सुट्टीतली धमाल

शिक्षण विवेक    31-Mar-2023
Total Views |


सुट्टीतली धमाल
उन्हाळा म्हणजे सुट्ट्याच! उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते. वर्षभर शाळा आणि क्लास करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो. त्याचा कंटाळा जाऊन नवा उत्साह येण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते. उन्हाळ्याची सुट्टी नुसती झोपून घालवण्यापेक्षा आणि सूर्याला, उन्हाला दोष देण्यापेक्षा मी नवनवीन कला आणि खेळ शिकावे असं मी या वेळी ठरवलं.
या उन्हाळ्यात जरा जास्तच खेळायचं, पोहायला शिकायचं आणि खूप मज्जा करायची असा विचार करतच परीक्षेचा शेवटचा पेपर दिला आणि उड्या मारतच घरी पोहोचले. सर्वप्रथम वेळापत्रक तयार केलं. सर्व उन्हाळ्यात काय काय करायचं याचं नियोजनदेखील केले. माझा छोटा भाऊ आणि मी दोघं मिळून हे सर्व करत होतो. दोघांच्या सहमतीनुसार आणि वडिलांच्या मान्यतेने आम्हाला दिवसभर खूप ठिकाणी फिरायला मिळणार होतं.
एप्रिल महिन्यातच आम्ही गावी गेलो. तिथे मला मामाने पोहायला शिकवले. मी रोज दोन तास मनमुराद पोहायचे. पोहणं मला खूप आवडू लागलं. रानात फिरणं आवडू लागलं. रात्री घराबाहेर बसण्यात, तर खूपच मज्जा यायची. दहा दिवस राहिल्यावर आम्ही पुन्हा आमच्या घरी आलो. मला अगोदर पोहायची खूप भीती वाटायची; पण आता मी पोहण्यात तरबेज झाले आहे. आमच्या शेजारी एक छोटी विहीर आहे. तिथेच आम्ही रोज आंघोळीला जायचो.
सकाळी पोहणे, त्यानंतर जेवण झाल्यानंतर कॅरम आणि सायंकाळी क्रिकेट असा संपूर्ण दिवस खूपच मजेत जायचा. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी भरपूर आंबे खाल्ले. मामाच्या गावी गेल्यावर आणि क्रिकेट खेळताना मला खूप नवनवीन मित्र मिळाले. मी संगणकदेखील शिकले. माझा नवीन मित्र केतनने मला संगणक वापरायला शिकवले. पोहणे, क्रिकेट, कॅरम, संगणक यात माझी सुट्टी अत्यंत आनंदात गेली.
- सिद्धी ननावरे, 4 थी,
नवीन मराठी शाळा, वाई