
(शाळेच्या इयत्ता नववीच्या वर्गामध्ये अजय, विजय, संस्कृती, संपदा विचारात पडलेले दिसतात. प्रश्नात पडलेल्या मुद्रेत. एवढ्यात अजिंक्य, शौर्य, प्रगती ओवी या वर्ग मित्रांचा प्रवेश. आपल्या मित्रांना या अवस्थेत पाहून अजिंक्य अजयला म्हणतो.)
अजिंक्य : अजय, तुमचे चेहरे का पडले आहेत?
विजय : (चेष्टेने) आमचे चेहरे पडले? कुठे? चला शोधूया..
अजिंक्य : विजय, मी चेष्टा-मस्करी करत नाही. तुम्ही कोणत्या विचारात पडले आहात?(थोडं थांबून) म्हणून तसे म्हटले.
विजय : अरे, अजिंक्य मी विनोद करत होतो. हे बघ ना अजय, संस्कृती, संपदा किती विचारात पडलेले दिसत आहेत. म्हणून मीही विचारात पडलो आहे.
शौर्य : कोणता विचार? कोणता प्रश्न? काय झाले? आम्हांला सांग ना!
संस्कृती : अरे! शौर्य, किती प्रश्न विचारतो आहेस.
प्रगती : ‘अरे, अरे, शौर्य. ठेव जरा धैर्य '(सगळ्यांची हास्यमुद्रा)
संपदा : अरे, आता आपल्या शाळेचे ‘गॅदरिंग' आहे ना..
शौर्य : मग काय झाले? माझ्यासाठी तर ‘गॅदरिंग' म्हणजे ‘फुल टू धमाल.' आनंदी आनंद!
आनंदी आनंद गडे,
जिकडे तिकडे चोहीकडे...
प्रगती : अरे, शौर्य..(शौर्यला शांत करण्याच्या आविर्भावात)
शौर्य : (स्वतःला सावरत, तोंडावर बोट ठेवत)ओके..
संपदा : आपल्याला वेगळाच विषय मिळाला आहे ना.
अजिंक्य : वेेगळा? कोणता वेेगळा विषय?
विजय : (मध्येच विनोदी शैलीत) संपदाच्या नावाप्रमाणेच ‘महाराष्ट्राची...लोकधारा'
अजिंक्य : हे तर सगळ्या शाळेला माहित आहे. मग यात एवढे वेगळे काय? ज्याचा तुम्ही एवढा विचार करताय!
संपदा : (प्रश्नार्थीपणे आश्चर्य आविर्भावात)पण यात एवढे वेगळे काय?
ओवी : अगं, संपदा हा तर फार महत्त्वाचा विषय आहे.
अजिंक्य : हो! हा तर आपल्यासाठी फार महत्त्वाचा विषय! आपल्या स्वाभिमान-अभिमानाचा विषय!
ओवी : माझे आजी-आजोबा या विषयावर कित्येकदा तासन्तास बोलत असतात.
विजय विजयच्या शैलीत) माझे सुद्धा आजी आजोबा बोलतात.
अजय : पण या विषयावर आम्हाला नेमके काय सादर करायचे ते कळत नाही. काहीही सादर केले अन् ‘करायला गेलो गणपती अन् झाला मारूती' अशी अवस्था होईल आपली.
विजय एकदम) निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम..
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराज की जय!
आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचा विजय असो!
महाराष्ट्रातील कर्तृत्वान जनतेचा विजय असो!
शौर्य : हो विजय अगदी बरोबर!
‘मनाचे श्लोक' लिहिणारे संत समर्थ रामदास स्वामी, भारताचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वच्छता कर्मयोगी संत गाडगेबाबा
संपदा मध्येच) हे तर आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील संत आहेत.
विजय : श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, ताजुद्दिन बाबा की जय! सर्व संतांचा जय असो!
शौर्य : (एकदम गाऊन)
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
विजय विजयच्या शैलीत-अजय, संस्कृती, संपदाकडे बघत म्हणतो) पडला का काही प्रकाश? महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल.
शौर्य : अरे, हीच तर आपली महाराष्ट्राची लोकधारा आहे.
