स्पर्धा कोणाशी?

शिक्षण विवेक    04-Jul-2022
Total Views |

spardha konashi 
 
एका बालवाडीचा स्पोर्टस् डे. वयोगट दीड ते तीन वर्ष. दहा मीटर धावणे, तीन चाकी सायकल चालवणे, बेडूकउड्या मारणे, सर्वात जास्त चेंडू गोळा करून टोपलीत टाकणे, अशा शर्यती होत्या. मुलं या खेळांचा स्वच्छंद आनंद लुटत होती. काहीजण मित्रांशी गप्पा मारत शांतपणे पुढे सरकत होते. काही सर्वांना पाठ करून उभे होते. काहीजण, शिक्षिकेने सांगितले ते करत होते. पालकांमध्ये मात्र नुसती गडबड उडाली होती. सर्वजण आपापल्या पाल्याचे नाव घेऊन, हाका मारून, त्याला सूचना देत होते. पुढे सरक, चेंडू उचल, पटकन, धाव... फास्ट... असा जल्लोष चालू होता. या सूचनांना न जुमानणार्‍या मुलांच्या पालकांच्या चेहेर्‍यावर निराशा झळकत होती... आणि काहींच्या रागही. काय फरक पडणार होता? आता नाही जिंकलं ते पोर तर? खुश होती ती मुलं. जिंकलेली आणि हारलेलीही! त्या शाळेचं मात्र मला कौतुक करावसं वाटतं कारण, त्यांनी सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाला बक्षीस दिलं आणि जिंकणार्‍याला एक छोटी ट्रॉफी. प्रत्येक मुलाला स्टेजवर यायची संधी मिळाली, सगळ्यांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवल्या. त्यांच्या आनंदात अजून भर पडली. त्या चिमुरड्यांच्या हसर्‍या चेहेर्‍यांची तुलना कुठल्याही विजयाशी किंवा पराजयाशी कशी करायची? ही स्पर्धा किती मनावर घ्यायची? पालकांनी अशा किती छोट्या स्पर्धा जिंकल्या होत्या, ज्यांचा पुढील आयुष्यावर प्रभाव पडला?
सध्या स्पर्धेचे जग आहे, हे वाक्य अनेक लेखांमध्ये, भाषणांमध्ये, गंभीर अथवा प्रासंगिक किंवा अनौपचारिक गप्पांमध्ये विविध प्रकारे, अनेकदा चघळले जाते. त्यात रॅट रेस, स्ट्रेस, अचिव्हमेंट, इत्यादी शब्द सढळ ‘मुखाने’ वापरले जातात आणि हे बर्‍याच अंशी खरंही आहे. वरुणला बघ 92% पडले आहेत. पहिला येतो प्रत्येक परीक्षेत. शिक जरा त्याच्याकडून काहीतरी. यासारखी वाक्यं तर आपल्याला घरोघरी ऐकायला मिळतात.
मुलाच्या आयुष्यात सर्वप्रथम येते ती गुणांची स्पर्धा, वर्गातल्या किंवा ओळखीच्यांतल्या इतर मुलांबरोबर. ही स्पर्धा खरं तर पालाकांमधील असते इतर पालकांबरोबर. इतर लोकांच्या मुलांपेक्षा आपलं मूल मागे पडता कामा नये कुठल्याही बाबतीत!! या स्पर्धेतील त्यांचं प्यादं म्हणजे त्याचं मूल कारण बालगटात किंवा प्राथमिक शाळेत त्या मुलाच्या ध्यानीमनीही ही स्पर्धा नसते. ‘तिला बघ कसा स्टार दिला टीचरनी. तुलापण मिळायला हवा की नाही पुढल्या वेळी?’ हे प्ले ग्रूपमध्ये मूल असलेल्या एका मातेचे वाक्य ऐकून मी हताश झाले. ‘सुरू झाली त्या बिचार्‍या अडीच वर्षांच्या मुलाच्या आयुष्यातली स्पर्धा!’ आणि ही स्पर्धा आता दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, पोस्ट- ग्रॅज्युएशन, नोकरी, प्रमोशन अशी कायम चालूच राहणार. सर्वांत वाईट याचे वाटते की हा अतिरेकी स्पर्धेचा राक्षस शिक्षणापर्यंत मर्यादित राहत नाही. त्याची सावली खेळ-क्रीडा, कला, वक्तृत्व, एवढंच काय तर आपलं मूल दिसतं-बोलतं कसं यावरही पडलेली मी बघितली आहे.
टेनिस, फुटबॉल, पोहणे, गाणं, नाच काहीही शिकायला मुला-मुलींना पाठवलं तरी बर्‍याच पालकांची अशी अपेक्षा असते की त्यांनी स्पर्धेत भाग घ्यावा. मुलांना त्या दिशेने प्रोत्साहन देणे गरजेचे असते. असे केले तरच ते स्वतः त्या क्षेत्रात किती प्रगती करू शकतात, याची जाणीव त्यांना होते आणि मग स्वतःहूनच ते दुसर्‍याला हरवायचा प्रयत्न करतात. आपल्या या प्रयत्नांचा ओघ ‘तो कसा करतोय बघ’ यापेक्षा, तू ठरवलंस आणि प्रयत्न केलेस तर तू नक्की जिंकशील, या दिशेने हवा. माझ्या मुलीच्या शिक्षिकेने एकदा मला बोलावून सांगितले, गणितात उत्तम मार्क मिळवायची क्षमता तिच्यात आहे, पण तिला अजून ते कळलेले नाही. त्यामुळे जेवढे येते आहे, त्यातच ती खूश आहे. ही जाणीव त्या शिक्षिकेला झाल्यावर तिने थोडे जास्त लक्ष घालून तिच्याकडून गणितं सोडवून घेतली. आपल्याला हे येतंय असे तिच्या लक्षात आल्यावर, तिने गणिताचा सराव वाढवला आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचा प्रयत्न केला.
मुलांची प्रगती छान व्हावी अशी पालक व शिक्षकांची इच्छा असणे स्वाभाविक आहे पण; ती त्याची प्रगती हवी, दुसर्‍याच्या तुलनेत केलेले स्वतःचे मोजमाप नको. स्पर्धा ही नेहमी स्वतःशी हवी असे मला वाटते. इतरांशी नाही. माझी क्षमता काय आहे? मी अजून काय करू शकते? तीच गोष्ट मला जास्त चांगली कशी करता येईल? सुधारणा कशी करता येईल? हे ध्येय हवे. इंग्रजीमध्ये ज्याला ‘पोटेन्शियल’ म्हणतात, ते आपले अव्यक्त सामर्थ्य असते. ते पूर्णपणे व्यक्त होईपर्यंत आपण प्रगती करू शकतो. त्या पलीकडे दुसरा अमुक करू शकतो म्हणून मला ते आणि त्याच्यापेक्षाही चांगले करता आले पाहिजे ही चुकीची अपेक्षा आहे. मग आपण अशी अपेक्षा मुलांवर लादणे योग्य आहे का? त्यांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आलेच पाहिजे, इतरांपेक्षा त्याची प्रगती अधिक झाली पाहिजे हा अट्टाहास का?
आपणही स्वतःची तुलना दुसर्‍याशी करत असतो. ही तुलना, ही स्पर्धा पालक आणि शिक्षकांपासूनच सुरु होते... त्याचा अंत कुठे होणार, याचा विचार करायला हवा.
- सोनल काळे