आठवणीतील दिवाळी

12 Nov 2023 07:00:00

 
आठवणीतील दिवाळी

आठवणीतील दिवाळी

सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा,

नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा ......!

दसरा झाला की चाहूल लागते दिवाळीची. निसर्गातील वातावरण ही बदलू लागते, हळूहळू पहाटे हवेत गारवा निर्माण होतो. या बदलामुळे दिवाळीचे वेध लागतात.

पुण्याचे वैभव म्हणजे वाडा संस्कृती. अनेक नावाजलेले वाडे पुण्यात बघायला मिळत. आमचे बालपण वाड्यातच गेले. वाड्यात राहण्याची मज्जाच काही वेगळी. आमचे एकत्र कुटुंब, नेहमी घरात गजबज, सणासुदीला तर नुसती धांदल असे. दिवाळीच्या आधी १५ दिवसांपासून आई, काकू यांची धांदल उडे, साफसफाई घरातील वाणसामान बघणे, याची गडबड सुरु असायची. नेमकी याच काळात असते ती आम्हा मुलांची सहामाही परीक्षा. असे वाटायचे कधी परीक्षा संपते? शेवटचा पेपर झाला की लगेच मुलांची पाऊले वळायची माती, दगड गोळा करणे. किल्ल्यांची तयारी सुरु करण्याची घाई. आवळे गोळा करायचे, किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे सिंहासन करायचे. आईकडून डबा घ्यायचा. त्याला कापून विहीर तयार करायची. या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद मिळायचा. गेरू (काव) आणायचा दारातील फरशीवर तो लावून ठेवायचा, त्यावर आईने ठिपके ठिपके जोडून काढलेली रांगोळी अगदी उठून दिसत असे.

स्वयंपाक घरातून चकलीचा, लाडूचा घमघमाट सुटायचा. आम्ही मुले स्वयंपाक घरात डोकावून बघायचे आम्हाला कशालाही हात लावायचा मज्जाव असायचा. आजीची ताकीदच असायची नैवैद्य दाखवल्याशिवाय काहीही नाही. त्याकाळी घरातील स्त्रिया नोकरीत अडकलेल्या नव्हत्या. त्यामुळे सर्व फराळाचे पदार्थ घरीच तयार केले जायचे, तेव्हा बाहेरून फराळ विकत आणणे हा विचार सुद्धा डोक्यात नव्हतं. सर्व फराळ मन लावून, हसत खेळत वातावरणातच तयार होत असे.

चौकोनी आकाशकंदील, चांदणीचा आकार असलेला आकाशकंदील, लाईटच्या माळा दारावर लावल्या जायच्या घराचे दर अगदी शोभुन दिसायचे. साध्या मातीच्या पणत्याच्या प्रकाश मिणमिणता असला तरी तो खरा असायचा. त्यावेळी दिवाळीत थंडी असायची, झोपेतून उठावे असे वाटायचेच नाही. पण आधी अंघोळ करून कोण तयार होती याची चढाओढ असे. पहिला फटाका फोडण्याची मजा काही ओरच असे. दारात पहाटे पहाटे सडा, रांगोळी, ओळीने लावलेल्या पणत्यांनी परिसर उजळून निघायचा. अभ्यंग स्नान, फटाके याची मजा घेऊन झाली की, फराळावर ताव मारायचा. वाड्यातील सर्व कुटुंबातून फराळाची देवाणघेवाण होत असे. प्रत्येकाच्या फराळातील पदार्थांना वेगळेपण असायचे. पण प्रेमाचा धागा नात्याने विणलेला असायचा.

लक्ष्मीपूजन म्हणजे सर्वात मोठा दिवाळीचा दिवस. सर्वांच्या घरातून पुरणाचा घमघमाट सुटायचा. जेवणे उरकली, की लगेच सडा रांगोळीची तयारी या दिवशी खूप मोठी रांगोळी कुणाच्या दारात असेल याबाबत चढाओढ असायची. आम्ही मुले तर नवीन कपडे, दागिने गजरे घालून सर्वत्र फिरायची. आमच्या आजूबाजूला मोठी मोठी दुकाने असल्यामुळे सर्वत्र पूजेचे वातावरण नंतर फटाक्यांची आतिषबाजी. पाडव्यादिवशी घरातील सर्व पुरुषमंडळी ओळीने औक्षण करायला बसायची. घरातील सर्व काकू, आई, आजी ओवाळणी घेण्यासाठी आतुरतेने वाट बघायच्या. आम्हा मुलांना हा दिवाळीसण कधीच संपू नये असे वाटते. ना शाळेची कटकट, ना अभ्यासाची किटकिट, फक्त खेळणे, उड्या मारणे, फटाके उडविणे आणि आईने तयार केलेला फराळ फस्त करणे एवढेच काम.

आजही दिवाळी आनंदाने हसत – नाचतच येते. दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत फरक पडला आहे. पूर्वी फक्त दिवाळी व वाढदिवसाला मिळाले तरच नवीन कपडे मिळायचे, आता तसे काही नाही आवडला की ड्रेस, साडी याची खरेदी केली जाते. आता पूर्वीसारखे वाडे व वाड्यात राहणारी कुटुंबे ही राहिली नाही.

“तमसो मा ज्योतीर्गमय” म्हणत अंधार नाहीसा करणारा हा सण. रीत बदलली तरी अंधार नाहीसा करण्याची धडपड असणारच.

ज्योतीच्या प्रकाशात आयुष्यात आनंदाची बरसात करणाऱ्या या दीपावलीच्या तुम्हा सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा.

|| शुभ दीपावली ||

सौ. शामला दाभाडे

एच्.ए. स्कूल पिंपरी

Powered By Sangraha 9.0