निसर्गपूरक रंगोत्सव!

शिक्षण विवेक    03-Mar-2023
Total Views |

निसर्गपूरक रंगोत्सव!
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात प्रत्येक धर्माचे सण व उत्सव उत्साहाने साजरे करण्याची परंपरा आहे. भारतामध्ये फाल्गुन महिन्यात साजरा केला जाणारा 'होळी' हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. सुष्ट शक्तींनी दुष्टांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. देशातील अनेक प्रांतात होळी व रंगपंचमी हे सण रंग खेळून साजरे करण्याची प्रथा आहे. परंतु सध्या सर्वत्र प्रदूषणाच्या भस्मासूराने थैमान घातले आहे. कृत्रिम रासायनिक रंग वापरून होळी खेळणे हे प्रदूषणात वाढ करणारे आहे. हे कृत्रिम रंग पर्यावरणास घातक तर असतातच; शिवाय आपल्या आरोग्यासदेखील हे रंग धोकादायक ठरतात.
पूर्वी होळी व रंगपंचमीला निसर्गातील पाने, फुले व फळे इत्यादी नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरले जात. कालांतराने ह्या नैसर्गिक रंगांची जागा सिलिका, ऍस्बेस्टोस, जेन्शियन व्हायोलेट यांसारखी प्रकृतीस हानीकारक रसायने घातलेल्या कृत्रिम रंगांनी घेतली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अशा कृत्रिम रंगांनी होळी व रंगपंचमी खेळल्यास बाहेरील इतर रासायनिक कचऱ्यासारखे हे विषारी रंगदेखील सांडपाण्यातून शेवटी आपल्या नदीत जाऊन मिसळतात. मग जीवनदायिनी नदीच्या अशा मानव-निर्मित प्रदूषित पाण्यातून आपल्याच पोटात परत हे विष जाते. कारण निसर्गात Toxins-in Toxins-out हे चक्र अव्याहतपणे सुरू असते. या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वांनी मिळून आत्ताच शाश्वत उपाय शोधायला हवा.
सर्वप्रथम, कृत्रिम रासायनिक रंगांनी होळी खेळणे बंद केले पाहिजे. अशा रंगांनी होणारे हवा-पाणी-जमिनीचे प्रदूषण टाळण्याकरिता होळी व रंगपंचमी हे सण रंग खेळून साजरे करण्याची प्रथा मोडणे हा एक प्रभावी शाश्वत उपाय ठरू शकतो. शिशिर ऋतुमध्ये अनेक वनस्पतींची पानगळ होते. मग निसर्गाचे ऋतुचक्र पुढे सरकते आणि निसर्गात नवचैतन्य घेऊन येणाऱ्या वसंत ऋतुचे दिमाखदार आगमन होते. होळी व रंगपंचमी हे सण ऐन वसंत ऋतुमध्ये फाल्गुन महिन्यात येतात ज्यावेळी खुद्द निसर्गातच रंगपंचमीचा अद्भुत खेळ सुरू असतो. याच सुमारास काटेसावर, पळस, पांगारा, गणेर, ताम्हण, अंजनी, वारस, कांचन, शिरीष असे अस्सल देशी वृक्ष अफलातून बहरतात. त्यांचे अप्रतिम पुष्पवैभव डोळ्यांनी न्याहाळणे हा एक बिनखर्चाचा अवर्णनिय आनंद असतो. नुसतेच पुष्पवैभव नाही तर या सुमारास कुसुंब, पिंपळ, पिंपर्णी, टेंबुर्णी अशा देशी वृक्षांवर तांबूस लालसर नवपालवी उगवते तेव्हा या वृक्षांचा पर्णसंभार अगदी बघत रहावा असा लाजवाब दिसतो. अधिकाधिक जणांनी वसंत ऋतुत निसर्ग मुक्तहस्ते जादुई रंगांची ही जी उधळण करत असतो तिचा मनमुराद आस्वाद घेत हीच होळी व रंगपंचमी मानल्यास (Virtual Holi and Virtual Rangapanchami) निसर्गाचा ऱ्हास नक्कीच टाळला जाऊन मनास निखळ आनंद मिळेल.
