पूर्वी...
तिमिराने वेढलेल्या सदनात अखेर प्रवेश झाला जळत्या ज्योतीचा
नको नको म्हणत असतानाही जन्म झाला गोंडस मुलीचा
छुमछुम छुमछुम नाद करिती पायातील ते मृदू पैंजण,
या मधुर नादाने भरले जणू संपूर्ण घर!
कोवळी कळी फुलण्याअगोदरच,
लग्नाची बोलणी करण्यासाठी झाले सारे हजर!
बालपणीचे बोबडे बोल वळवतानाच संसारात अडकली ती
चारही दिशांनी वेगाने वाहणार्या सागराचे बेट मात्र झाली ती
पती निधनानंतर,
सुकेशिनी त्या नारीचे केले गेले केशवपन आणि
अशा अन्यायाने, अत्याचाराने ग्रासलेल्या त्या स्त्रीकडे
आनंदाने पाहत होते सारे जण.
कसे तरी रडत-खडत आयुष्य पुढे नेत होती.
शिळे अन्न खात खात अन्यायाविरुद्ध झगडत होती.
आता...
हळूहळू बदल झाला आणि बनली आहे स्त्री सक्षम.
प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेऊन झाली आहे ती भक्कम.
पण आजही त्या मातेचे, बहिणीचे आयुष्य झाले आहे का सुरळीत?
बदल हजारो घडूनसुद्धा का नाही तिचे जीवन सुरक्षित?
कितीतरी प्रकारच्या हिंसक, प्रवृत्तींना सामोरे तिला
जावे लागतेच आहे.
आगीतून उठून फोफाट्यात, पण ती बिचारी चंदनाच्या
लाकडाप्रमाणे हळूहळू जळतेच आहे.
अशी ही नारी प्रगतिपथावर उभी आहे.
सुरक्षित नाही तिचे जीवन तरी आता ती खंबीर झाली आहे.
खडतर तिच्या आयुष्याच्या अनेक कादंबर्या भरल्या जरी,
चित्तथरारक गोष्टी मनात येऊन मन खिन्न होते तरी.
कारण...
तिचे आयुष्य आजही त्या चार भिंतीत संपवले जात आहे.
वंशाचा दिवा हवा असणार्या लोकांना दिव्याची ज्योत मात्र नको आहे...
खरोखरच, अजूनही स्त्रीचे जीवन तिथेच खिळले आहे,
तिथेच खिळले आहे.
- स्नेहल प्रमोद रानडे
महिलाश्रम हायस्कूल, पुणे