
श्रीअन्न
‘येत्या बुधवारी आपल्या पाल्याला डब्यात श्रीअन्नाचे पदार्थ द्यावेत. पोळी भाजी देऊ नये’ ही शाळेकडून आलेली सूचना वाचून अर्णव गोंधळात पडला. एरवी डब्यात पोळी भाजीच द्यावी, फास्ट फूड, पक्वाने वगैरे देऊ नयेत, असे शाळेचे नियम होते. त्यामुळे आता एका दिवसासाठी पोळी भाजी का नाही? आणि श्रीअन्न म्हणजे काय?, असे प्रश्न त्याला पडले. तो सहावीत होता आणि हा शब्द काही त्याला गेलेला नव्हता. संध्याकाळी सवडीने इंटरनेटवर बघावं, असा विचार त्यानं केला.
संध्याकाळी अर्णवची आई घरी आली आणि अर्णवनं तिला या नोटीशीबद्दल सांगितलं. त्यावर ती एकदम हसली आणि म्हणाली, "अरे, श्रीअन्न म्हणजे मिलेट्स. मराठीत भरड धान्यं. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष आहे ना, त्यामुळं असेल असं सांगितलं.” अर्णवची आई कृषी महाविद्यालयात प्राध्यापिका होती.
"मिलेट्स? ते काय असतं?”, अर्णवनं विचारलं.
"हे बघ, जगभर खाण्यासाठी जी अन्नधान्ये वापरली जातात ना, त्यामध्ये गहू, मका आणि भात ही प्रमुख आहेत. त्याखालोखाल ज्वारी आणि इतर दुय्यम धान्ये. त्यांनाच मिलेट्स किंवा भरडधान्ये म्हणतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई किंवा भगर, राळा, भादली अशी सात-आठ तरी भरडधान्ये आहेत. हल्ली बहुतेकांना या भरडधान्यांची इंग्रजी नावेच ऐकून माहीत असतात. वाळा-फॉसटेल मिलेट, भादली-बार्नयार्ड मिलेट, बाजरी-पर्ल मिलेट, ज्वारी-सोरघम, वरई-प्रोसो मिलेट, नाचणी-फिंगर मिलेट ही ती नावे. ही धान्ये सामान्यपणे आकाराने बारीक, गोलाकार, खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला ‘रीफाइन’ किंवा ‘प्रोसेस’ करण्याची गरजच नाही.”
"तसं बघायला गेलं, तर ज्वारी हे काही दुय्यम धान्य नाही.” अर्णवचे बाबा म्हणाले.
"खेड्यांत जोंधळ्याची भाकरी हेच मुख्य अन्न असतं. जेवण झालं का हे विचारण्याऐवजी ‘भाकरी खाल्ली का?’ असं विचारतात खेड्यांत.”
"हो का, बाबा?”, शहरात जन्मलेल्या अर्णवला ही माहिती नवीन होती.
"होय अर्णव.”, आई म्हणाली. "ज्वारी, बाजरी, नाचणी हे तसं बघायला गेलं, तर गरीब लोकांचं अन्न. म्हणजे तसा समज तरी आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की, ही आणि अशासारखी भरड धान्ये आता श्रीमंतांनी पण, किंवा विशेषत: श्रीमंत लोकांनी खाल्ली पाहिजेत.”
"असं का बुवा?”, अर्णवच्या वडीलांनी विचारलं.
"याचं कारण म्हणजे या धान्यांचं पोषणमूल्य. म्हणजे ही धान्ये किती पौष्टिक आहेत ते.”
"म्हणजे काय गं, आई?”
"हे बघ. आपण जे काही खातो की नाही, त्यातनं आपल्या शरीराला जे काही मिळतं ते त्याचं पोषणमूल्य. गहू, तांदूळ, मका यांतून आपल्याला प्रामुख्यानं पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट्स मिळतात. डाळी, अंडी, सोयाबिन यांतून प्रथिने म्हणजे प्रोटीन्स मिळतात. तेल, तूप, लोणी यांतून स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स मिळतात. भाज्या, फळांतून व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वं आणि मिनरल्स म्हणजे खनिजं आणि फायबर्स म्हणजे तंतूमय पदार्थ मिळतात.”
"हे सगळं तुम्हांला शाळेत शिकवलं असेलच ना, अर्णव?”, बाबांनी विचारलं.
"होय, बाबा.”, अर्णव म्हणाला.
"पण अर्णव, ही जी मिलेट्स आहेत ना, ती आपल्या नेहमीच्या धान्यांपेक्षा जास्त पौष्टिक असतात. ज्वारीत प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन बी-१ बी-२, बी-३ फायबर भरपूर प्रमाणात आढळले जाते. ज्वारीत असलेले फायबर हृदयासाठी उत्तम असतं. ते शरीरातून घातक कोलेस्स्ट्रल कमी करतं. ज्वारीमुळे हाडं बळकट होतात. ज्वारी खाणे कॅन्सरची शयता कमी करतं. नाचणीला सुपरफूड म्हणतात. यात कॅल्शियम, फायबर, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेनीज, झिंक वगैरे आढळतात. ही मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन कमी करण्यास लाभदायक असते. जवात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, सोडियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात आढळते. हे हृदयाच्या आजार व उच्च रक्तदाबापासून वाचवते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होत असते.”
