अंगणी प्राजक्ताचे सडे !

06 Dec 2023 10:16:21

अंगणी प्राजक्ताचे सडे !
प्राजक्त बहरून आला की, नखशिखांत बहरतो, शिवाय त्याची फुले खुडावी लागत नाहीत. ती आपोआप पडतात आणि अंगणात सर्वत्र फुलांचा सडा होतो. असेच काहीसे पावसाळा ऋतू संपता संपता कोकणात, ग्रामीण भागासह शहरी भागात होते. प्राजक्ताची फुले अलीकडे बहरू लागली असून ज्या ज्या ठिकाणी ही झाडे आहेत त्या त्या ठिकाणी फुलांचा सडा होत आहे. साधारणता ऑगस्ट महिन्यानंतर प्राजक्ताच्या फुलांना बहर येण्यास सुरुवात होते. प्राजक्त हे फुलझाड असून ते मुलत: भारतीय आहे. देशातल्या बहुसंख्य राज्यात हे फुलझाड आढळते. अनोख्या सुगंधामुळे, आकारामुळे आणि रंगामुळे याच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक इत्यादी नावाने ते ओळखले जाते. याची फुले पांढरी शुभ्र असतात. फुले रात्री उमळून गळतात यामुळे त्यास ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही म्हणतात. त्याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच असतात. त्याची पाने खरखरीत असतात. आयुर्वेदात त्याच्या पानाफुलांचा औषधी गुणधर्म म्हणून उल्लेख आढळतो. जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी पानांचा उपयोग केला जातो. ही फुले अत्यंत नाजूक असतात. पांढर्‍या पाकळ्यांची फुले, देठ केशरी रंगाचा असतो. फुलांच्या देठापासून ‘सोनकेसरी’ रंग तयार करतात. पुराणात, धार्मिक ग्रंथात यांचा उल्लेख आढळतो. अनेक कवी, कवयित्री यांनी प्राजक्तावर कविता केलेल्या आहेत. कोकणात ग्रामीण भागात अनेक घरांसमोर आजही पारिजातकाची झाडे आढळतात. पावसाळ्यात रानमाळावर विविध आकार, प्रकारच्या फुल झाडांना बहर आलेला असताना गावांमध्ये, बागेत, सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणात प्राजक्त बहरू लागले आहेत. या हंगामात अंगणात, रस्त्यावर झाडाखाली पांढर्‍याशुभ्र फुलांचा सडा , कोकणातील ग्रामीण भागात हमखास पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताची फुले, पाने, बिया, साल औषधी म्हणून उपयोगी आहेत. यापासून हर्बल तेल तयार केले जाते. प्राजक्त पश्चिम बंगाल राज्याचे राज्यफुल आहे. जगात प्राजक्ताच्या पाच जाती आहेत. १४ रत्नांपैकी एक रत्न मानले जाते. विविध प्रकारची अत्तरे, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. देवी लक्ष्मीला हे फुल अत्यंत प्रिय समजले जाते.
( सहा.शिक्षक.अजित शेडगे, माध्यमिक विद्यामंदिर रातवड ) 
Powered By Sangraha 9.0