होळी व रंगपंचमीला रंग खेळावेसे वाटले तर पर्यावरण स्नेही पर्याय म्हणजे नैसर्गिक रंगांचा वापर करणे. कारण नैसर्गिक रंग घराच्या सांडपाण्यातून अगदी नदीत जाऊन मिळाले तरीदेखील काही अपाय नाही. त्यामुळे आपली जीवनदायिनी अजिबात प्रदूषित होत नाही. हे नैसर्गिक रंग उधळल्यावर हवेत जरी पसरले तरी त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहोचत नाही. तसेच हे रंग जमिनीत शोषले गेले तरीही जमिनीस काही धोका नाही.
आता पर्यावरणपूरक असलेले काही नैसर्गिक रंग कसे तयार करायचे हे येथे आपण जाणून घेऊया.
होळी व रंगपंचमीकरता पर्यावरणपूरक रंग तयार करण्याच्या काही पद्धती पुढीलप्रमाणे :-
(१) तांबडा रंग : गेरूची पावडर कोमट पाण्यात मिसळून घ्यावी व थंड झाल्यावर ते तांबूस पाणी वापरावे.
(२) पिवळा रंग : अ) पिवळा झेंडू, बहावा, टाकळा, बाभुळ, पिवळी शेवंती यांमधील उपलब्ध होतील ती फुले पाण्यात उकळवून घ्यावीत. पिवळ्या रंगाचे पाणी तयार होते. ब) हळद व चण्याची डाळ एकत्र करून ते पीठ कोमट पाण्यात मिसळावे. थंड झाल्यावर ते पिवळे पाणी वापरावे.
(३) गुलाबी रंग : अ) मायाळूची फळे व देठ काढून पाण्यात उकळवून घ्यावेत. ब) बीट किसून पाण्यात घालून गडद गुलाबी रंग तयार होतो.
(४) हिरवा रंग : गुलमोहोराची पाने, मेहंदीची पाने, गव्हाचे कोंब, दुर्वा, कोथिंबीर, पालक, सेलेरी, शेवग्याची पाने, कोथिंबीर व हिरव्या पालेभाज्यांचे देठ, मटारची साले यांपैकी जे साहित्य उपलब्ध असेल त्याचा मिक्सरमधून लगदा तयार करणे. तो लगदा पाण्यात घालून थोडा उकळणे व गाळून ते हिरवे पाणी वापरणे.
(५) ब्राऊन रंग : कॉफी बियांची पावडर करून पाण्यामध्ये घालून उकळवणे.
(६) निळा रंग : नीलमोहोर किंवा निळा गोकर्ण ही फुले पाण्यात उकळवून घ्यावीत.
(७) केशरी रंग : पळसाची फुले, पारिजातकाचे देठ रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी ते केशरी पाणी गाळून घ्यावे.
अशा पर्यावरणपूरक रंगांमुळे त्वचेस कोणताही धोका नसून हे रंग डोळे, कान, नाक व तोंडात जरी गेले तरी त्यामुळे आरोग्यास कोणतीही हानी पोहोचत नाही. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील मुलं अशा नैसर्गिक रंगांनी सुरक्षित होळी व रंगपंचमी खेळू शकतात.
निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करत थोडी कल्पकता व प्रयोगशीलता अंगी बाळगल्यास आपण आपल्या घरीच असे वेगवेगळे नैसर्गिक रंग तयार करू शकतो.
चला तर मग पर्यावरणपूरक रंग वापरून विषमुक्त रंगोत्सव साजरा करूया आणि आपल्या आरोग्याची व निसर्गाची हानी टाळूया!!
- प्रिया माधव फुलंब्रीकर

मोबाईल क्र. : ९७६६६२३४०९

(लेखिका ह्या निसर्ग रक्षण व संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रीन बर्ड्स अभियानाच्या संस्थापक आहेत.)