वाडा

शिक्षण विवेक    12-Aug-2022
Total Views |

wada 
 
वाडा म्हटलं की, प्रेम, आपुलकी, संस्कृती, संस्कार, छोटे छोटे वाद विवाद आणि वादविवादनंतर एकमेकांबद्दलचे प्रेम आपुलकी खूप वाड्यांचा इतिहास आपण नेहमी ऐकत असतो. आपल्या पुण्यातही बरेच वाढले आहेत. केसरीवाडा, विश्रामबागवाडा, शनिवारवाडा असे अनेक आणि या वाड्यांचा इतिहासही आपल्याला माहिती आहे. हे झाले ऐतिहासिक वाडे; पण जेव्हा एखाद्या गावातील वाड्याचा विचार केला तर त्यामध्ये अनेक जाती धर्माची लोक आणि त्यांचे कुटुंब आणि तरीही एकत्र गुण्यागोविंदाने राहण्याची पद्धत. हेही सर्वांना माहिती असणार आहे. जेव्हा पुण्यासारख्या शहरात येऊन इमारतीमध्ये एखादा छोटासा फ्लॅट घेऊन कुटुंब राहतात तेव्हा नक्कीच त्या गावाकडच्या वाड्याची आठवण येते आणि असाच मला एक वाडा आठवतो. तो म्हणजे अमरावती जिल्ह्यात तालुका वरुडजवळ चांदस वाठोडा एक गाव आहे त्या गावांमध्ये बरेच वाडे आहेत. त्या गावातील एका वाड्यात काही कारणास्तव वर्षभर वास्तव्याची मला वेळ आली आणि वर्षभर मला तो वाडा अनुभवायला मिळाला. भले मोठे अंगण आणि अंगण संपल्यावर छोटी-छोटी दोन्ही बाजूने दुकाने आणि मध्ये भल मोठं असं सागवानी डिझाईनचा दोन मोठ्या मोठ्या भागात असलेला लाकडी दरवाजा. खरंतर खेड्यांमध्ये कामे करून आल्यावर जेवून खाऊन लवकरच झोपण्याची सवय. त्यामुळे चाळीस वर्ष आधीच्या त्या छोट्याशा पिवळ्या बल्बच्या प्रकाशात जेवण करून मी ही झोपी जायची. पण त्याआधी कंदील लावणे बारीक वात करणे कारण लाईटचा उजेड फक्त काही तास असायचा. त्यानंतर रॉकेलचा दिवा किंवा तेलाचा दिवा या प्रकाशातच बघावं लागायचं. झोपण्याच्या आधी तो भव्य दिव्य दरवाजा लावण्याचं अगदी मजबूत व्यक्तीकडेच काम असायचं आणि तो दरवाजा लावताना माझं रोजच लक्ष असायचं. लोखंडी बिजागरे, आणि मोठमोठ्या कड्यांचा आवाज मला फार आवडायचा आणि आणि दरवाजा लावल्यानंतर एक प्रकारची भीती नाहीशी व्हायची. सकाळी उठल्यावर परत तो दरवाजा उघडणे. आणि दुपारी परत लावणे परत संध्याकाळी उघडणे रात्री लावणे नित्यनेमाची त्यांची कामे. या वाड्यामध्ये चार-पाच कुटुंब राहत होते. सर्व काम वेळच्यावेळी. शेतीतील कामे करून आल्यावर जेवण, जेवल्यानंतर थोडाकाळ बसणे, गप्पा मारणे, आज काय झालं? शेतीची कामे कुठली झाली? चंद्राच्या प्रकाशामध्ये या सगळ्या गप्पा व्हायच्या खूपच आवडायचं मला. वर्षभरात बरेच वेगवेगळे अनुभव आले. राग रुसवे, वाद-विवाद, अबोला धरणे, या सगळ्या गोष्टी दर दोन-तीन दिवसांनी व्हायचाच. पण तेवढ्याच आपुलकीने त्या संपायच्यासुद्धा आणि परत आपापल्या कामात. अलीकडेच मी जाऊन आले. एवढ्या वर्षांनंतरही तोच दिनक्रम त्या वाड्यामध्ये चालू आहे. काहीही बदल झालेला नाही. तीच आपुलकी, तेच प्रेम, तोच जिव्हाळा. मन कसं भरून आलं. खरंच आणि वाटलं परत एकदा गावाकडेच जाव. शहराचा दिनक्रम वेगळा. आपापल्या कामात असतात. त्यामुळे गप्पाटप्पा मारायला वेळच मिळत नाही. मग असंच गावाकडे जावं आणि रिफ्रेश व्हावे असं मनात आलं आणि ठरवलं की दरवर्षी जाऊन त्या वाड्यामध्ये राहायचं आणि सगळ्या वाडासंस्कृतीच्या आठवणी मनात साठवून यायचं, परत वाड्यात जायचं आहे या दृष्टीने काम करायचं.
 
- साधना प्रविण फडणीस, शिक्षिका,
कै.वा.दि.वैद्य मुलींची प्राथमिक शाळा, पुणे