छोट्याशा गावातली मोठीशी गोष्ट

शिक्षण विवेक    26-Jul-2022
Total Views |

A big story from a small town 
 
‘एकसाथ नमस्ते!’
सातवीच्या वर्गातल्या मुलांनी सरांना अभिवादन केलं. अविनाश सरांनी वर्गावरून एकदा प्रसन्न नजर फिरवली. ती पवारवाडी गावातली एक शाळा होती आणि आज सरांचा वर्गातला पहिलाच दिवस होता. शाळा आधीच सुरू झाली होती, पंधरा तारखेला. ‘आज एकवीस जून आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय?’ सरांनी विचारलं. वर्गातल्या पहिल्या नंबरच्या मुलाने सांगितलं, ‘एकवीस जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असतो. सरांना आश्‍चर्य वाटलं. उत्तर मिळेल याची त्यांना अपेक्षा नव्हती. म्हणून त्यांनी पुढे विचारलं, ‘पण का मोठा दिवस असतो?’ वर्गातला खोडकर मुलगा धन्या हळूच म्हणाला, ‘आज मोठा दिवस आहे, कारण सर इतक्या दिवसांनी वर्गात आले.’ त्यावर सगळी मुले फिदीफिदी हसली. सर म्हणाले, ‘मी तुला अशी शिक्षा करीन की तुला हा तुझ्या आयुष्यातला कायमचा मोठा दिवस वाटेल; पण मी असं करणार नाही.’ धन्याला हायसं वाटलं. पोरं बुचकळ्यात पडली. हे सर वेगळेच वाटत होते. नवीन होते, पण भारी होते. सर पुढे बोलू लागले, ‘मी तुम्हाला मारण्यासाठी नाही, तर इथे शिकवण्यासाठी आलो आहे. पण आज काहीच शिकवणार नाही.’
त्यावर पोरं खूश!
सरांनी विचारलं, ‘तुुम्ही शिकता?’
‘हो.’
‘खरं शिकता?’
‘हो.’
‘नाही, तुम्ही खरं शिकत नाही. उदाहरण सांगू? कोणी मासे पाळलेत का?’ दोन-चार मुलांनी हात वर केले. ‘हं. छान! तुम्ही मासे पाळता. चार दिवस कौतुक, नंतर तुम्ही त्या माशांकडे ढुंकून पाहात नाही. तुमची आई बिचारी त्यांना खायला घालते. खरं की नाही?’, सर म्हणाले. त्यावर मुलांनी माना खाली घातल्या. त्यांना पटलं होतं. ‘‘अरे, आपण त्या माशांचा अभ्यास करायला पाहिजे. निरीक्षण करायला पाहिजे. पुस्तकात नुसत्या आकृत्या असतात. नाहीतर मासा खातात काहीजण. पण तुम्ही मासा खाल्ला तर मी निरीक्षण नाही करू शकत ना! तुमचं पोट म्हणजे काचेची बरणी थोडीच आहे?’’ पोरं खदाखदा हसू लागली.
‘‘अरे, पुस्तकात ज्ञान असतं, पण एका छोट्या पुस्तकात किती ज्ञान मावणार? पुस्तकं आपल्याला त्या-त्या विषयांची तोंडओळख करून देतात. आपण आधी त्याचा अभ्यास करायचा. मग तोच अभ्यास पुस्तकाबाहेरही करायचा. झाडांचा, घरांचा, तार्‍यांचा, वार्‍यांचा!
काही मुलं फक्त मार्क्स मिळवण्यासाठी अभ्यास करतात. पण तेवढ्यापुरता अभ्यास. पुढचं पाठ आणि मागचं सपाट!
आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, या वर्षी. पण पुस्तकात थोड्याच गोष्टी असतात. आपण महाराजांचा इतिहास वेगळ्या ठिकाणाहून गोळा करायला पाहिजे. आपण शिवनेरीला जाऊ या महाराजांचं जन्मस्थान आहे. तुम्हाला तार्‍यांची माहिती आहे. एखाद्या रात्री आपण आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेऊ या. म्हणजे तुम्हाला जास्त तार्‍यांची माहिती होईल. ते ओळखता येतील.’’
सर बोलत होते तेवढ्यात घंटा वाजली. सरांनी मुलांना विचारलं, ‘गावात राणा पवार राहतो का रे अजून?’
त्यावर धन्या म्हणाला, ‘राहतो की, माझा चुलत भाऊच आहे तो.’ सरांच्या एकातरी प्रश्‍नाचं उत्तर देता आलं, त्यामुळे धन्याची छाती फुगली होती.
‘अरे वा! मग त्याला निरोप सांग, अविनाश सरांनी आठवण काढलीये म्हणून.’
बाहेर जाता-जाता धन्या पोरांना म्हणत होता, ‘‘सर, आपल्याला एवढं सांगतात. मग ते असं शिकून मोठे शास्त्रज्ञ का नाही झाले? अशा खेडेगावातल्या शाळेत शिक्षक कसे काय झाले?’’
बाहेर जाणार्‍या मुलाकडे अविनाश सर पाहात राहिले. त्यांच्या डोळ्यांपुढे वीस वर्षांपूवीचं पवारवाडी उभं राहिलं...
