निसर्ग माझा सखा

शिक्षण विवेक    14-Jul-2022
Total Views |

nisarg maza sakha 
 
नमस्कार मित्रांनो,
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’, म्हणणार्‍या संत तुकाबारायांचे आपण वंशज. ही जमीन, हे आकाश, हे पाणी सारं सारं त्या परमेश्वराने आपल्यासाठी तयार केले आहे आणि त्या परमेश्वराचा मी खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी मलाही देऊ केले आहे.
ताई, मामा, काका, काकू
अनेक मजला नाती असती
पण या सर्वांहून जगात सुंदर
निसर्ग माझा सखा-सोबती,
निसर्ग माझा सखा-सोबती.
हो, निसर्ग माझा सखा आहे. सखा म्हणजे बरं का अगदी जवळचा मित्र अगदी कृष्ण, अर्जुनासारखा. अगदी तसाच. पूर्वीचा मानव निसर्गाचा सखा होता. तो निसर्गावर जिवापाड प्रेम करत होता. आपले सण-समारंभ सारे निसर्गाला गृहीत धरूनच साजरे होत होते आणि आजही आपण तेच उत्सव, तेच सण साजरे करत असतो ना? मग पूर्वीच्या मानवाचा निसर्ग सखा आजही तुमचा, माझा, आपणा सर्वांचा सखाच नाही का?
सखा म्हणजे जो नित्य, नेहमी आपली सोबत करतो. चांगल्या गोष्टींचे संस्कार करतो आणि चुकल्यावर प्रसंगी आपले कान धरतो. जसे सूर्याला आपण आपले भरणपोषण करतो म्हणून आपण त्याला मित्र म्हणतो तसेच निसर्गाचेही आहे.
संत ज्ञानोबा म्हणतात, ‘जो जो जयासी घेतला मी गुण त्यासी गुरू केला, मी जो जो मी जाण’. अगदी तसंच या निसर्गाने मला भरभरून दिले आहे आणि देत आहे. ही हवा म्हणजे आपल्या सर्वांचा प्राणवायू. कल्पना करा हवाच जर नसेल तर आपला श्‍वास तरी चालेल का? हे प्राणी चराचर हवे शिवाय व्यर्थ नाही का? निसर्गातील जमीन जी सस्यश्यामल आहे. जिच्यायोगे शेतकरी बांधव शेती पिकवतात आणि तेच धान्य आपले उदरभरण करते तीच जमीन, ते पाणी निसर्गाचाच अविभाज्य घटक आहे.
आपल्या आजूबाजूचे पर्वत, नद्या, झाडे, लता, वेली आपल्या नेहमीच उपयोगी पडतात. वृक्ष तर आपणा सर्वांचे उपकारकर्तेच. अगदी शुद्ध हवेपासून ते फुलेफळे स्वत:चा अवयवही आपल्यासाठीच देतात. महत्त्वाचे म्हणजे जेथे मला छोटी-मोठी सर्दी, खोकला होतो, तेव्हा माझी आजी मला अडुळसा, कोरफडीसारख्या वनस्पतींचा काढाच देते आणि माझा आजार कुठल्या, कुठे पळतो.
सूर्य, चंद्र, तारे, ग्रहगोल हेसुद्धा निसर्गाचाच भाग आहे. नित्यनेमाने ते उगवतात आणि जग सुखी करत असतात. त्याचं हे उगवण्याचं वेळापत्रक मला फार आवडत. आई म्हणते सूर्य उगवता मग मला प्रश्‍न पडतो. त्याला कोणी उठवलं असेल. नित्यनेमाने त्याचं वेळापत्रक कसं असेलं आणि या विचारातूनच मी वेळेच नियोजन शिकतोय पावसाळा, उन्हाळा, हिवाळा हे सृष्टीचं वेळापत्रक निसर्ग मित्रानेच दिले आहे. म्हणूनच मी त्याचा आभारीही आहे.
निसर्ग मित्राला हे असे आभार मानलेले आवडणार ही नाही. पण त्याची एक खंत मात्र जरूर असेल मानवाच्या हव्यासापायी तुटणारी वृक्षराजी, प्रदूषित होणार पाणी, कारखान्यातील धूर, सांडपाणी सारं सारं त्याच्या जिवावर येते आहे आणि या मित्राला प्रदूषण सोसावलं नाही की, तो कधीतरी आपला रागही व्यक्त करतोच आणि यातूनच मग ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, भूकंप, वादळ, त्सुनामी येतात आणि त्याचा रुद्रावतार पाहिला की, त्याच्या सामर्थ्याची कल्पनाही येते. केवढा ताकतवान निसर्ग आहे, याची साक्षही पटते. परंतु मित्रांनो, तो त्याचा राग लगेच गिळतोही त्याचा रागवण्यामागचा उद्देश केवळ मानवाला त्याची चूक कळावी हाच असतो बरं का? जसं आपली काही चूक झाली की आई आपला कान पकडते ना? अगदी तसंच.
माझं चालणं, बोलणं अगदी काव्य करणं या निसर्गाच्या सान्निध्यात झालं आहे. पडणार्‍या पावसाच्या थेंबात मी आनंदाने खेळतो, कागदाच्या होड्या सोडतो. जंगलात गेल्यावर मला आनंद मिळतो नदीकाठी, समुद्रकाठी पाण्याचं संगीत ऐकू येतं आणि निळेभोर आकाश मला समतेची, समानतेची शिकवण देत. हा निसर्ग त्याचे रंगही ऋतूनुसार बदलतात. कधी हिरवीगार तर कधी निळाशार. या निसर्गाची किमयाच न्यारी आहे. सदासर्वदा तो मला सोबत करतो. माझ्यावर संस्कार करतो. मला नवनवीन गोष्टींची शिकवण देतो. तो माझा गुरू तर आहेच, पण माझ्या जीवनातील खराखुरा सखा, मित्र, सोबती आहे आणि या मित्राशी मी ही मित्रासारखाच राहणार आहे. कधी म्हणजे कधीही त्याची हानी होणार नाही, त्याला दु:ख पोहोचणार नाही असाच वागणार आहे. कारण मित्र हा मित्रच असतो. तो सखा असतो आणि कायमचा सोबती असतो. आणि निसर्ग हाच माझा सखा-सोबती आहे. याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मला म्हणावे वाटते —
सप्तसुरांची लेवूनी वचने
गीत निसर्गाचे मी गाणार आहे
होय निसर्ग माझा सखा,
निसर्ग माझा सखा-सोबती आहे.
अशा या माझ्या मित्रासाठी मीही काही करणार आहे. मी झाडं लावेन, झाडं जगवीन, हवा, पाण्याचे प्रदूषण कधीच करणार नाही. फटाके, रासायनिक रंग कधीच वापरणार नाही. ज्यायोगे माझा मित्र दु:खी होईल असे. वर्तन मी करणार नाही आणि हो माझी आता सर्वांना विनंती आहे की, माझ्या या निसर्गनायक मित्राला जेव्हा सुखी करता येईल तेवढंच तुम्हीही करा. तुम्ही हे करणार अशी माझी खात्री आणि विश्‍वासही आहे.
- अजित मा. शेडगे