‘सुट्टी’ची शब्दगंमत

शिक्षण विवेक    28-Mar-2023
Total Views |

सुट्टी’ची शब्दगंमत
मित्र-मैत्रिणींनो,
वर्षभर अभ्यास, स्पर्धा, परीक्षा, निकाल या सगळ्यांतून तुम्ही जाता आणि मग तुम्ही जिची आतुरतेने वाट पाहात असता ती येते - उन्हाळ्याची मोठी सुट्टी! आज आपण सुट्टी आणि त्यासंबंधीचे शब्द जाणून घेणार आहोत.
सुट्टी हा ‘हॉलिडे’ या इंग्रजी शब्दाचा पारिभाषिक वा पर्यायी शब्द आहे. हॉलिडे (केश्रळवरू) हा शब्द मूळ प्राचीन अँग्लो-सॅक्सन हॅलिग-देएग किंवा हॅलिग-दॅग  दोन शब्दांपासून तयार झाला असून, त्याचा अर्थ पवित्र कार्याला अर्पण केलेला दिवस किंवा धार्मिक सण अथवा विधी असा आहे. म्हणजेच पूर्वीच्या काळी रोजच्या कामातून वेळ काढून या दिवशी फक्त पूजा-अर्चा करत असत. तसेच, दैनंदिन उद्योग, व्यवसाय, कामधंदा व कर्तव्यकर्म यांतून विरंगुळा मिळण्यासाठी, विश्रांती मिळण्यासाठीही सुट्टीचा उपयोग खूप प्राचीन काळापासून रूढ आहे. भारतात दसरा, दिवाळी, नाताळ, वगैरे सणांसाठी किंवा देवाच्या/ थोर पुरुषांच्या जयंती/पुण्यतिथीनिमित्तही सुट्टी असते; तसेच राष्ट्रीय सण (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी
असतात तेव्हाही सुट्टी असते. शाळा, न्यायालये, काही शासकीय कार्यालये यांना मोठी उन्हाळी सुट्टी असते.
सुट्टी लागली की, त्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो - प्रवासाला जातो, भटकतो, नातेवाईक -मित्र -मैत्रिणींना भेटतो, घरीच आराम करतो, वेगवेगळे छंद जोपासतो. छंद याचा अर्थ शब्दकोशात ध्यास, नाद, शौक, सोस असा दिला आहे. छंदामुळे मनोरंजन होतं, ज्ञानात भर पडते, मित्रही मिळविता येतात आणि श्रमामुळे आलेला थकवा घालवून मन आनंदी राहते. साधारणतः छंद चार प्रकारांत विभागता येतात : (1) वस्तू जमवणे - पोस्टाची तिकिटे किंवा स्वाक्षर्‍या जमविणे, ग्रंथ/ पुस्तकसंग्रह करणे, निरनिराळ्या चित्रविचित्र वस्तूंचा संग्रह करणे, (2) वस्तू स्वतःच तयार करणे - विणकाम-शिवणकाम, चित्रकला, शिल्पकला, घरातील किरकोळ दुरुस्त्या करणे, वगैरे (3) कलाकौशल्य- गायन, वादन, अभिनय, नृत्य इत्यादी (4) खेळ आणि व्यायाम- बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, गोल्फ, मासे पकडणे, शिकार करणे, पोहणे इ. खेळ लोकप्रिय आहेत.
छंदास लागणे किंवा भरणे म्हणजे एखाद्या गोष्टीच्या विशेष मागे लागणे आणि बाकी सारे विसरणे; त्यामुळे स्वतःचे नुकसान करून घेणे. छंद महत्त्वाचा; पण त्याचबरोबर बाकीही गोष्टींचे संतुलन राखावे लागते तसे न झाल्यास माणूस अडचणीत येतो म्हणून छंदास लागणे/ नादी लागणे/ भरीस पडणे याला थोडीशी नकारात्मक छटा आहे.
आता सुट्टीत करायची दुसरी गोष्ट म्हणजे प्रवास. याबाबत कवी मोरोपंत म्हणतात -
केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार ॥
शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार ।
देशाटनामुळे विविध प्रदेश, देश यांचा परिचय घडतो. व्यवहारज्ञान, जीवन जगण्याची समृद्ध कला व शास्त्र समजते. व्यक्तिमत्त्व संपन्न व बोलके होते. विद्वानांशी मैत्री होते. ज्ञानदेवांनीसुद्धा देशाटनाचे महत्त्व ओळखले होते. आपण कितीही ज्ञानी असलो, तरी देशाटनाशिवाय, तीर्थाटनाशिवाय आपल्या ज्ञानाला परिपूर्णता येणार नाही म्हणून ते ‘तीर्थावळीच्या’ अभंगात नामदेवांना सांगताना दिसतात, ‘परि एक अवधारीं वचन माझे॥ भूतळीची तीर्थे पहावीं नयनी।’
सुट्टीत काय करायला जास्त आवडेल? तर, याचं उत्तर तुम्ही नक्कीच मित्र-मैत्रिणी जमवून खेळायला आवडेल असं द्याल. ‘खेल’ या मूळ संस्कृत धातूपासून पुढे खेलति झाले आणि मराठीत खेळणे हे क्रियापद आले. एखाद्याने चांगली/ हुषारीची गोष्ट केली, तर त्याला खेळ करणं म्हणतात आणि एखाद्याने एखादी गोष्ट बिघडवली, तर त्याला खेळ केला म्हणतात. अशा बिघडलेल्या गोष्टीला खेळखंडोबा झाला म्हणतात. एखाद्याने कुठल्या गोष्टीचा ध्यास घेतला आणि त्यात त्याला वेड लागले तर जणू काही अंगात भूत शिरले आहे या अर्थाने ‘अंगात वारे खेळणे’ वापरतात. एखाद्याशी दुष्टपणे वागायची योजना आखली, तर त्याचा खेळ मांडला असं म्हणतात. जसे खेळ बघायला जमलेले खूप असतात; पण प्रत्यक्षात खेळणारे थोडेच असतात, तसेच प्रत्यक्ष काम करणारे कमी आणि त्याला बघणारे, नावं ठेवणारे खूप असतात, याला उद्देशून ‘खेळणार्‍यापेक्षा पाहणारे फार’ अशी म्हण आहे.
तर मित्र-मैत्रिणींनो कोरोनाकाळात ‘पर्यटन’ म्हणजेच प्रवासाची सोय करणार्‍या व्यवसायांवर, तुमच्या खेळण्यावर, बाहेर जाण्यावर खूप बंधने आली होती; पण आता सगळे सुरळीत होतं आहे. तेव्हा येणार्‍या सुट्टीत भरपूर खेळा, फिरायला जाऊन या आणि मजा करा!
तुमची,
नेहाताई

- नेहा लिमये