संवाद ऊसतोडणी कामगाराशी

शिक्षण विवेक    29-Mar-2023
Total Views |

संवाद ऊसतोडणी कामगाराशी
ऊसतोड कामगारांच्या व्यथा, संघर्ष जाणून घेऊन तो सर्वांसमोर आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील गोंजारी यांनी ऊसतोड कामगाराशी साधलेला हा संवाद!
प्रश्‍न : नमस्कार मामा, तुमचं नाव काय? आणि गाव कोणतं?
उत्तर : मी केज, जि. बीडचा रहिवासी. माझं नाव रामभाऊ श्रीहरी राठोड.
प्रश्‍न : इथे ऊसतोडीसाठी आलात का आपण?
मजूर : हो, आम्ही त्यासाठीच आलो आहोत.
प्रश्‍न : किती वर्षे झाली तुम्ही हे काम करत आहात?
मजूर : 15 वर्षांपासून.
प्रश्‍न : तुमचं वय आता किती आहे?
मजूर : माझं वय आता जवळपास 39 आहे. आता पूर्वीसारखं जोमाने न्हायं होत; पण करणार काय, जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत करायचं.
प्रश्‍न : तुमचा दिवस कसा सुरू होतो?
मजूर : रोज सकाळीच आम्हाला म्हणजे गड्यांना शेतात जावं लागतं. सकाळी 5.30-6ः00 च्या दरम्यान आम्हाला फडात ऊस तोडायला यावं लागतं. दिवसभर काम करून रात्री 9.00 ते 9.30 वाजतातच घरी जायला. बायका, पोरं सकाळी आठ वाजता येतात डबा घेऊन जेवायला. नंतर तेबी ऊस तोडू लागत्यात.
प्रश्‍न : तुम्ही कोणकोणत्या प्रकारचं काम करतात?
मजूर : तसं बघा, आम्ही 12 ते 15 तास काम करतो. ऊस तोडणे, माळ्या बांधणे, ट्रॉलीत टाकणे अशी कामं असतात.
प्रश्‍न : तुम्हाला रोजची किती हजेरी मिळते?
मजूर : पुरुषांना आणि महिलांना म्हणजे जोडीत मिळून 500 रुपये मिळते हजेरी आणि मग ऊस तोडून राहिलेले वाढे विकून, त्यात दररोजचा खर्च भागतो.
प्रश्‍न : दिवसभरात किती टन ऊस तोडता तुम्ही?
मजूर : एक मजूर जवळपास अडीच ते तीन टन आणि सर्व जण मिळून जवळपास 25 ते 30 टन ऊस तोडतो आम्ही.
प्रश्‍न : कारखाना जे मानधन देतो (एका टनाला रु. 240) ते किती वाढवून दिले पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?
मजूर : कारखान्याकडून खूप कमी पैसे मिळत्यात. अहो रोजंदारीवर गेलं, तर दिवसाला 500 रुपये भेटत्यात. आन् इथं जोडीत दिवसाला 500 रुपये भेटत्यात. कारखान्याकडून एका गड्याला किमान 700 ते 800 रुपये मिळावेत, ही आमची अपेक्षा आहे.
प्रश्‍न : ऊसतोडणीच्या कामात कोणत्या अडचणी येतात?
मजूर : ऊस तोडताना रानात कोयता लागतो, उन्हामुळं चक्कर येणे, डोकं दुखणे; तसंच वाढं अंगाला कापतं, कधी कधी सापसुद्धा चावतात.
प्रश्‍न : तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं नियोजन तुम्ही कसं करता?
मजूर : तसं बघायला गेलं, तर ही लहान पोरं सहा महिने आमच्यासोबतच असत्यात. त्यामुळं त्यांची शाळा पूर्ण होत नाही. गावी गेल्यावर पुन्हा त्यांना शाळेत घातलं जातं.
प्रश्‍न : तुम्ही समाधानी आहात का या कामात?
मजूर : हो, समाधानी आहे. ‘कष्ट हेच भांडवल’ अन् रात्री सुखाची शांत झोप, अजून काय पाहिजे.
प्रश्‍न : तुमच्यासोबत अजून किती व्यक्ती आहेत?
मजूर : आम्ही 30 जण आहोत.
प्रश्‍न : तुमच्या गावाची परिस्थिती सध्या कशी आहे?
मजूर : गावाकडं सध्या पाणीटंचाई हाय, रोजगार न्हाई हाताले, उपासमारीची वेळ, दुष्काळचं म्हणावा. सरकार लक्ष देईना, गावं ओस पडल्यात.
प्रश्‍न गावाकडे किती रोजंदारी मिळते?
मजूर : गावाकडे रोजगार न्हायतचं, आन् मिळालंच एखादं काम, तर गड्याला 300 रु. अन् बाईला 180 रुपयांत काम करावं लागतं दिसभर.
प्रश्‍न : कारखानदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
मजूर : मुलांच्या शिक्षणाची सोय, रोजंदारी वाढवून द्यावी, आरोग्यविमा, अपघातविमा उतरवावा, घरातल्या एकाला तरी किमान सरकारी नोकरी द्यावी. एखाद्याला दुखापत झाली, तर निदान दवाखान्याचा खर्च करावा. ऊसतोडी यंत्रामुळे आमचं भवितव्य धोक्यात आलं आहे. रोजगारावर गदा आली आहे. याचा विचार सरकारने केला पाहिजे. ऊसतोडणी कामगारांना पर्यायी रोजगारव्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. कोर्टाची ऑर्डर असूनही साखर कारखाने ऊसतोडणी मजूरांना कारखान्याचे कामगार म्हणून मानण्यास तयार नाहीत.
- आमच्यासाठी कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे.
- मुलांसाठी साखर शाळा किंवा निवासी शाळांची सोय करावी.
- मूलभूत सोयी उपलब्ध करून द्याव्यात.
- कारखान्यावर महिला व बालक यांच्यासाठी दवाखान्याची सोय उपलब्ध करावी.
- कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची सुविधा करावी.
- शासकीय योजनांची माहिती मजुरांपर्यंत पोहोचवणे.
- पिण्यासाठी पाणी, शौचालय उपलब्ध करून द्यावेत.
अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. त्या कधी पूर्ण होतील, याची वाट आम्ही बघतोय.
स्वप्नील गोंजारी, शिक्षक,
कै.ग.भि. देशपांडे विद्यालय, बारामती