
सर्व ऋतूंत मिळणारा आणि सर्वसामान्यांना सहज परवडणारा एक अन्नपदार्थ म्हणजे पानकोबी. प्राचीन काळापासून कोबीचे औषधी गुण माहीत आहेत. अनेक औषधी गुण कोबीमध्ये आढळून येत आहेत. विशेषत: कोबीचं अॅसिडिटीच्या, अल्सरच्या आणि कर्करोगाच्या प्रतिबंधातलं आणि उपचारातलं महत्त्व, शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून होत आहे. आजच्या ताणतणावांनी भरलेल्या जीवनात अॅसिडिटी आणि अल्सरचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी अँटॅसिड औषधं घेऊन तात्पुरता आराम मिळतो. याउलट १ कप कोबीचा रस सकाळी अनुशापोटी एकदा आणि दिवसभरात आणखी एक-दोन वेळा घेऊन, अॅसिडिटीचा त्रास काही दिवसांतच खूप कमी होऊन, कालांतराने पूर्ण थांबतो. चार कप कोबीचा रस, रोज चार वेळात विभागून घेऊन गॅस्ट्रिक आणि ड्युओडेनल अल्सर इतर उपचारांच्या तुलनेत खूपच लवकर पूर्णपणे भरून येतात. कोबीमधील चोथ्याचे (fibar) भरपूर प्रमाण बद्धकोष्ट व्हायला प्रतिबंध करतं. तर, त्यातील टायट्रॉनिक अॅसिड या घटकामुळे आहारातील जास्तीच्या उष्मांकाचे चरबीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला आळा बसून, वजन कमी व्हायला मदत होते. कोबीमधील या गुणांचा फायदा शरीराला थोड्या थोड्या मात्रेत मिळवण्यासाठी, त्याच्या मर्यादित प्रमाणात वापर शक्यतो रोज केल्यास फायद्याचा ठरतो. यासाठी तो कच्चा खाणे जरूरीचे असते. रोजच्या आहारात कच्चा कोबी वापरण्यासाठी काही पदार्थांच्या कृती देत आहे.
कोबीची कोशिंबीर :
साहित्य : १ कप बारीक चिरलेला हिरवा कोबी, अर्धा कप किसलेला गाजर, दीड कप ढब्बू मिरचीचे तुकडे, थोडे बेदाणे, दीड चमचा ओल्या नारळाचा खव, अर्धा चमचा भाजलेल्या तिळाची पूड, लिंबाचा रस, मीठ हे सर्व एकत्र करून हलकेच हलवणे.
कोबी आणि भिजलेल्या शेंगदाण्याची कोशिंबीर:
साहित्य : दीड कप हिरवा चिरलेला कोबी, अर्धा कप २ तास भिजवलेले शेंगदाणे, ६ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या जाडसर वाटून, लिंबाचा रस, १ चमचा तिळांच तेल (कच्चं). सर्व एकत्र करून हलकेच हलवणे.
कोबीचं रायतं :
साहित्य : १ कप किसलेला कोबी, १ कप घुसळलेले दही, पाव चमचा मोहोरी पूड किंवा वाटलेला पुदिना, मीठ, हिरवी मिरची (चिरून), १ चमचा भिजवून वाटलेली हरभरा डाळ, १ चमचा तेलाची फोडणी (ऐच्छिक). सर्व एकत्र कालवणे. भाज्यांची वेगवेगळी मिश्रणं वापरून कोशिंबीर करता येईल; पण अॅसिडिटी असेल तर कांद्याच्या वापर कमी असावा आणि कर्करोग प्रतिबंधासाठी भरपूर कांदा वापरणे फारद्याचं ठरेल.
- श्रेया जोगावडे,
विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे