कठीण समय येता कोण कामास येतो ह्या श्री समर्थ रामदास स्वामींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर असेही होऊ शकते की, कठीण समय येता सकारात्मक दृष्टिकोन कामास येतो. होय, सकारात्मक दृष्टिकोन कठीण समयी कामास येतोच, त्याशिवाय आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी कामी येतो.
अनुकूल परिस्थिती असताना कोणीही आनंदी व सकारात्मक असतो. त्या वेळी सर्व काही सुरळीत व्यवस्थित चालू असते. मात्र प्रतिकूल परिस्थितीत माणसाचे मन विचलित होऊ लागते. मनात नकारात्मक भाव जोर धरू लागतात. अशा नकारात्मक विचारांचा सूक्ष्म विपरीत परिणाम मनावर आणि तब्येतीवर होत असतो. चेहर्यावरील हास्य जाऊन चेहरा चिंताक्रांत होतो. माणसाचा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा त्याचे मानसिक खच्चीकरण होते. तो आशा, उमेद हरवून बसतो. अगदी हतबल होऊन दुःख करत बसतो. अशा प्रसंगी बाहेरून कोणीही कितीही सांत्वन केले तरी त्याचे मन उभारी घेऊ शकत नाही. केवळ सकारात्मक विचार आणि भावना हेच त्याला नवी आशा, नवा उत्साह देऊ शकतात. ‘जिंदगी की यही रीत है, हार के बाद भी जीत है’ हा सकारात्मक विश्वास माणसाला पुन्हा उठून लढायला, परिस्थिती पुन्हा अनुकूल करायला साहाय्य करतात. सकारात्मक दृष्टिकोनामुळे माणसाला स्वतःला जगण्याचे बळ मिळतेच, परंतु इत्तरांनाही त्यामुळे प्रोत्साहन मिळते.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे नक्की काय करायचे हे अनेकांना समजत नाही. आणि ते साहजिक आहे. कारण मानवी मनाचा उपजत कल हा नकारात्मकतेकडे अधिक असतो. एखाद्या सुखद, चांगल्या घटनेपेक्षा दुःखदायक, वाईट घटना मनात दीर्घकाळ टिकून राहतात. दुःख कुरवाळत नशिबाला दोष देत रडत बसणारे जगात कितीतरी लोक सापडतील. एखाद्या उत्कृष्ट विनोदावर लोक एकदा किंवा दोनदा हसतात आणि नंतर विसरून जातात. मात्र अपमान, राग, भांडण तंटे जीवनभर लक्षात ठेवतात. नकारात्मकता हा तर मनाचा स्थायीभाव आहे. तरीही सकारात्मक विचार मनाला हळूहळू बदलू शकतात. सकारात्मक विचारांनी जी ऊर्जा मनाला लाभते. त्यामुळे मनशक्ती वाढते. एकदा का मनशक्ती वाढू लागली की त्या जोरावर मनुष्य असाध्य वाटणारे कामही सहजसाध्य करू शकतो.
प्राचीन काळापासून हिंदू धर्मात मूर्तिपूजा केली जाते. देवाची पार्थिव म्हणजे मातीची किंवा पाषाणाची मूर्ती हे सकारात्मकता वृद्धिंगत होण्याचे एक साधन आहे. मूर्तिपूजेमागे हेच शास्त्र असावे. मनाच्या उपजत नकारात्मक स्वभावामुळे मनुष्य भगवंताच्या मूर्तीमध्ये सकारात्मकता शोधत असतो. प्रतिकूल परिस्थितीतही आपला देव, आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे, तो आपले रक्षण करील, त्याला आपली काळजी आहे, तो जे करेल चांगलेच करेल असे अनेक सकारात्मक भाव भक्त आपल्या भगवंताच्या मूर्तीमध्ये नकळत संप्रेषित करत असतो. भक्तांच्या सकारात्मक भक्तिभावामुळेच त्या पार्थिव पाषाण मूर्तीमध्ये सकारात्मक लहरींचे प्रकटीकरण होते. तीच सकारात्मक ऊर्जा भक्ताला सकारात्मक जगण्याचे बळ देते. त्यालाच आपण परमेश्वर असे म्हणतो. परमेश्वराकडे नकारात्मक असे काही नाही. सकारात्मक देवतांनी नेहमीच नकारात्मक राक्षसांचा वध केलेला आहे. त्याचाच अर्थ असा की सकारात्मकता नेहमीच नकारात्मकतेवर विजय मिळवते. हिंदू धर्माप्रमाणे इतरही सर्व धर्म आणि संप्रदाय हे त्यांच्या अनुयायांना सकारात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्याची शिकवण देतात. प्रार्थना मग ती कोणत्याही धर्मातील आणि कोणत्याही देवाची केलेली असो त्यामुळे मनात सकारात्मक भाव निर्माण होतो. अर्थात हे सर्व विवेचन धार्मिक किंवा वैज्ञानिक आधारावर नसून केवळ मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले आहे.
सकारात्मकता वाढण्यासाठी प्रत्येक वेळी देवाधर्माचाच आधार घ्यावा लागतो असे नाही. आपल्या जीवनात घडणार्या प्रत्येक घटना ह्या केवळ आपल्या चांगल्यासाठी, भल्यासाठीच घडत असतात हा भाव मनात असला म्हणजे सकारात्मक विचार निर्माण होतात. जे वाईट झाले ते झाले, मात्र आता जे पुढे होणार आहे ते चांगलेच होणार आहे. माझ्याकडून योग्य तेच झाले पाहिजे, ज्या चुका मी केल्या त्या पुन्हा माझ्याकडून होऊ देणार नाही, माझ्यात जे गुण कमी आहेत ते वाढविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन असे विचार सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतात. मग अशा सकारात्मक विचार ऊर्जेने समृद्ध मनुष्य राखेतूनही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा आकाशात झेप घेण्यास समर्थ होतो.
जगात ज्या ज्या काही चांगल्या घटना घडतात, जे वैज्ञानिक शोध लागतात आणि जे युद्ध जिंकले जातात त्यामागे त्यांचा केवळ सकारात्मक दृष्टिकोन असतो म्हणून त्या यशस्वी होतात. ‘आजारी रोगी माणूस जितका औषधोपचाराने बरा होतो तितकाच आपण रोगावर मात करू आणि लवकर बरे होऊ’ ह्या सकारात्मक विचारानेही बरा होतो. सकारात्मक दृष्टिकोनामुळे माणसाला विश्वास आणि साहस ह्या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात. त्यामुळे कितीही प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्याचे धैर्य प्राप्त होते. सकारात्मकता माणसाची स्वप्ने साकार करते. सकारात्मक व्यक्ती नेहमी आनंदी, प्रसन्न आणि प्रफुल्लित दिसतात. त्यांच्या चेहर्यावर नेहमीच स्मितहास्य असते.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून केलेले प्रत्येक कार्य आपल्याला यशाच्या मार्गावर आत्मविश्वासाने चालायला साहाय्य करते. म्हणूनच नेहमी आनंदी राहण्यासाठी नकारात्मकता नाकारा आणि सकारात्मकता स्वीकारा. माझे हे लेखन सर्वांना नक्कीच आवडेल ह्या ‘सकारात्मक दृष्टिकोना’तून मी लिहिला आहे.
- तुषार संजय राणा, पालक
नवीन मराठी शाळा, पुणे