विजय : आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वराज्यासाठी लढणारे सारेच शूरवीर मावळे यांचा पराक्रम विसरून चालणार नाही. हा आपल्या उज्ज्वल यशाच्या परंपरेचा वारसा आहे.
शौर्य : हो! तोच आपल्या महाराष्ट्रातील जीवनाच्या अस्तित्वाचा आरसा आहे. आपला उज्ज्वल इतिहास आहे.
प्रगती : जय जिजाऊ, जय शिवराय॥
विजय : जय भवानी, जय शिवाजी॥
ओवी : गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
प्रगती : कवी जगदीश खेबुडकर
संस्कृती : म्हणजे?
ओवी : आपला वारसा, आपल्या महाराष्ट्राचा वारसा, हीच तर आपली खरी परंपरा आहे.
अजिंक्य : विश्वासाठी, जगासाठी ‘पसायदान' कोणी लिहिले, तुला माहित आहे ना?
संस्कृती : हो! संत ज्ञानेश्वर महाराज.
अजिंक्य : क्रिकेटचा ‘देव 'कोणाला म्हटले जाते?
विजय : (विजयच्या खास शैलीत)दी ग्रेट क्रिकेटर सचिन तेंडुलकर.
ओवी : आपल्या महाराष्ट्रातील भारतरत्न गायक, गायिका कोण आहेत?
संस्कृती : पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर.
अजिंक्य : अगदी बरोबर! आपल्या महाराष्ट्रामध्ये लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ कृष्ण गोखले, आचार्य विनोबा भावेे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व होऊन गेले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने अजरामर झाल आहेत. किती मोठा इतिहास आहे स्वातंत्र्याचा. देश, समाज परिवर्तनाचा, मराठी माणसाचा! महाराष्ट्राचा!
प्रगती : संस्कृती! ज्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळाले ते कोण आहेत? तुला माहित आहे ना?
संस्कृती : हो! माहीत आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्र्वेे, राजर्षी शाहू महाराज.
शौर्य : (मोठ्या स्वाभिमान-अभिमानाने) आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, डॉ.केशव बळीराम हेडगेवार, प्रकाश आमटे, अण्णा हजारे, मेधा पाटकर, ‘जाणता राजा' चे लेखक-दिग्दर्शक बाबासाहेब पुरंदरे, अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ इत्यादी.
विजय: (स्वाभिमानी-अभिमानी शैलीत) देशासाठी, मानवतेसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समाजसेवक, साहित्यिक, खेळाडू, कलाकार, नेते, वक्ते, शेतकरी, कामगार आणि सर्व क्षेत्रातील महान कर्तृत्ववान लोकांचा जयजयकार असो! जयजयकार असो!
शौर्य : जयजयकार असो! जयजयकार असो!
विजय : आणि माझ्या मित्रांनो! तुम्हाला माहीतच आहे! महाराष्ट्रातील राजकारणात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, अजित पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, बच्चू कडू यांची नावेे अग्रेसर आहेत. प्रसिद्ध आहेत.
शौर्य : (एकदम) अरे, हो! आज महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नेते कार्यरत आहेत. लोकांच्या न्याय, हक्कासाठी! सत्यासाठी!
प्रगती : हो, राजकारण महत्वाचे आहे. पण आता ‘राजकारण' थोडं बाजूला ठेवू या.
शौर्य : ओके...
विजय : शेतकरी, कामगार, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि मराठीतील आवडते निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, गायक, गायिका, अभिनेते, निवेेदक, मुलाखतकार, तंत्रज्ञ, कामगार सर्वच बरं का!
शौर्य : (स्वाभिमान-अभिमानाने) आपल्या भारताच्या महाराष्ट्रातील भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकर, अण्णासाहेब किर्लोस्कर, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, प्रल्हाद शिंदे, अशोक पत्की, दादा कोंडके, निळू फुले, श्रीराम लागू, नाना पाटेकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, आनंद शिंदे, दिलीप प्रभावळकर, रमेश देव, सुधीर गाडगीळ, सुलोचना लाटकर, जयश्री गडकर, सुलोचना चव्हाण, रीमा लागू, मधू कांबीकर, भरत जाधव, स्वप्निल जोशी, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव ही नावे पुरेशी आहेत.
