कहाणी बालदेवांची

04 Oct 2023 10:00:42

कहाणी बालदेवांची
ऐका पालकांनो तुमच्यासाठी ही कहाणी बालदेवांची
तुमच्या आमच्या अगदी जवळची मायेची जिव्हाळ्याची
अवाढव्य पृथ्वीवर आटपाट नगरे सगळी
एकच गोष्ट खरी सर्वत्र बालगोपाळांची मांदियाळी
सगळी मुलं सारखीच, त्यांच्या मनात नसतो भेदभाव काही
मोठेच सारे शिकवतात त्यांना ना, करायला काही बाही
बालकरणी आमच्यासारखे, शिक्षक होतात संघटित
प्रयत्न करतो आम्ही सारे, साधायला बालकांचे हीत
पालकांनो मुले आपली, आपणच शिकतात, करतात निवड,
त्यांच्या मागे लागून, नका करू त्यांच्यात शिक्षणाची नावड
त्यांना फक्त शिकवू नका, करा मदत शिकायला
आयता घास भरवू नका, शिकवा शोध घ्यायला
निसर्ग आपला गुरू, हसतखेळत रमू दे त्यात
‘पडो झडो मुल वाढो’, म्हण का हो ही विसरलात
या मराठी शाळेत, शिकू दे त्यांना सारं
माहीत आहे तुम्हाला तरी, कानी इकडून तिकडे गेलं वारं
काढू या बाहेर त्यांना, आभासी जगातून
परी जादूगार राजाराणीच्या, गोष्टी सांगून ठेवा त्यांना गुंतवून नातेसंबंधात, बांधून राहू दे आपली सारी घरं
मुलांना मग नक्कीच कळेल, संस्कारांचं महत्त्व खरं
शिवाजी जन्मूदे शेजारी, नको आपल्या घरी
असं म्हणू नका
मुलं हीच राष्ट्राची संपत्ती खरी
किती सांगू शब्द अपुरे पडती, विचार मात्र पुढे धावती
या छोट्या मुलांचं, मोठेपण रेतं डोळ्याभोवती
घराघरातलं बालब्रम्ह सुखी, समृद्ध मोठं कर देवा
वाढत्या वयाने पुढे नेऊ विचारांचा ठेवा
सर्व पालकांचे बालगोपाळांचे मनोरथ होऊ दे पूर्ण
ही अनंत उत्तरांची कहाणी, तुमच्या आमच्या
सर्वांच्या प्रयत्नानांनी होऊ दे सुफळ संपूर्ण
- भाग्यश्री जोशी, मुख्याध्यापक,
छत्रपती शिक्षण मंडळाचे
पूर्व प्राथमिक विद्यामंदिर तिसगाव कल्याण (पूर्व)
Powered By Sangraha 9.0