पाठ्यपुस्तकातील पाऊस

शिक्षण विवेक    03-Aug-2022
Total Views |

pathyapustakatil paus 
धोय धोय धोय धोय
पाऊस पडतोय रे
माझ्या मनीचा मोर
कसा नाचतोय रे!
संगीत शिक्षक वर्गावर्गात गाणं शिकवत होते आणि मुलं ताल धरून गाणं म्हणत होती. पुण्याच्या डउएठढ च्या गीतावली पुस्तकात नोटेशनसह मी लिहिलेलं गीत समाविष्ट झालं. संगीतकार अजय पराड यांनी दिलेल्या धम्माल चालीत महाराष्ट्रभर हे गीत तालासुरात म्हंटलं जातं. या गीताचा यू-ट्यूबवर अनेक प्रकारे उपयोग झालेला दिसतो.
पाऊस हा असा सर्वांना हवाहवासा! लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची मनं रिझवणारा पाऊस मुलांना बडबडगीतांपासून भेटतो.
येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा
ये गं ये गं सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून!
हे गीत मराठी भाषेची ओळख होता होता मुलांना भेटतं आणि ताल, लय, सूर यांचा पाऊस मुलांची मनं भरून टाकतो. पावसांच्या धारांमध्ये हात पुढे करून उभी असलेली मुलं गारा वेचणारी मुलं अशी चित्रं पुस्तकात सुंदर रेखाटलेली असतात आणि आजही ती जशीच्या तशी मन पटलासमोर उभी राहतात.
सध्या पहिलीच्या पुस्तकात असलेलं अग्गोबाई ढग्गोबाई हे संदीप खरे यांचं गीत मुलांचं आधीपासूनच पाठ असतं. मग शिक्षिका त्याच्यावर कृतीगीत बसवून घेतात. ढगातून बरसणार्‍या पाण्याला डोळ्यांतून बरसणार्‍या पाण्याची दिलेली उपमा मनाला भावते. पूर्वीच्या अभ्यासक्रमात बहिणाबाई चौधरी यांच्या अशाच एका कवितेचा इंग्लिश अनुवाद होता. त्यात पावसाला डोळ्यांतील पावसाचे पाणीच म्हटलं होतं, तेही देवाच्या डोळ्यांतील पाणी! मुलांना पावसांची ओळख करून देताना हिंदी आणि इंग्लिश भाषा ही अग्रेसर आहेत. How beautiful is the rain. या कवितेतून पहिला पाऊस आल्यावर स्वच्छ होणारा परिसर वर्णन केला होता.
Across the window- pane
It pours and pours
and swift and wide
Like a river down the gutters
Welcome rain!
असं म्हणत कवी पावसाचं स्वागत करतो आणि दुसर्‍या एका इंग्लिश पाठ्यपुस्तकात कवी म्हणतो,
Rain, rain, go away
come again another day,
little Johny wants to play!
हिंदीच्या पाठ्यपुस्तकातील बूँदे ही कविता लयबद्ध पाऊस गीत आहे. पावसामुळे काय काय बदल होतात. धरती, नद्या, शेते-भाते, मैदाने, सारे सारे किती खूश झाले हे या कवितेत वर्णन केलं आहे.
रिमझिम-रिमझिम गाती बूँदे
धरती पर हे आती बूँदे।
खेंतो बागों मैदानों में,
हरियाली फैलाती बूँदे।
पुरवाई के रथ पर चढकर
इठलाती-मुसकाती बूँदे।
पावसाच्या थेंबांचं बहारदार वर्णन हिंदी शिकणार्‍या 5वी 6वी च्या मुलांना ताल धरून गायला लावतं.
संस्कृतच्या इ. 8वीच्या पाठ्यपुस्तकात पावसाचं वर्णन करणारी सुभाषितमाला आहे. त्यात पावसाच्या धारांनी नवजीवन मिळालेले वृक्ष, बेडूक, धबधबे वर्णन केले आहेत.
सर सर आयान्ति वर्षाधारा:
अत्र प्रसन्ना: सर्वेजीवा:।
वृर्क्षे: प्राप्तं नवजीवनम्
नृत्यन्ति मोदेन बाला: सततम्॥
हे संस्कृत वर्षागीत म्हणताना मुलांना खूप मजा वाटते. पुढे पाऊस थोडा स्थिरावला की श्रावणमास सुरू होतो. आणि बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!’ हा ऊन-पावसाचा खेळ आपण गेली कित्येक वर्षे पाठ्यपुस्तकातून गातोय, नाही का? आणि कवी कुसुमाग्रजांची ‘हासरा-नाचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा श्रावण आला’ म्हणताना लाजत लाजत येणारा श्रावण आपल्याला पावसाशी जुळलेलं नातं दाखवून देतो! इ. 8वीच्या पाठ्यपुस्तकातील ऐश्‍वर्य पाटेकर यांच्या ‘असा रंगारी श्रावण’ कवितेतून पाऊस रंग उधळतो आणि हिरव्या मळ्यात खोपा करून राहतो असं कवीच्याच शब्दात सांगता येईल.
आधीच्या 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात नागनाथ कोत्तापल्ले यांचा पाठ फिरवणारा पाऊस हा पावसासंबंधीचा लेख वेगळ्या आशयाचा होता. खूप धुवांधार कोसळल्याने लोकांना कशा अडचणी येतात पावसाची झड कशी दिवस दिवस लागून राहते, याचे ओघवते वर्णन या लेखात आले होते. संगीता बर्वे यांची मल्हाराची धून ही कविताही या पुस्तकात होती.
एकूणच मंगेश पाडगावकरांच्या, ‘सांग सोग भोलानाथ पाऊस पडेल काय’ या बालगीतापासून सुरू होणारा पाऊस वेगवेगळ्या वयोगटांमध्ये पाठ्यपुस्तकात भेटत राहातो. पाऊस, त्याचे विभ्रम, मातीचा सुगंध, थेंबाचे मोती, मल्हार राग, हिरवी शेते-भाते इंद्रधनुष्य या सार्‍या संवेदनशील संकल्पना पाऊस प्रगल्भ करतो.
पाऊस पुस्तकातून भेटतो आणि पुस्तकं पावसावर लिहिली जातात. सर्व चराचराला नवजीवन देणारा हा पाऊससखा पुस्तकाच्या पानांतून बोट धरून आपल्याला ओलंचिंब करून टाकतो. पाठ्यपुस्तकातून बरसणारा हा पाऊस असतो शब्दांचा! तो मनसोक्त अनुभवायचा असतो ओलेचिंब होईपर्यंत!
शब्दांचा पाऊस
पानांत दडतो
आठवणींचा पक्षी
उंच उंच उडतो!
- चारूता प्रभुदेसाई