निसर्गाचे नववर्ष

शिक्षण विवेक    13-Mar-2023
Total Views |


Nature's New Year 
 
सकाळी जाग आली तीच अनेक पक्ष्यांच्या सुमधुर किलबिलाटाने. कोकिळांचं कुहूकुहू नेहेमीपेक्षा जास्तच गोड वाटत होतं. दयाळ (Magpie Robin) पक्षी दर दहा फुटांवर वेगळ्या चालींचं गाणं म्हणत होता. सुभग (iora) पक्षी इतर दिवशी भासतो त्यापेक्षा जास्तच आकर्षक दिसत होता आणि तोही सुमधुर गात होता. का बरं असं वाटतंय? गुढीपाडवा काही दिवसांवर येऊन ठेपलाय; म्हणजेच मराठी नववर्ष सुरू होणार. चैत्र सुरू होणार.. म्हणजेच, त्याचं स्वागत करायला आपला वसंत ऋतू येणार. ही सगळी लगबग त्यासाठीच असणार की. आपल्या दृष्टीने गुढीपाडवा साजरा करणं म्हणजे दारावर तोरण लावायचं, परंपरेप्रमाणे गुढी उभारायची, कडुनिंबाचं पानं खायचं, इतरांना शुभेच्छा द्यायच्या आणि जेवायला गोड-धोड करायचं, झाला सण साजरा. पण निसर्गातल्या इतर घटकांचं मात्र तसं नसतं.
मार्च महिन्याचा कडक उन्हाळा सुरू व्हायच्या वेळेस पानझडी झालेले वृक्ष नवनवीन पालवी अंगावर घेऊन सजू लागतात. आंब्याचं आणि काजूचं झाड छान मोहरून आलेलं असतं. त्या मोहोरावर अनेक प्रकारचे कीटक आलेले असतात, भुंगे आलेले असतात. वृक्षच कशाला लहान झाडे-झुडपे, वेली सर्वच्या सर्व अंगावर पाचूचे अलंकार घालून स्वागताला तयार होतात. काही विशिष्ट झाडा-झुडपांवर फुलपाखरे अंडी घालतात. पिवळा धम्मक अमलतास (बहावा) आणि लाल-शेंदरी पांगारा, पळस हळदी-कुंकवाची आठवण करून देतात. अनेक छोटे पक्षी नवीन आलेली पालवी मटकवण्यासाठी फांद्यांवर गर्दी करू लागतात. नाचण हा तर या फांदीवरून त्या फांदीवर नाचायला लागतो. या सर्वांना आता चाहूल लागलेली असते ती घरटं बांधण्याची आणि त्यांची लगबग चालू असते ती आपला जोडीदार निवडण्याची. कशावरून निसर्गच त्यांना तो नवीन पालवीचा खुराक देत नसेल? जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी प्रत्येकाच्या तर्‍हा वेगळ्या. काही पक्षी निरनिराळ्या पद्धतीने आवाज काढून, तर काही आपल्या अंगावरचे रंग अधिक भडक करून जोडीदाराला आकर्षित करतात. हे असे रंग भडक करण्याची ऊर्जा नक्की मिळते कुठून.. अर्थातच, नव्याने आलेल्या पालवीने आणि त्यावर आलेली किडे-पाखरं खाऊन. ही मिळालेली ऊर्जा त्यांना फक्त आकर्षित करण्यासाठी वापरायची नसते, तर जोडीदार मिळाल्यावर मीलनानंतर होणार्‍या आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी कराव्या लागणार्‍या घरट्यासाठी वापरायची असते.
ऊन वाढू लागलं की, छोटे तलाव किंवा डबकी यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. मग त्यात असलेले मासे, गोगलगाई, खेकडे असे प्राणी टिपायला सोपे जातात आणि हीच पाणथळीमध्ये आढळणार्‍या पक्ष्यांसाठी ऊर्जा ठरते. विणीच्या काळात कमल पक्ष्याच्या (Pheasant-Tailed Jacana) मानेच्या मागच्या बाजूला पिवळट-सोनेरी असा एक पट्टा यायला लागतो. तो सूर्याच्या प्रकाशात अक्षरशः चमचमतो.
या विणीच्या हंगामामध्ये सर्वच पक्ष्यांत खूप बदल झालेले आढळतात. सुभग पक्ष्यात नेहेमीचा काळा-पिवळा रंग अजून गडद काळा-पिवळा होतो. रंगीत पाखुर्डीच्या (Painted Sandgrouse) अंगावरचे पट्टे अधिक चमकदार दिसू लागतात. राखी वटवट्याचा (Ashy Prinia) करडा रंग पूर्ण राखाडी होतो. निळ्या माशिमारचा (Tickell's Clue Flycatcher) कंठाचा पिवळट-केशरी रंग गडद केशरी होतो. इतर मोसमात फारसा नजरेत न येणारा हळद्याचा (Golden Oriole) पिवळा रंग वसंतात मात्र सोनेरी रंगासारखा भासतो. दयाळचा काळा रंग अधिक प्रखर होतोच; पण त्याचबरोबर जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी तो दर काही मिनिटांनी वेगवेगळे सूर काढायला लागतो. त्याची दर वेळेस येणारी निराळी शिळ ऐकून आपल्याला संभ्रम पडतो की, हा आवाज नक्की आहे कुणाचा, आधी तर कधी ऐकला नाही. त्याच वेळेला तिथे जर दुसरा नर आला, तर मात्र त्यांची जुगलबंदी ऐकण्यासारखी असते. गाय बगळ्याच्या (Cattle Egret) चोचीत अचानक जांभळा, लाल आणि पिवळा असे रंग दिसू लागतात. हे सर्व रंगांमधले बदल झाले. पण, काही चंडोल (Rufous Tailed Lark) जातीचे पक्षी उडतानाची काही विशिष्ट कसरत करून मादीला आकर्षित करतो. त्याला या विणीच्या काळात बघणं ही एक प्रकारची पर्वणीच असते. सुगरण (Caya Weaver) पक्षी मात्र पावसाळ्याच्या सुमारास आधी घरटे बांधून मग मादीबरोबर मीलन करतो. मोठ्या कष्टांनी बांधलेलं हे घरटं मादी सुगरण कधीकधी नाकारतेसुद्धा. पण तरी, नर सुगरण पक्षी जिद्दीने दुसरं घरटं लगेच बांधायला घेतो. अशी अजून असंख्य उदाहरणं आहेत की, जी आपल्याला खर्‍या अर्थाने भुरळ पाडतील. मनुष्य जरी निसर्गाचा एक घटक असला, तरी असे कुठलेही दर्शनीय बदल त्यात घडत नाहीत. सणासुदीच्या दिवशी आपल्याला रंगीत कपडे घालावे लागतात; पण यांना हे असे कृत्रिम रंगीबेरंगी कपडे चढवायची कधीच गरज भासत नाही; किंबहुना निसर्गच त्यांना ते मिळवून देतो आणि काढूनही घेतो. ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीतच, त्या गोष्टींचा अधिक विचार न करता; निसर्गातल्या इतर घटकांकडून आपल्याला जे काही अनुभवता येतं किंवा जे जे काही पदरात पडतं ते निमूटपणे स्वीकारू या.
अमोल बापट