कडधान्यांची भेळ

कडधान्यांची भेळ

शिक्षण विवेक    03-Oct-2023
Total Views |

कडधान्यांची भेळ
बाल मित्रांनो, आज आपण प्रथिनेरुक्त कडधान्यांची भेळ कशी तयार करायची हे पाहणार आहोत.
साहित्य : मटकी ५० ग्रॅम, मूग ५० ग्रॅम, शेंगदाणे ५० ग्रॅम, हरभरे ५० ग्रॅम, एक कांदा बारीक चिरलेला, अर्ध्या काकडीचे बारीक तुकडे, एक टोमॅटो बारीक, ५० ग्रॅम पनीरचे तुकडे, एका लहान मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, सैंधव मीठ चवीपुरते, चाट मसाला, जिरेपूड, काळी मिरी पावडर, लिंबू.
कृती : मटकी, मूग, शेंगदाणे, हरभरे ही सर्व कडधान्रे स्वच्छ धुवून वेगवेगळे ८ ते १० तास पाण्यात भिजत घालावेत. त्यानंतर पुन्हा स्वच्छ धुवून चाळणीत गाळून घ्यावे. स्वच्छ कापड ओले करावे. सर्व कडधान्रे अंकुरित करण्यासाठी (मोड आणण्यासाठी) वेगवेगळी ओल्या कापडात बांधून, उबदार ठिकाणी ठेवावीत. शक्य असल्यास ओव्हन बंद ठेवून त्यात भिजवलेली कडधान्ये ठेवावीत. प्रत्येक २-३ तासांनी त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडावे. यातील हरभरे आणि शेंगदाण्याला मोड यायला वेळ लागतो. मूग आणि मटकीला लवकर मोड येतात. त्यामुळे शेंगदाणे आणि हरभरे साधारण २४ तास भिजत ठेवून कापडात बांधावेत.
अंकुरित झालेले सर्व कडधान्य कापडातून चाळणीत काढून घ्यावेत. थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. धुताना यांना हात लावू देऊ नयेत, कारण राचे मोड तुटण्याची शक्यता असते. या कडधान्यांमध्ये काही खराब झालेले दाणे असतील तर ते काढून टाकावेत. अशा प्रकारे सर्व कडधान्यांला अंकुरित करावे. अंकुरित झालेली सर्व कडधान्रे, एका मोठ्या बाऊलमधे एकत्र करावीत. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, काकडी, टोमॅटो, पनीरचे तुकडे, मिरची, कोथिंबीर, चवीपुरते सैंधव मीठ घालावे. छोटा पाव चमचा चाट मसाला, जिरेपूड आणि काळी मिरी पावडर घालावी. सर्व मिश्रण हलक्या हाताने चमचा वापरून मिसळावे. शेवटी त्यावर अर्धा लिंबू पिळावा. बालमित्रांनो, ही कडधान्यांची चटपटीत भेळ प्रथिनेयुक्त आहे. त्यामुळे शरीराला आवश्यक असणार्‍या प्रथिनांची गरज पूर्ण होते. आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी नाश्त्यासाठी ही भेळ नक्की खा. घरच्यांनाही तयार करून खायला द्या.
- अनघा दणाणे, साहाय्यक शिक्षिका,
श्री. कांतिलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला प्राथमिक विभाग, सांगली