उपवासाची कचोरी

28 Sep 2022 11:19:37

Fasting kachori 
 
साहित्य : 4 मोठे बटाटे, 1 वाटी साबुदाणा पीठ, चवीपुरते मीठ, थोडे तेल, पारीसाठी - तळण्यासाठी तेल

सारणासाठी साहित्य : एका नारळाचा खव, 4-5 हिरव्या मिरच्या, 2 चमचे साखर, अर्धी वाटी आवडीचे ड्रायफ्रूट्स्चे काप, चिमूटभर मीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर (चालत असल्यास) पाव लिंबू.
चटणीसाठी साहित्य : 1 वाटी आले खोबरे किसून, 3/4 वाटी तळून शेंगदाणे, 4 हिरव्या मिरच्या, 1 चमचा साखर, 2-4 चमचे दही, चवीपुरते मीठ
कृती : प्रथम बटाटे कुकरला वाफवून घेणे. थंड होईपर्यंत नारळ खोवून घेणे. आता बटाटे सोलून किसून घेणे. साबुदाण्याचे पीठ घालणे. चवीपुरते मीठ घालून त्या सगळ्याचा एकत्र गोळा तयार करावा. शेवटी तेलाचा हात लावून एकसारखे करावे.
आता सारण करावे. नारळाचा खव एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यावा. त्यामध्ये साखर, ड्रायफ्रूट्स्चे काप, कोथिंबीर, मीठ आणि पाव लिंबू पिळावे. हलक्या हाताने एकत्र करावे.
आता पिठाचे आणि सारणाचे समान भाग करावेत. पीठाची एक गोळी घेऊन, मोदकाप्रमाणे पारी करून त्यामध्ये सारण भरून, तोंड बंद करत गोलाकार द्यावा. अशाप्रकारे सर्व कचोर्‍या तयार करून घ्याव्यात. सर्व करून तयार झाल्यावर मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
चटणी कृती : चटणीचे सर्व साहित्य एकत्र मिक्सरच्या मांडयात घेऊन, आवश्यकतेनुसार पाणी घालून, सरसरीत चटणी करून घ्यावी. (खूप बारीक वाटू नये.)
गरम गरम कचोर्‍या तळून चटणीबरोबर सर्व कराव्यात.
- नमिता पाटील, उपशिक्षिका
कन्याशाळा, वाई
Powered By Sangraha 9.0