घ्यायची असते.
एकदा ती जादू आली की,
रंग कुणाकडे मागावे लागत नाहीत,
ते उमलत राहतात,
बहरत राहतात...
येत्या पावसाळ्यात ही जादू आपल्यालाही शिकता येईल....
- स्वप्नील नंदकुमार गोंजारी, सहाय्यक शिक्षक,
म.ए.सो.चे कै. ग.भि देशपांडे माध्यमिक विद्यालय व
उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती
Powered By Sangraha 9.0