खंड्या

शिक्षण विवेक    22-Jul-2022
Total Views |

khandya 
मित्रांनो, कधी निसर्ग सानिध्यात फिरायला गेला, तर नदीपात्रात किंवा पाणवठ्यावर हमखास दिसणारा पक्षी म्हणजे ‘खंड्या’ होय. बर्‍याच वेळा हा पक्षी विहिरीच्या काठावर बसून किलवणारी मारताना दिसून येतो. दिसायला अतिशय सुंदर असा हा पक्षी कवींच्या नजरेतून सुटणार कसा-
तळ्याकाठी भाती लाटा,
लाटांमध्ये उभे झाड,
झाडावर धीवराची,
हाले चोच लालजाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट
जसा चाफा यावा फुली,
पंख जणू थंडीमध्ये
बंडी घाली आमसुली
जांभळाचे तुझे डोळे
तुझी बोटे जास्वंदाची,
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलाची
गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना?
नको मारू मात्र मासा.
या कवितेत खंड्या पक्षाचे हुबेहुब वर्णन केलेले दिसून येते. या सुंदर पक्षाची थोडी माहिती घेऊ या.
या पक्षाला बंड्या, धीवर, लालचाच, व्हाइट थ्रोटेड किंगफिशर अशा नावानेही ओळखतात. हा पक्षी आकाराने साळुंकीपेक्षा थोडा मोठा असतो. या पक्षाच्या जाती भारतात आढळून येतात. यापैकी खंड्या हा पक्षी आपल्याकडे बारा महिने वास्तव्यास असतो.
नदीपात्राच्या एखाद्या उंच झाडावर बसून हा पक्षी किलिलिलि! असा आवाज काढून आपला इलाखा संरक्षित ठेवतो, तसेच मादीला आकर्षित करण्यासाठी तो आवाज काढत राहतो. त्याची बसण्याची जागाही ठरलेली असते.
खंड्याला इंग्रजी नाव ‘किंगफिशर’ असं आहे. त्याचे खाद्य म्हणजे कीटक, नाकतोडे, झुरळं, पाणभुंगेरा, झिंगा, बेडूक, मासे, विंचू, पाली आणि सापाची पिल्लं तो फस्त करतो. कधीकधी उंदरांची पिल्लंही पकडतो. पाणवठा सोडूनही तो इतर भागात दिसून येतो. अगदी गावातसुद्धा.
उन्हाळ्यात उन्हाचा त्रास झाला, तर तो स्वत:ला पाण्यात झोकून देतो. याचा वेग प्रचंड असतो. याच्या पाण्यातील छबी टिपण्यासाठी मात्र छायाचित्रकारांना फारच कसरत करावी लागते. याची पाण्यातील बुडी मात्र भयाण असते, त्या वेळी इतर पक्षी पाणवठ्यावरून पसार होतात. पाण्यात बुडून तो फांदीवर बसतो व आपल्या पंखाची स्वच्छता करतो. पाणवठ्यावर इतर शिकारी पक्षी आले, तर तो के-के-के-के अशी धोक्याची सूचना देणारा मोठा आवाज काढतो.
जानेवारी ते ऑगस्ट या काळात खंड्याची वीण होते. याचे घरटे नदीपात्राच्या भिंतीमधील बिळात खणलेले असते. घरट्याच्या बोगद्याची लांबी साधारण 1 मीटर असते. बिळात तो 4 ते 7 पांढरीशुभ्र अंडी घालतो. पिल्लाचं संगोपन नर आणि मादी मिळून करतात.
 
- भूषण भोये