कला, छंद देई नित्यानंद!

शिक्षण विवेक    02-Mar-2023
Total Views |

kala 
 
तहानलेल्या पाणी,
कोंडलेल्याची वाणी,
जगवितो क्षणोक्षणी,
छंद मला माझा!
मित्रांनो, छंद म्हणजे काय ते सांगा बरं! मी सांगू? ‘कितीही संकटे आली, तरी आयुष्याला जगण्याची नवी उमेद देण्याचे काम करणारी गोष्ट म्हणजे छंद!’
कला हा शब्द उच्चारल्यावर सर्वप्रथम कोणाची आठवण येते, तर साक्षात 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणार्‍या आपल्या मोरयाची अर्थात गणपतीबाप्पाची. आपल्या सर्वांनाही कधी तरी असे वाटते ना की, गणपती बाप्पासारख्या 64 नाही; पण किमान एका तरी कलेत आपण पारंगत असावं.
मला एक प्रसंग आठवतो. आमच्या शाळेची उन्हाळी सुट्टी सुरू होती. त्यातल्या एका रविवारी संध्याकाळी मी आणि माझे बाबा नाणी व नोटांचे प्रदर्शन पहायला गेलो. तिथे विविध देशांची नाणी, नोटा; तसेच शिवकालीन तांब्या, पितळ्याची पूर्वीची अगदी 4 पैसे, 2 पैसे, एक पैसा अशीही नाणी होती. आम्ही तिथून काही नाणी व नोटा विकत घेतले. पुढे गेल्यावर पाहिले तर ‘पोस्टल स्टॅम्पस्’चे प्रदर्शनही होते. विविध देशांतील हजारो स्टॅम्प, काही छोटे; तर काही मोठे तिथे ठेवून सजवले होते. आम्ही काही स्टॅम्पही विकत घेतले; तसेच त्याचे 2-3 अल्बमही तयार केले. ते माझ्या मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना दाखवले. त्यांना अशी बंद झालेली नाणी, नोटा व विविध देशांचे विविध स्टॅम्प, दुसर्‍या देशांची नाणी व नोटा जसं की, पौंड, दिरम, डॉलर वगैरे पाहून खूप कौतुक वाटलं व आनंद झाला. हा छंद माझ्या मनाला खूप आनंद देऊन गेला. अजूनही जेव्हा एखादं नवीन नाणं किंवा नोटा चलनात येते. तेव्हा ते मी माझ्या संग्रहात आणि अल्बममध्ये जमा करते.
माझा सर्वांत आवडीचा छंद म्हणजे पक्षीनिरीक्षण. हा छंद मला आनंद तर देतोच; पण माझी एकाग्रता व संयम राखण्याची शक्तीही वाढवतो. मी माझ्या अंगणात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी ठेवते. रोज पक्षी तिथे पाणी प्यायला येतात. कधी चिमण्या, कावळे, बुलबुल असे आपले रोजचे सखे-सोबती; तर कधी चष्मेवाला, नीलिमा (टिकल्स ब्लू), भारद्वाज, रॉबीन असे दुर्मिळ पक्षीही पाणी प्यायला, तर कधी अंघोळ करायला येतात. मला या माझ्या मित्रांचे निरीक्षण करण्यात आनंद मिळतोच; पण माझ्या व्यग्र दिनक्रमातून क्षणभर विसावाही मिळतो. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा खरंच वेळ जायचा नाही, तेव्हा त्यांच्यामुळे माझे तासन्तास कसे निघून जायचे हे मलाही कळायचं नाही.
अशीच एक गंमत आहे. माझे बाबा एकदा सिंहगड व्हॅली, पुणे येथे पक्षी निरीक्षणासाठी गेले होते. तिथे खूप वेळ बसूनही त्यांना एकही दुर्मिळ पक्षी दिसला नाही; परंतु माझ्याच अंगणात त्या दिवशी खंड्या, शिकारा असे दुर्मिळ पक्षी दिसले. आमच्याकडच्या निसर्गसंपदेमुळे झाडा-झुडुपांमुळे सर्व दुर्मिळ पक्षी आमच्या इथे आवर्जून भेट देतात ब मुक्कामास थांबतात.
माझी सर्वांत आवडती कला म्हणजे चित्रकला. मला एखाद्या दिवशी अभ्यासाचा कंटाळा आला की, मी मुक्तपणे, स्वच्छंदपणे कागदावर हवं ते चित्र रेखाटते. त्याने मला आनंद मिळतो, शांत वाटतं. मनाला, बुद्धीला जरा विश्रांती मिळते.
माणून जन्मत: काहीही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही; पण माणूस ज्या कला, छंद जोपासतो त्यातून मिळणारा आनंद हाच कायम त्याच्याबरोबर राहतो आणि त्याचं नावही त्या छंदातून किंवा कलेतून अजरामर राहू शकतं. याच कलेतून किंवा छंदातून माणसाने आपलं उदरनिर्वाहाचं साधन शोधलं, तर तो त्या क्षेत्रात जास्तीत जास्त वर्षं कार्यरत राहून त्या कलेची जोपासना करू शकतो किंवा आपले छंद वाढवू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं, तर आपल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदी किंवा आपल्या सर्वांचे लाडके पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे की, ज्यांनी आपलं अख्खं आयुष्यच आपल्या  शिवाजी महाराजांवर खर्च करून एक इतिहास घडवला. अजून एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार बाळासाहेब ठाकरे. सर्वप्रथम त्यांनी त्यांचा व्यंग्यचित्र काढण्याचा छंद ‘सामना’ या वृत्तपत्रातून जोपासला. त्यातून त्यांची कला सर्वदूर पोहोचली. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येकाने आपल्यातील कलागुण ओळखून, आपला छंद वाढवून त्याला वेळ द्या, छंद जोपासा. त्यातून स्वत: आनंद मिळवाचं; पण दुसर्‍यांनाही त्याचा उपयोग होऊ द्या!
- शर्वरी महाबळेश्‍वरकर, 9 वी,
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे