चुकीचं फळ

शिक्षण विवेक    29-Jun-2022
Total Views |

chukicha fal
 
आजीने फुंकणीने चूल फुलवली तसे आतले निखारे रसरसून फुलले आणि त्यांची लालकेशरी आभा आजीच्या चेहर्‍यावर पसरली. आजीचा प्रेमळ चेहरा अजूनच प्रेमळ दिसू लागला. तिने तव्यावरची फुगलेली भाकरी अनिशच्या ताटात वाढली, तसा त्याचा चेहरा ती खरपूस भाकरी बघून अजूनच उजळला. त्याने जेवताना हट्टाने आजीजवळची जागा पटकावली होती. आजीची इतर नातवंडं म्हणजे सायली, समीर आणि इशा अनिशच्या मांडीला मांडी लावून जेवायला बसली होती आणि ताटातल्या भाकरी आणि वांग्याच्या भाजीचा मस्त आस्वाद घेत होती. त्यांचे आई-वडील एकदा आपल्या आईकडे आणि एकदा मुलांकडे कौतुकाने बघत होते. जवळच खाली जमिनीवर आबा ऐसपैस मांडी घालून सगळ्यांचे फुललेले चेहरे न्याहाळत बसले होते.
आबा आणि आजीला यामुळेच मे महिना खूप आवडायचा. वर्षभर ते दोघेच-दोघे शेतात आणि घरात कष्ट करत वाट पाहायचे ते याच दिवसांची. मे महिना आला की, मुलगा रवी आणि मुलगी सुकन्या मुलांना सुट्टीसाठी घेऊन यायचे आणि आबा-आजीला घर अगदी भरून गेल्यासारखं वाटायचं. शाळकरी वयातल्या नातवंडांच्या करामती पाहून त्यांचं मनही भरून जायचं. शिवाय मुलांनाही शहरातल्या त्याच त्या वातावरणातून बाहेर पडून गावी आल्यावर एकदम मोकळं वाटायचं. नुकतीच वार्षिक परीक्षा देऊन आल्यामुळे शाळेची, अभ्यासाची चिंता नसायची. मग आजी-आबांनी कष्टाने फुलवलेल्या शेतात दिवसभर हुंदडायचं, शेतातल्या विहिरीवर जाऊन एकमेकांवर पाणी उडवून मस्त धिंगाणा घालायचा आणि बांधावरच्या झाडांवर चढून मस्त चिंचा, कैर्‍या पाडायच्या. यात आला दिवस कसा संपायचा ते कळायचंही नाही. रवी, सुकन्याला आपल्या जुन्या घरात आपले बालपणीचे ठसे सापडायचे आणि लहानपणीच्या आठवणीत ते रंगून जायचे. दिवसभर मुलांवर लक्ष ठेवावं लागायचं पण ते करताकरता ते मुलांमध्ये मूल होऊन कधी खेळू लागायचे हे त्यांचं त्यांनाही कळायचं नाही.
अनिशने जोराचा ढेकर दिला आणि बाकी नातवंडं खुदूखुदू हसू लागली. आजी-आबाही गालातल्या गालात हसू लागले. ‘चला, अनिशबाबा, झालं ना पोटभर? आता उठा. आम्ही बसतो आता जेवायला...’ अनिशच्या आईने - सुकन्याने - प्रेमाने त्याला दटावले, तेव्हा तो रिकाम्या झालेल्या ताटाकडे नुसताच बघत राहिला. त्याच्या आईला काहीच कळले नाही. त्याने एक नजर बाजूला बसलेल्या आबांकडे टाकली तेव्हा आबा त्याच्या मनातलं ओळखून हसत म्हणाले, ‘अवं, आता तर फकस्त जेवन झालं, आता त्याला आंब्याच्या फोडी नगं द्यायला?’
‘नाही हा बाबा, दुपारीच मस्त चार वाट्या आमरस खाऊन झालाय त्याचा, आता रात्री नको परत आंबा...’
‘असं कसं पोरी? घरचं आंबं हैत, बाधणार नाह्यत. खाऊ दे की भरपूर...’ असं म्हणत आतल्या खोलीत पिकायला ठेवलेले आंबे आणायला आबा लगबगीने उठलेसुद्धा.
सुकन्याने लटक्या रागाने अनिशकडे पाहिलं तर, त्याने मुद्दाम तोंड फिरवून आजीकडे बघायला सुरुवात केली. त्याचे हे विभ्रम बघून आजी गालातल्या गालात हसू लागली. अनिशने समोर पाहिले तर, ताटात आबांनी चिरलेल्या आंब्याच्या रसरशीत, केशरी फोडी त्याची वाट बघत होत्या. त्याने लगेच त्यातली एक फोड उचलली आणि तो मिटक्या मारत ती खाऊ लागला. तोपर्यंत बाकीच्या नातवंडांच्या ताटातही आंब्याच्या दोनदोन फोडी येऊन पडल्या होत्या. ‘पण आबा, इतकी गोड आंब्याची झाडं तुम्ही कधी लावली हो?’ सायलीने हातातली फोड चाखत आबांना विचारले.
‘अगं पोरी, चुकीचं फळ हाय त्ये...’ असं म्हणत गालातल्या गालात हसत आबा रवीकडे पाहू लागले. रवीही थोडा ओशाळवाणा होऊन त्यांच्याकडे पाहून हसू लागला.
‘सांग की तूच रवी समद्यास्नी’ मुलांच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह पाहून आबा त्याला म्हणाले.
‘हे काय हो बाबा?’, रवी अजूनच ओशाळता होत म्हणाला.
‘आरं, सांग, सांग... आता इतक्या वर्षांनी लाजतूयास व्हय?’ आबांनी परत त्याला टोकले. मग नाईलाज झाल्याने रवी बोलू लागला..
‘लहानपणी मी तसा हुशार होतो. पहिल्या पाचात असायचा माझा नंबर, पण एकदा काय झालं एका परीक्षेला माझा अभ्यास काही कारणाने कमी झाला होता आणि पेपरही खूप अवघड आला होता. पेपर थोडा लिहून झाल्यावर पुढचे काहीच येईना. मग रडकुंडीला आलो आणि ते पाहून माझ्या पुढे बसलेल्या माझ्या मित्राने त्याच्या पेपरची पुरवणी बाजूला ठेवून मला ती पाहून लिहायला सुचवले. तोपर्यंत मी कधीच कॉपी केली नव्हती, पण आपण नापास होऊ का काय या भीतीने मी त्याचे बघून लिहायला सुरुवात केली. नेमके त्या वेळेस सरांनी मला कॉपी करताना पकडले व माझा पेपर काढून घेऊन मला घरी पाठवले. घरी लवकर आल्यावर माझा उतरलेला चेहरा पाहून बाबांनी काय झालं ते विचारताच मी घडाघडा घडलेलं सगळं सांगून टाकलं. त्या वेळी आम्हा दोघांना बाबांचा खूप धाक होता, अभ्यासाच्या बाबतीत तर जास्तच. म्हणून हां, आता हात पुढे कर.. असे बाबा म्हणल्यावर आता ते खूप मारतील या भीतीने मी डोळे गच्च मिटून उभा होतो. पण हाताला ओल्या प्लास्टिकचा स्पर्श झाल्यावर मी गोंधळून डोळे उघडले तर हातात एक नाजूक रोपटं होतं. मी तसंच बाबांकडे पाहिलं तर ते म्हणाले, ‘चूक केलीस न्हवं? मंग शिक्षा म्हणून हे आंब्याचं रोपटं आपल्या शेतात बांधावर मी म्हणीन तिथं लावाय पाइजेस... काय? आणि निस्तं लावायचं नाय तर ते मोठं हुईस्तवर त्याची चांगली काळजी घ्यायची.. अन् नीट अभ्यास करायचा... असं पुना कदी करायचं नाय.. काय?’ मी मान हलवली आणि त्यांनी सांगितलं तिथे ते आंब्याचं झाड लावलं’ रवी बोलायचा थांबला.
‘हां, तर पोरांनो जो आंबा तुमी आता खाल्ला ते या झाडाचं फळ बरं का ! हाय की नाय चुकीचं फळ गोड?’ आबा सवयीने मान डोलावत म्हणाले. यावर सगळेच खुदूखुदू हसू लागले.
‘परीस दुपारच्या कडक उन्हात याच झाडानं तुमाला सावली दिली न्हवं? अन् ए सुकन्या, तू नगं जास्ती हसूस.. नायतर मंग दुपारी पोरांनी खाल्लेल्या फणसाची गोष्ट तुला सांगावी लागेल,’ आबा म्हणाले तशी आता सुकन्या गोरी मोरी होऊन इकडे-तिकडे बघू लागली. सगळे आता तिच्याकडे संशयाने बघू लागले.
‘आबा.. आबा..’ दुपारी हातपाय न धुता अनिश जेवायला बसला आणि आईने हातपाय धुवून यायला सांगितल्यावर आईवर ओरडला. सायलीने संधी साधून भावावर निशाणा साधला.
‘आबा, त्यालाही द्या ना चुकीची शिक्षा..’ इशाने आगीत तेल ओतत म्हटलं आणि सगळेच अनिशच्या गोंधळलेल्या चेहर्‍याकडे बघून हसू लागले.
उमेश पटवर्धन