विजय : महाराष्ट्रातील ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.अनिल काकोडकर, डॉ.पंडित विद्यासागर यांच्यासारख्या भारतातील, महाराष्ट्रातील महान वैज्ञानिकांनी विज्ञानाचा वारसा समृद्ध केला आहे.
ओवी : अगदी बरोबर विजय! शौर्य! महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील सर्व महान कर्तृत्ववान माणसे, त्यांचे कर्तृत्व, कला हीच आपली खरी लोकधारा आहे.
अजिंक्य : आपला ‘मराठी दिन' ज्यांच्या नावाने साजरा केला जातो ते म्हणजे ‘कुसुमाग्रज' आणि ‘कुसुमाग्रज' म्हणजेच ‘नटसम्राट' या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक विष्णू वामन शिरवाडकर!
विजय : अजिंक्य! अगदी बरोबर! आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे, सर्वांचे आवडते लेखक पु.ल.देशपांडे
संस्कृती :
हिरवेे हिरवेे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती.. कवी?
प्रगती : कवी बालकवी
ओवी : सांग, सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?..
कवी?
शौर्य : कवी मंगेश पाडगावकर
अजिंक्य : आपल्याला गुरुजींनी सांगितले आहे ना.. गीतरामायण लिहिणारे, कवी, गीतकार, आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर
प्रगती : देणाऱ्याने देत जावेे घेणाऱ्याने घेत जावेे
घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे.
ओवी : कवी विंदा करंदीकर.
प्रगती : अरे, संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तवा मिळते भाकर
ओवी : कवयित्री बहिणाबाई चौधरी
अजिंक्य : हो! कवी केशवसुत, वि.स.खांडेकर, साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे, कवी बोरकर-मर्ढेकर, आचार्य प्र.के.अत्रे, कवी वसंत बापट, शांताबाई शेळके, सुरेश भट, नारायण सुर्वे, व. पु. काळे, विजय तेंडुलकर, मंगेश तेंडुलकर, राम शेवाळकर, प्रा.शिवाजीराव भोसले, अविनाश धर्माधिकारी, असे महान कवी, कथाकार, नाटककार, व्यंगचित्रकार, साहित्यिक, समीक्षक, लेखक, वक्ते आपल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा' समृद्ध करणारे आहेत ना! हा वारसा किती महत्त्वाचा आहे. अनमोल आहे. याचा प्रचार-प्रसार केला पाहिजे.
ओवी : (लगेच)
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
विजय विजयच्या खास शैलीत)
आले का काही लक्षात! ध्यानात..
संस्कृती एकदम) हो! आम्ही चालवू हा पुढे वारसा..
विजय बिनधास्तपणे-मोठ्या आत्मविश्वासाने कविता म्हटल्याप्रमाणे)
नृत्य, गीत, नाटक, झाडे, वेली, पाने, फुले, नद्या, पर्वत, डोंगर, सह्याद्री, सर्व क्षेत्रातील नावीन्य हेच तर महाराष्ट्राची संस्कृती आहे.
शौर्य : कविता, ओवी, भूपाळी, पोवाडा, भारूड, जागरण, लोकगीत, अभंग, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र इत्यादी.
विजय : अष्टविनायक, जेजुरी, ज्योतिर्लिंग, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, देहू, आळंदी, अक्कलकोट, शिर्डी, शेगाव(एकदम-भक्तीभावाने)अंबादेवी, एकविरा, सप्तशृंगी, चतुर्श्रुंगी माता की जय! रामायण, महाभारतील महाराष्ट्राचे संदर्भ...
शौर्य : महाराष्ट्रातील नद्या, निसर्ग, पर्यटन स्थळे, गड-किल्ले आणि ही महाराष्ट्राची पवित्र भूमी, संतांची भूमी! विविधतेत एकता हेच तर महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे!
विजय स्वाभिमानी आविर्भावात) आपल्या देशाचा इतिहास! आपल्या महाराष्ट्राचा इतिहास!
प्रगती : विजय, शौर्य! आपले सण विसरलात का? गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, ईद, कोजागिरी, मंगळागौर, नूतन वर्ष, मकर संक्रांत, गुढीपाडवा, धुलीवंदन, बैलपोळा, होळी, दहीहंडी..
विजय, शौर्य : हो, आम्हाला माहीत आहे.
