आमचे खान्देश

07 Oct 2023 14:15:11

आमचे खान्देश
सध्या म्हणे जग जवळ आलंय, गुगल बाबांचे एक बटण दाबले की, जगभरातील सगळी माहिती तुम्हाला मिळते. युट्युबताई कोणत्याही पदार्थाच्या अनेक रेसेपी तुम्हाला लगेच देतात. तरीही काहींच्या फसतात. का बरे असे होत असावे. हा सगळा विचार करता करता मी अजून एक विचार करत होते आणि तो म्हणजे संध्याकाळी भाजी काय करावी? ही का ती? घरातील कोणाला काय आवडेल? कोणाचे नाक मुरडेल आणि कोणाचा पापड मोडेल? हा विचार करताना एक जोक आठवला, एक नवरा बायकोला म्हणतो, ‘दिवसभर युट्युबवर वेगवेगळ्या रेसेपी बघत असतेस आणि आठवड्यातून तीन वेळा खिचडीच करतेस? तेव्हा खिचडीचा बेत रद्द केला. परत भोपळे चौकात आले काय करायचे? आणि तेवढ्यात मातामाऊलीचा फोन धावून आला. तिच्याशी बोलता बोलता माझी राष्ट्रीय समस्या सांगितली. तर तिने पाच मिनिटात किमान पाच पदार्थ सांगितले आणि अरेच्या आपल्याला का नाही आठवलं हे?
आमच्या खान्देशची हीच खासियत आहे. प्रत्येक सणाला, ऋतूला विविध खाद्यपदार्थ असतात. घरात कधी ताजी भाजी नसेल, तरी काम नुसते चालून जाते असे नाही, तर रसना तृप्त होईल असे आमचे खान्देशी पदार्थ. वानगीदाखल आमच्या भागातील खान्देशमधील काही पदार्थाची नावे सांगते.
1. जगात सुप्रसिद्ध वांग्याचे भरीत आणि भाकरी (हो पण हिरव्या वांग्याचे बरं का. ती पण खान्देशातील, बानोदमधील असतील तर क्या बात है). या भरताबरोबर पुरी पण करतात. कणिकेची किंवा कळण्याची.
2. वरण बट्टी वांग्याची घोटलेली भाजी - गंगाफळाची पण चालेल (आता प्रश्‍न पडला ना गंगाफळ म्हणजे काय? तर, लाल भोपळा)
3. कळण्याची भाकरी आणि शेंगदाण्याची ओली पातळ चटणी
4. पाटवड्याचे पीठ आणि भाकरी. त्या पाटवड्या रस्त्यात सोडारच्या आधी बाका मंडळींची नजर चुकवून, लंपास करण्यातील मज्जा काही औरच.
आता आईपण निभावताना पोर तीच गंमत अनुभवतात तेव्हा जुन्रा आठवणी जाग्या होतात.
5. डाळतांदूळाची खिचडी आणि लसणाचे तेल-जोडीला कढी
6. दालबाटी मिरच्या आणि भाकरी/पोळी
7. सांडगे यांची कोरडी किंवा पातळ भाजी आणि भाकरी/पोळी
8 वरणपोळी जोडीला वांग्याची घोटलेली भाजी-गंगाफळाची पण चालेल. भाजी नसेलच तर झणझणीत कांद्याची चटणी.
9. डाळदिंडोरी आणि भाकरी/पोळी
10. मुगाची डाळ-कोरडी किंवा पातळ आणि भाकरी/पोळी
11. शेव भाजी आणि भाकरी/पोळी (सांगायची गोष्ट म्हणजे आत्ता आता विकतची शेव-लाल रंगाची जाडी शेव-आणून भाजी करतात आधी तर ती शेव पण घरीच करायचे. हातावर वळायचे)
या सगळ्रा जेवणात बुक्कीने फोडलेला कांदा हवा. कच्ची कांदेपात किंवा मेथीचा खुडा. खान्देशी लोणचे आणि पापड (उडीदाचे, बिबडे, पीठापापड, तेलपापड, पान-हा पापडाचाच एक प्रकार आहे)
ही अगदी वरवरची यादी आहे आणि प्रत्येक पदार्थांची रेसेपी सांगायला एक एक लेख लिहावा लागेल. हे सगळे पदार्थ म्हणजे खान्देशची शान, अभिमान.
वर दिलेल्या यादीमधले बहुतेक पदार्थ हे तुम्हाला, तुमच्या आई, काकू, ताई आणि खास करून आज्जीकडून शिकायला पाहिजेत. करताना बाजूला उभे राहून सुरुवातीला कांदा चिरून दे, खोबरे खिसून दे, लसूण सोलून दे मग मसाला वाटून दे, अशा पायर्‍या चढत मग, मसाला कलसणे या पायरीपर्यंत पोहोचायचे असते. मसाला तेल सुटेपर्यंत परतणे म्हणजे मसाला कलसणे. हा खास आमच्याकडचा शब्द आहे. भाजीवर मस्त तर्री आली पाहिजे. आता मी तुम्हांला एक अत्यंत सोपी रेसेपी सांगणार आहे. जी कधीही, कोणीही करू शकेल आणि न फसता हमखास यशस्वी होईल. भाजी घरात नसताना, खूप भूक लागली आहे आणि वेळ कमी आहे अशा वेळेला करू शकता.
पापडाचा खुडा : 3 ते 4 उडीदाचे पापड भाजून घेणे. एका बाऊलमध्ये ते हाताने बारीक चुरणे/भुगा करणे. त्या भुग्यामध्ये शेंगदाण्याची जास्त लसूण घातलेली चटणी घालणे. वरून कच्चे तेल घालून कालवणे. मीठ घालारची गरज नाही कारण चटणी आणि पापडात मीठ असतेच. (हा खुडा कालवल्यावर बोटे मस्त रंगतात ती झकासपैकी चाटून घ्यायची) हा पापडाचा खुडा पोळी बरोबर भन्नाट लागतो. चटणीतील लसूण तिखटाचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमीजास्त करू शकता. तेल जरा जास्त घालायचे. लेख संपवताना अजून एक पदार्थचे नाव सांगते. बिबडे. हे पापड आणि कच्चे शेंगदाणे हा संध्याकाळच्या वेळेसचे खाणे. मस्त पोटभरीचे आणि पौष्टिक. तेव्हा नक्की करून बघा आमचे खान्देशी पदार्थ आणि आस्वाद घ्या.
- शिवाली शिंदे, पालक,
एन. ई. एम. एस, पुणे
Powered By Sangraha 9.0