सर जेव्हा शिक्षक झाले, तेव्हा त्यांना त्यांच्या नोकरीतली पहिली शाळा मिळाली. ती या पवारवाडी गावातली. जिल्हा परिषदेची शाळा होती. नंतर सरांच्या वेगवेगळ्या गावांत-शाळांमध्ये बदल्या झाल्या, पण पवारवाडी त्यांच्या मनात कायमचं हसलेलं. पहिली नोकरी, पहिली शाळा. अन् गाव सुंदर, टुमदार! मीना नदीच्या काठाशी वसलेलं. बागायती शेती असलेलं. जगात द्राक्ष निर्यात करणारे. त्या वेळी त्यांचा विद्यार्थी होता राणा पवार! मस्तिखोर, खोडकर, आडदांड, धसमुसळा! पण, अविनाश सरांनी त्याला बदललं. त्याला अभ्यासाची गोडी लावली. पुस्तकाबाहेर शिकण्याची आवड लावली.
राणा बदलला, वर्गातला हुशार मुलगा झाला. पुढे तो शेती विषय घेऊन बी.एस्सी. झाला. घरची शेती होतीच. त्यात राबू लागला. नवे प्रयोग करू लागला. सरांनी अनेक विद्यार्थी घडवले होते. एकेक हिराच जणू. पण, सरांंची सुरुवात पवारवाडीमधून झाली होती. त्याच पवारवाडीत आज ते पुन्हा फिरून आले होते. त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. काही कारणाने एक आठवडा उशिराने शाळेत हजर झाले होते, पण त्यांच्या डोक्यात राणा होताच. तो त्यांचा पहिला विद्यार्थी होता. दुसर्‍या दिवशी सकाळी धन्याला शाळेत सोडायला त्याचा राणादा आला होता. सर आल्यावर राणा पुढे झाला. त्याने सरांना वाकून नमस्कार केला.
‘‘कसं काय राणा?’’ सरांनी विचारलं.
‘‘एकदम मस्त सरं! माझा विश्‍वासच बसत नाहीये, तुम्ही या गावात परत आलात.’’ त्यावर ‘आलोय खरा.’ ‘मला काही सागांयचंय सर. मी वर्गात येऊ?’, राणाने विचारलं. राणा वर्गात आला. सगळी मुलं गप्प झाली. राणा बोलू लागला. धन्याची छाती फुगली.
‘नमस्ते मुलांनो, हे अविनाश सर जसे तुमचे, तसेच माझेही सर. मीही तुमच्यासारखाच खोडकर होतो, पण मला बदललं या सरांनी. म्हणून मी शिकून शहराकडे पळालो नाही, तर पुन्हा गावी आलो; शेती करण्यासाठी. पुस्तकात शिकलेल्यापेक्षा वेगळी आणि खरी शेती करण्यासाठी आणि आज मी एक प्रगतशील शेतकरी आहे.
माझ्या वेळेस आजच्यासारखे पेपर, पुस्तकं, मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध नव्हतं. आज तुम्हाला हे सगळं उपलब्ध आहे. पण, तुम्ही त्याचा उपयोग करत नाही. केला तर टाईमपाससाठी, गेम्ससाठी. त्यातून ज्ञान मिळवा ज्ञान.
हा धन्या, मस्तिखोर! मला विचारतो, हे सर शिक्षक का झाले? अरे, जसं ते आता तुम्हाला सांगतात ना, तसं त्यांना त्यांच्या लहानपणी सांगणारं कोणी नव्हतं. म्हणून ते शिक्षक तरी झाले! मुलांना घडवण्यासाठी आणि मुलं घडतात! पुरावा? मी स्वत:!
आज जो काही आहे, तो या सरांमुळे. माझे विचार, माझं शिक्षण पुस्तकातून बाहेर काढलं त्यांनी. मी पुस्तकाबाहेरही शिकू लागलो. काल धन्याने सरांचा निरोप दिला आणि मला आश्‍चर्याचा धक्का बसला. पण सर मीही तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का देणार आहे... सर.. मी द्राक्षाची एक नवीन जात तयार केलीये. टपोर्‍या बोराएवढं द्राक्ष! माझं काम चालू आहे अजून. पण ते संशोधन फायनल झालं की मी त्याला नाव देणार आहे. अविनाश!
अविनाश सर पाहतच राहिले. मुलांनी टाळ्या पिटल्या. सरांच्या डोळ्यांत पाणी आलं तेव्हा राणा म्हणाला, ‘सर, तुम्ही मला बदललं म्हणून ही गुरुदक्षिणा आहे, तुम्हाला... अन् तो मुलांना म्हणाला, ‘‘तुम्हीही खूप शिकायचं. मोठं व्हायचं. सर आहेत तुमच्या पाठीशी. बोला काय करणार तुम्ही?’’
त्यावर संतोष म्हणाला, ‘‘राणादा, आम्ही रे काय करणार? आम्ही आता लहान आहोत. हा, पण आता पावसाची बेडकं निघतात ना. हा धन्या त्यांना दगड मारतो. त्याच्या मागेच असतो. आता मी त्याला असं करू देणार नाही. उलट एखादा नवीन जातीचा बेडूक सापडला, तर त्याला नाव देईन धन्या बेडूक!’’
पोरं फिदीफिदी हसू लागली. बाहेर घंटा वाजली. सर अजूनही डोळे पुसत होते. मुलांना वाटलं, त्यांच्या डोळ्यांत हसण्यामुळेच पाणी येतंय... पण ते, तसं नव्हतं!
 
- ईशान पुणेकर