रसास्वाद संगीताचा

शिक्षण विवेक    29-Jun-2022
Total Views |

rasaswad sangeetacha
संगीत हा असा विषय आहे ज्याचा आस्वाद कोणत्याही वयात घेता येतो. खर तर आपल्या नकळत याचा आस्वाद आपण आपल्या अगदी पहिल्या दिवसापासून घेतच असतो, जेव्हा आई आपल्याला अंगाईगीत गाऊन झोपवायची, तेव्हाच खरी आपल्या संगीत आस्वादाची सुरुवात झाली आणि आपण तिला दादही दिलेली असते, शांत झोपून. आपण देवाला जी आरती म्हणतो किवा रोज जे शुभंकरोती म्हणतो त्याला एक सूर लय आणि चाल असते...हो की नाही.. म्हणजे हे सूर आणि लय सगळ्या गोष्टींमध्ये असतातच. अगदी निसर्गातही हा सूर आणि लय आहे. पानांची सळसळ, भुंग्याचा गुंजारव, नदीच्या खळखळून वाहण्याचा आवाज जो आपल्यात उत्साह निर्माण करतो..या संगीताचा आस्वाद तर आपण सहज घेऊ शकतो निसर्गाच्या सानिध्यात राहून..खरं तर आपल्या नकळत्या वयात ज्या गोष्टी आपल्यासमोर घडतात, आपण जे पाहतो, ऐकतो त्याचा आपल्यावर खूप जास्त पगडा असतो अगदी आयुष्यभर. म्हणजे खरे तर मुलांनी चांगले संगीत ऐकावे असे वाटत असेल तर जन्माला आल्यापासूनच त्याला चांगले संगीत ऐकवले तर त्याची अभिरुचीच अशी बनते की ते मोठेपणी सुद्धा आपोआपच चांगलेच संगीत ऐकते.
आता संगीत अनेक प्रकारचे असते. आपल्या भारतीय संगीत पद्धती ज्या आहेत त्या अतिशय उच्च प्रकारच्या आहेत. आपण जे शास्त्रीय संगीत ऐकतो तो अभिजात संगीत प्रकार आहे. संगीताचा कोणाच्याही आयुष्यात जो खरा हेतू असतो की, संगीत ऐकल्यावर आनंदी वाटावं, एक चेतना निर्माण व्हावी, मन शांत व्हावे तर ते सगळं हे शास्त्रीय संगीत ऐकल्यावर मिळत. शास्त्रीय संगीत हे नुसते गाणे नसून तो एक संस्कार आहे. याचा आभ्यास करणार्‍या मुलांना शालेय आभ्यासात देखील चांगले यश मिळते असे आढळले आहे. याचे कारण या संगीतामुळे लक्ष केंद्रित होते व मन शांत राहते.
आता कोणकोणते संगीत प्रकार ऐकू शकतो बर आपण? आणि याचा आस्वाद कसा घेता येईल? जर शास्त्रीय संगीत आवडत असेल तर उत्तमच. वेगवेगळया गायकांची गायकी ऐकून पाहावीत व आपल्याला जी भावते आवडते समजते त्या गायकांच्या इतर रागांचा संच साठवावा व रोज ते ऐकावे. आता आभ्यासात जर ऐकण्याला वेळ मिळत नाही असे जाणवले तर झोपताना ऐकावे. सकाळी उठल्या उठल्या ऐकावे. ते गाणे नुसते घरात लावून जरी ठेवले तरी ते कानावर पडत राहते आणि मग ते स्वर दिवसभर मनावर रुंजी घालत राहतात. मग आपले आवडते राग ऐकावेत. तो राग वेगवेगळया गायकांचा ऐकावा. शास्त्रीय संगीत गायची व ऐकायची आवड असणार्‍यांची अभिरुची वेगळी असते. या संगीत प्रकारात लयीचा रसास्वाद फार उत्तम प्रकारे घेता येतो. गाणे शिकायची इच्छा असणार्‍यांनी सुरुवात ही शास्त्रीय संगीतापासूनच करावी. हे संगीत शिकल्यावर तुमची अशी तयारी होते की, तुम्ही नंतर कोणताही संगीत प्रकार गाऊ शकता. गाऊन या संगीताचा रसास्वाद अतिशय उत्तम पद्धतीने घेता येतो व तो मनाला वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. म्हणून गाता आले तर उत्तमच. नाही तर ऐकणे हा एक चांगला संस्कार आहेच.
