दीपोत्सव

11 Nov 2023 23:59:59

 
दिवाळी

 
 
 
' दीपोत्सव '

दीपोत्सव ही तेजाची आरती

उत्साह ओसंडतो सभोवती

लावू तुळशीवृंदावनापाशी दिवा

दारात टांगूया रंगीत आकाशदिवा

झेलू अंगणात सुखद पहाटवारा

चौफेर घालूया गार पाण्याने सडा

करू सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान

दारात काढूया रांगोळी छान

लावू दिव्यांची चमचमती माळ

एकत्र येऊन करूया स्वादिष्ट फराळ

अंगिकारू पर्यावरणस्नेही सणाला

रामराम ठोकूया प्रदूषणरुपी राक्षसाला

देऊ गरजूंना मदतीचा हात

सर्वत्र वाटूया आनंद जोमात

करू पखरण शुभ मांगल्याची

साजरी करूया दिवाळी सौख्याची

 

दोस्तांनो, गरजूंना मदत करून आणि पर्यावरणस्नेही पद्धत अंगिकारून पुढीलप्रमाणे दिवाळी साजरी करूया : -

# मातीच्या पणत्यांचा वापर करावा.

# प्लॅस्टिकचा अतिरिक्त वापर टाळावा.

# सण साजरा करताना देवपूजेतील निर्माल्याचे झाडांकरता खत करावे.

# मित्रमैत्रिणींबरोबर अंगत-पंगत करून एकत्रपणे फराळ करावा.

# आयुर्वेदिक सुगंधी उटणे घरी तयार करून पहावे.

# प्लॅस्टिक, थर्माकोल यांपासून बनवलेल्या आकाशदिव्याचा वापर टाळावा. त्याऐवजी कागद, बांबू, वेत, कापड, माती यांपासून तयार केलेला पर्यावरणपूरक आकाशदिवा वापरावा.

# भेटवस्तू द्यायची झाली तर वही, डायरी, गोष्टींची पुस्तके, दिवाळी अंक, स्वतः तयार केलेले भेट कार्ड/सुगंधी उटणे, मातीचे दिवे व पणत्या, आकाशदिवा, उपयुक्त वनस्पतींची रोपे, लागवडीसाठी बिया, पर्यावरणस्नेही खेळणी, गोशाळेची उत्पादने, इत्यादी वस्तू भेट द्याव्यात.

# फटाके फोडताना पर्यावरण, पशु-पक्षी, लहान बाळे, वृद्ध व्यक्ती, रुग्ण यांचा विचार करावा. कानठळ्या बसवणारे व धूर सोडणारे फटाके फोडू नयेत. फटाके अजिबात वापरू नयेत किंवा फटाके वापरावे वाटल्यास आवाजाची तीव्रता आणि धुराचे प्रमाण कमी असणारे हरित फटाके वापरावेत. वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण टाळावे.

# दिवाळीत गोठ्यातील गाई-म्हशींना ओवाळायची पद्धत आहे. वसुबारसेच्या दिवशी गाय-वासरू पूजन केले जाते. परंतु या आधुनिक काळात शहरांमध्ये अशा परंपरांचे पालन करणे सहजगत्या शक्य होत नाही. तर देशी गाईंच्या गोशाळेला आर्थिक मदत करावी. गोशाळेने उत्पादित केलेल्या वस्तू विकत घ्याव्यात.

# अनाथालयातील मुलांना शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी किंवा अन्नदान करावे.

# वृद्धाश्रम, धर्मदाय संस्थांना आवश्यक ती मदत यथाशक्ती करावी.

सर्व बालचमूंना पर्यावरणस्नेही दिवाळीच्या आनंदमय शुभेच्छा!

 

- प्रिया फुलंब्रीकर

मोबाईल क्र. : ९७६६६२३४०९

(ग्रीन बर्ड्स अभियान, संस्थापक)

Powered By Sangraha 9.0