आठवणीतला पाऊस...!

शिक्षण विवेक    02-Jul-2022
Total Views |
 
athavanitala paus
 
पाऊस आला रे आला।
धारा झेला रे झेला॥
झाडे झाली हिरवी गाणी,
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला,
पाऊस आला रे आला
कवीवर्य मंगेश पाडगावकरांनी पावसाच्या आगमनाने निसर्गात येणार्‍या चैतन्याचे छान शब्दात वर्णन केले आहे. पाऊस येताना खूप काही घेऊन येतो. पाना-फुलांपासून, पशू, पक्षी, डोंगरदर्‍या अशा सूर्याच्या रुद्रावताराने त्रासलेल्या पृथ्वीतलावरील सर्वांनाच नवसंजीवनी देतो. त्यांच्यामध्ये जगण्याची चेतना निर्माण करतो.
पाऊस वर्षांनुवर्षेपडतोय. मात्र तो अनुभवण्याची पद्धत बदलतेय. लहानपणी पावसाच्या आगमनाने उघडबोडके डोंगर हिरवेगार झाले की, मन हरखून जायचे. निसर्गाच्या किमयेचे आश्‍चर्य वाटत राहायचे. पहिला पाऊस पिऊन तृप्त, बेधुंद झालेल्या धरणीमातेच्या समाधानरूपी सुवासाने वातावरण प्रसन्न व्हायचे. बर्‍याच काळाच्या विश्रांतीनंतर शेतकरी लगबग करताना पाहायला मिळायचा, नांगर डोक्यावर घेऊन बैलांची वेसण धरून शेतावर निघताना होणारा घुंगरांचा आवाज कानात घुमायचा. पावसाच्या आगमनाने उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्याचीही जाणीव व्हायची आणि मन थोडं दु:खीही व्हायचे. सुट्टीत गावाला आलेले मित्र, नातेवाईक शहरात परत येत असताना गहिवरून यायचं. पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायची. नवीन वह्या-पुस्तकांचा तो एक वेगळाच सुगंध मनावर फुंकर घालायचा. नव्या जोमाने शेतावर जाणार्‍या शेतकर्‍यांचा उत्साह, शाळेत जायचा हुरूप वाढवायचा. पहिला पाऊस पडल्यानंतर काही दिवसातच पसरलेल्या हिरव्या मनमोहक गालिचांकडे पाहून उन्हाळ्यातील रखरखीत ओसाड प्रदेशातून स्वर्गात आल्याचा आभास व्हायचा. कागदाच्या बोटी बनवून अंगणात सोडताना, त्या बोटीचे हेलकावे अजूनही डोळ्यांसमोर तरळतात.
आता मात्र शहरांमध्ये पहिला पाऊस बिल्डिंगमधल्या घरातील गॅलरीमध्ये बसूनच पाहावा लागतो. जमिनीपासून जसे उंच जातोय, आपण तसे दुरावतोयही निसर्गापासून. ऋतू चक्रांमध्ये होणारे हे बदल अनुभवताना आपल्या जीवन पद्धतींमध्ये झालेले बदलही ठळकपणे जाणवतात. सिमेंटच्या जंगलांमुळे मातीचा सुगंध आता कोणाच्या नशिबी नाही. वरच्या मजल्यावरून कागदाच्या बोटी पाण्यात सोडल्यानंतर त्या पाण्यात जाऊन हेलकावे खाताना बघायला मिळण्याचा अनुभव दुर्मीळच. गर्मीमुळे आलेलं घामोळं पहिल्या पावसात भिजल्यावर निघून जाती; असं सांगून पहिल्या पावसात भिजायला प्रोत्साहन देणारी तेव्हाची डॉक्टर आजीही नाही दिसत आजकाल कुठे. खूपच पाऊस झाल्यावर खळखळणारे धबधबे, ओढे, नद्या, नाल्यांचे गढूळ पाणी हे अनुभवणेही दुरापास्त झालंय. नांगर घेऊन जाणार्‍या शेतकर्‍याऐवजी रेनकोट घालून गाड्या चालवणार्‍या दुचाकीस्वारांकडे बघून ऋतू बदलाची जाणीव होऊ लागलीय आपल्याला.
हे सगळं खरं असलं तरी, पाऊस मात्र आपलं कर्तव्य अखंडपणे पार पाडतोय. सूर्याच्या तप्त किरणांनी घायाळ झालेल्या धरणीमातेला अमृत धारांनी तृप्त करण्याचं आणि अवघ्या जीवसृष्टीला सुख देण्याचं...।
- तुषार सुभाष शिंदे