खेळाचे नाव - विशेषणाने बहरलेले ट्युलिप उद्यान
ध्येय - व्याकरणातील विशेषण या संकल्पनेचे अध्यापन-अध्ययन करणे.
उद्दिष्टे - १. विशेषण संकल्पना उदाहरणाद्वारे स्पष्ट करणे.
२. विशेषणाचे वेगवेगळे प्रकार विद्यार्थ्यांना ओळखता येणे.
३. विशेषणाचा योग्य वापर भाषण व लेखनामध्ये करता येणे.
साहित्य - विविध विशेषणे लिहिलेली ट्युलिप फुले.
कृती - प्रथम विद्यार्थ्यांची गटानुसार विभागणी करावी, प्रत्येक गटामध्ये पाच विद्यार्थी असावेत.
इतर विद्यार्थ्यांना निरीक्षण करावयास सांगावे.
विद्यार्थ्यांच्या गटाला ट्युलिप फुलांच्या उद्यानात न्यावे. ( जिथे विविध विशेषणाची ट्युलिप फुले असतील) यानंतर विद्यार्थी गटाला फळ्यावर पाच वाक्य लिहून द्यावीत यामध्ये योग्य विशेषणाचा वापर करण्यास सांगावे.
विद्यार्थ्यांच्या गटातील एका विद्यार्थ्याला वाक्याचे वाचन करण्यास सांगावे.
गटातील इतर विद्यार्थ्यांनी वाक्यात योग्य असलेल्या विशेषणाचे ट्युलिप फूल आणून द्यावे.
दुसऱ्या विद्यार्थ्याने ट्युलिपफुलावरील विशेषणाचे वाचन करावे, गटातील एका विद्यार्थ्याने त्याचे फलक लेखन करावे.
यानंतर निवडलेले ट्युलिपफूल व त्यावरील विशेषण योग्य कसे आहे यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावेत.
निवडलेला विद्यार्थी गट व इतर विद्यार्थी यांनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
अशाप्रकारे, वर्गात खेळ घेतल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे विशेषणे या संकल्पनेचे चांगल्या प्रकारे अध्ययन होईल आणि विद्यार्थी योग्य विशेषणाचा भाषण व लेखनामध्ये उपयोग करतील. खेळाच्या माध्यमातून संकल्पना शिकल्यामुळे यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.
शिक्षकांनी गृहपाठ म्हणून ट्युलिपफुलांवरील विशेषण विद्यार्थ्यांना लिहून घेण्यास सांगावे आणि त्याचा वाक्यात उपयोग करण्यास सांगावा.
उदा. गौरव वर्गात नेहमी प्रथम क्रमांक मिळवितो, गौरव -------------- मुलगा आहे. या वाक्यामध्ये विद्यार्थी ट्युलिप फुलांमधून कुशाग्र, बुद्धिमान इत्यादी विशेषणाचा योग्य वापर करतील.
- सीमा राजे, शिक्षिका,
व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, नऱ्हे, पुणे-४१.