शौर्य: (एकदम) आणि प्रगती! महाराष्ट्रातील खेळांमध्ये कबड्डी, कुस्ती इतर खेळ तर भारीच आहेत.
अजिंक्य : विजय, शौर्य, प्रगती! आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूरच्या वारीची ख्याती तर विश्वात प्रसिद्ध आहे. आषाढी-कार्तिकीला तर पंढरपुरामध्ये भक्तीचा महोत्सवच असतो!
विजय : हो! अगदी बरोबर(विजयच्या शैलीत) वारी.. वारी, लई.. लई भारी! टाळ, वीणा, मृदुंग, तबला, ढोलकी, वारकऱ्यांच्या हातातील भगवे झेंडे, विठू नामाचा गजर! जयघोष!
शौर्य : रामकृष्णहरी! जय! जय! रामकृष्णहरी!
अजिंक्य : (मोठ्या भक्तीभावाने संतांचे काही निवडक अभंग गातो)
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुले वेचिता बहरू कळीयांसि आला॥ संत ज्ञानेश्वर
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा॥ संत नामदेव
माझे माहेर पंढरी॥ संत एकनाथ
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविते॥ संत तुकाराम
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग॥ संत चोखामेळा
कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी॥ संत सावता माळी
हे केशवाचे ध्यान धरूनि अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे॥ संत गोरा कुंभार
महाराष्ट्र तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा॥
समर्थ रामदास स्वामी
तसेच संत बहिणाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, संत कान्होपात्रा यांचे अभंगही भक्तीमय आहेत.
विजय : वा! अजिंक्य वा! तुझे संतांच्या अभंगाबद्दलचे ज्ञान तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य आहे. (सगळे अजिंक्यसाठी टाळ्या वाजतात)
अजय : अरे, हो खरंच किती वैभवशाली परंपरा आहे. आपल्या संतांची, भक्तीची, आपल्या साहित्याची, आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची, आपल्या देशाची!
शौर्य : जय जय महाराष्ट्र! जय जय महाराष्ट्र!
विजय मध्येच) जय महाराष्ट्र! भारत माता की जय! (लगेच शौर्य सुद्धा म्हणतो..)
शौर्य : भारत माता की जय! जय महाराष्ट्र!
सगळे जण : भारत माता की जय! जय महाराष्ट्र!
अजिंक्य : चला तर मग करूया ‘गॅदरिंग'ची तयारी.
विजय : अजिंक्य! स्नेहसंमेलनाची तयारी! (स्वाभिमानी मुद्रेत)
शौर्य : हो! वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी (विजयच्या सुरात सूर. प्रतिसाद देत)
विजय सकाळच्या प्रहरी वासुदेव आला असल्याच्या आविर्भावात) वासुदेव आला! वासुदेव आला! ‘महाराष्ट्राची लोकधारा' हा विषय आता सगळ्यांच्या लक्षात आला.
शौर्य मध्येच गाण्याच्या सुरात) लक्षात आला! ध्यानात आला!
विजय : श्री पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय! दान पावलं, दान पावलं. गणपती बाप्पा मोरया!
शौर्य : गणपती बाप्पा मोरया!
अजिंक्य : गणपती बाप्पा मोरया!
सगळे जण : गणपती बाप्पा मोरया
अजिंक्य :चला तर मग आपण सर्वजण
नवीन वर्षाचा ‘नवा संकल्प' करूया!
महाराष्ट्राची लोकधारा उज्ज्वल करूया
विजय : जय भारत! जय महाराष्ट्र! जय मराठी!
सगळे जण : जय जय जय जय महाराष्ट्र!
(‘महाराष्ट्राची लोकधारा' हा विषय कळल्यामुळे, समजल्यामुळे आता सर्वांचे चेहरे सूर्य, चंद्र, ताऱ्यांसारखे उजळलेले दिसतात.)
पडदा पडतो
- नाट्यलेखन : राघवेंद्र गणेशपुरे, शिक्षक, डी.ई.एस.सेकंडरी शाळा, टिळक रोड, पुणे
संकल्पना : सुवर्णा सहस्त्रबुद्धे, शिक्षिका, डी.ई.एस.सेकंडरी शाळा, टिळक रोड, पुणे