अभंग हा असा संगीताचा भाग आहे ज्यातून मनाला खरच आनंद मिळतो व शांतता मिळते. ज्यांना शास्त्रीय ऐकता गाता येत नाही त्यांनी अभंग गाऊन ऐकून तल्लीन होऊन रसास्वाद घ्यावा. अभंगामध्ये कोणतीही चढाओढ नसते. तो गाताना जर मृदुंग साथीला असेल तर वेगळाच माहोल तयार होतो. म्हणून यातून मनाला ऐकून गाऊन शांतता नक्कीच मिळेल.
तसाच शास्त्रीय संगीताच्या जवळ असणारा संगीत प्रकार म्हणजे नाट्यसंगीत. या संगीत प्रकारातून देखील वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि जर संगीत नाटक पाहायची संधी मिळाली तर याचा रसास्वाद खर्‍या अर्थाने घेता येईल.
सुगम संगीत हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. ज्यांना आजिबातच शास्त्रीय वगैरे आवडत नाही पण गाणं आवडतं त्यांच्यासाठी हा संगीत प्रकार म्हणजे परवणी. वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या भाषांमधील ही गाणी खरच आनंद देऊन जातात. ती गाताना जो वाद्यवृंद साथीला असतो त्यामुळे गाताना व ऐकताना खर्‍या अर्थाने आस्वाद घेतल्याचा आनंद होतो. गझल हा सुद्धा अतिशय रसाळ संगीत प्रकार आहे.
एक असा छान संगीत व नाट्य याच मिश्रण असं म्हणता येईल. असा एक प्रकार ज्याचा रसास्वाद पिढ्यान्पिढ्या आपण घेत आलो तो म्हणजे कीर्तन. कीर्तन हा खरच रसास्वाद घेण्याचा प्रकार आहे. ज्यात आपल्याला लय ताल सूर भाषा नाट्य या सगळ्याचा एकत्रित आनंद घेता येतो. शिवाय कीर्तन हे गोष्टीरूप असल्याने ते सर्वाना समजू शकते. आपल्याला त्यातून अनेक गोष्टींची माहिती होते. कीर्तन लहान मुलांना शिकवणार्‍या संस्था सुद्धा आहेत जेथे महिन्या भराचे सुद्धा वर्ग घेतले जातात. तेथे सुट्टी मध्ये मुलांना कीर्तन शिकता येईल व त्याचा खरा रसास्वाद घेता येईल.
कंठ संगीताबरोबर वाद्य संगीत हा एक सुंदर प्रकार आहे. कधी कधी सुरांची तालाची जाण असते परंतु गळ्याने गाता येत नसते. मग अशा लोकांना वाद्य मात्र अतिशय उत्तम वाजवता येऊ शकते. वाद्य भरपूर आहेत. तबला शिकता येईल. सतार, हर्मोनिअम, मेंडोलीअन, बासरी, व्हायोलीन अशी अनेक वाद्य आहेत ज्याचा अभ्यास करता येईल व आपल्याला त्याचा आयुष्याभर रसास्वाद घेता येईल.
शेवटी संगीत ही बळजबरी करण्याची लादण्याची गोष्ट आजिबात नाही. ती मनापासून आतून वाटायला हवी. परंतु संगीताबरोबर आयुष्याचा प्रवास हा अतिशय आनंदाने भरलेला उत्साही कलात्मक क्रियात्मक व निर्मितीचा आनंद देणारा होतो. व संगीतामुळे आपल्या व्यक्तीमत्वात देखील अतिशय चांगल्या गुणाची भर पडते. म्हणून प्रत्येक माणसाने विशेषतः शाळेतल्या मुलांनी कोणत्याही संगीत प्रकारातून गाऊन ऐकून वाद्य वाजवून हा संगीताचा रसास्वाद नक्की घ्यावा व आनंद तरंग मिळवावेत.
- श्रुती देशपांडे