"अरे वा, म्हणजे ही खरोखर सुपर फूड्स आहेत की!”, बाबा म्हणाले.
"हो ना. ही धान्ये खाल्ल्याने पोटातील उपकारक जीवाणू वाढायला मदत होते. हल्ली ‘ग्लुटेन फ्री’ अन्न खाण्याला किती महत्त्व आलं आहे की नाही? भरड धान्यांमध्ये ग्लुटेन नसते. शिवाय ही भरड धान्ये म्हणजे मधुमेही आणि हृदयविकाराचा त्रास असणार्यांना तर वरदानच आहेत.”
"ती कशी काय?”
"मिलेट्स खाण्याने रक्तातील साखर हळूहळू वाढते. रक्त घट्ट, चिकट करणारे पदार्थ मिलेट्सच्या खाण्याने कमी होतात. याशिवाय त्यात भरपूर अँटिऑसिडंट आहेत. इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. म्हणून भरड धान्ये पचायला हलकी आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम. त्यामुळे ती रोज वापरायलाही हरकत नाही.”
"पण ही मिलेट्स चवीला कशी लागतात गं आई?”
"अरे, अगदी चविष्ट असतात ही. या मिलेट्सचे कितीतरी प्रकारचे पदार्थ करता येतात. अगदी इडली डोशांपासून पिझ्झा, टिक्कीपर्यंत. हे सगळे पदार्थ आपल्या नेहमीच्या पदार्थांइतकेच किंबहुना त्यांपेक्षा काकणभर जास्तच चविष्ट लागतात.”
"मग आपण नेहमी खायला पाहिजेत ही मिलेट्स, नाही का?”, बाबा म्हणाले.
"खरंच आई. आपण नेहमी का नाही खात गं ही मिलेट्स?”, अर्णवनं विचारलं.
"कोण म्हणतं नेहमी खात नाही म्हणून?”, अर्णवची आई मिष्किलपणे हसत म्हणाली. "तुम्हाला सांगितलं की यात मिलेट्स आहेत की तुम्ही खाणार नाही. असंच लागतंय आणि वासच येतोय अशा सतरा शंका काढाल. म्हणून...”, आई बोलायची थांबली.
"म्हणून काय, आई?”
"म्हणून तुमच्या नकळत आपल्या सगळ्या जेवणात मी मिलेट्स वापरतच असते. पालेभाज्यांत मी ज्वारीच्या कण्या घालते. उपवासाच्या दिवशी आणि एरवीही वरई वापरते. आपल्याकडच्या थालीपीठाच्या भाजणीत तर सगळी मिलेट्स असतात. नाचणीचे लाडू तर आपल्याकडे होतातच. डोसे, इडलीचं पीठ भिजवतानाही मी त्यात मूठभर कुठलं तरी मिलेट टाकते आणि माझं सगळ्यात मोठं ट्रेड सिक्रेट म्हणजे नेहमी पोळ्यांसाठी आपण जे गहू दळून आणतो ना, त्यात थोडी का होईना, पण नाचणी असतेच.”
"कळलं का अर्णवराव, म्हणजे हे इतके गुणकारी मिलेट्स आपण खातोय आणि आपल्याला पत्ताही नाही.”, बाबा हसत म्हणाले. अर्णवही हसला.
"तेंव्हा अर्णव, तुझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना तू सांग ही माहिती आणि त्यांनाही वापरा म्हणावं मिलेट्स रोजच्या जेवणात.”
"हो आई, नक्की.”
"आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अर्णव. जगाच्या ४१ टक्के भरड धान्यांचे उत्पादन भारतात होते व त्यांचा वापर आणि उपयोग सर्वात जास्त भारतातच होतो. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भरड पिके अगदी कमी पाण्यावर आणि अगदी निकृष्ट जमिनीतही येतात. या पिकांवर फारसे रोग पडत नाहीत आणि अशा पिकांना खतं किंवा कीटकनाशकं यांची फफारशी गरज पडत नाही. त्यामुळं या धान्यांमध्ये कोणत्याही खतांचे किंवा कीटकनाशकांचे विषारी अंश नसतात. हल्ली ‘ऑरगॅनिक’ अन्नाची किती चर्चा होते की नाही? मिलेट्स ही जात्याच ‘ऑरगॅनिक’ आहेत. पाणीटंचाईची केवढी मोठी समस्या जगाला भेडसावते आहे! आणि हे संकट अधिकाधिक मोठंच होत जाणार आहे. अशा परिस्थितीत मिलेट्स हे जगाला वरदान ठरू शकेल.
"अच्छा. म्हणून हे आंतरराष्ट्रीय भरडधान्ये वर्ष होय?”
"हो, म्हणूनच.”
डॉ. संजीव कुलकर्णी