दैनंदिन जीवनातील पर्यावरण

शिक्षण विवेक    23-Jul-2022
Total Views |

dainandin jeevanatil paryavaran 
 
सर्व मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात पर्यावरण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. पर्यावरण हा शब्द ‘परि + आवरण’ असा बनलेला दिसतो. म्हणजेच, आपल्या सभोवतालचे आवरण; ज्यामध्येच आपण नेहमी वावरत असतो. आपला परिसर, हवा, आजूबाजूचे वातावरण या सर्वांचा आपल्या दैनंदिन जीवनावर सातत्याने परिणाम होत असतो. थोडीशी जरी हवा बदलली, तरी लगेचच तब्येतीच्या तक्रारी ऐकू येतात. ‘आज हवा खूप विचित्र आहे ना, त्यामुळे डोकं दुखतंय’ किंवा ‘मूडच नाहीये’ असे आपल्या तोंडून सहजच निघून जाते. उदाहरणच घ्यायचे झाले, तर मुंबईच्या लोकांना पुण्यात आल्यावर आणि पुण्याच्या लोकांना मुंबईला गेल्यावर वातावरणातील बदल लगेचच जाणवतो. इतके आपले शरीर त्या वातावरणाशी एकरूप झालेले असते. संततधार पडणार्‍या पावसानंतर पडलेले ऊन सगळ्यांनाच सुखावून टाकते, आनंदित करून जाते. ‘श्रावणमासी हर्षमानसी’ शब्दश: असेच वातावरण तयार होते आणि आपल्यात एक प्रकारचे चैतन्य येते, उत्साह येतो.
प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती, तेथील वातावरण यांनुसार तेथील पिके, रोजगार आणि लोकांचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलत जातात. आधुनिक जीवनशैली आणि पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष व त्यामुळे होणारा र्‍हास रोखण्यासाठी नियोजनपूर्वक पावले उचलणे निकडीचे झाले आहे. आजकाल वाहनांची वाढणारी संख्या, बेसुमार वृक्षतोड, प्लास्टिकचा वापर, वायू प्रदूषण, जल प्रदूषण या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. त्यादृष्टीने शासन उचलत असलेली पावले खरोखरच स्वागतार्ह आहेत. स्वच्छ भारत उपक्रम, वृक्षारोपण, योगदिन, सायकलदिन अशा उपक्रमांमध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन, जास्तीत जास्त योगदान देण्याची गरज आहे. सर्वच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे आणि अन्य सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ कशी राहतील, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आरोग्य आणि पर्यावरणाचा संबंध समजावून सांगणे, यांमुळे वाढते प्रदूषण आणि निसर्गाचा होणारा र्‍हास थांबवण्यास मदत होईल. सध्या कमी झालेले पावसाचे प्रमाण आणि पर्यायाने वाढत जाणार्‍या दैनंदिन समस्या, महागाई या सर्व गोष्टींना आपणच कारणीभूत आहोत.
नैसर्गिक ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर; हवा, पाणी, ध्वनी, जमीन यांच्या प्रदूषणावरील नियंत्रण; नागरिकांमध्ये स्वच्छता व आरोग्य याबाबत जागरूकता; पाणी, वीज व इतर द्रवरूप-वायुरूप इंधनांची बचत आदी गोष्टींमधून पर्यावरणाचे रक्षण करून समतोल कसा राखता येईल, यासाठी आपण प्रत्येकाने पाऊल उचलू या आणि एक सजग नागरिक होऊ या.
- मृणाल मंदार सावरकर