वसंत ऋतू आणित्यांचे सांस्कृतिक संदर्भ

शिक्षण विवेक    06-Mar-2023
Total Views |

वसंत ऋतू आणि त्यांचे सांस्कृतिक संदर्भ
 बदल हा प्रकृतीचा नियम आहे. वातावरणात होणार्‍या बदलाला आपण ऋतू म्हणतो. या ऋतूचक्रात सर्वसाधरणपणे एका वर्षात, दर दोन महिन्यांनी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर असे सहा ऋतू आपल्या अस्तित्वाने आसमंत फुलवत असतात. यातील वसंत हा पहिला ऋतू आहे, असे आपण मानतो. कारण या ऋतूमध्ये नवनिर्मितीची सर्वोच्च क्षमता असते. त्यामुळे आपण त्याला ‘ऋतुराज वसंत’ असे संबोधतो. कारण वसंत ऋतू यायच्या आधी शिशिर ऋतुमुळे वातावरण पानगळीचे, उदासीनतेचे काहीसे गूढ असते. जसजशी वसंताची चाहूल लागते, तसतसा निसर्ग आपली कात टाकतो आणि नवी झळाळी आपल्या अंगा-खांद्यावर लेऊन येतो. येताना नवी उभारी, पालवी, प्रसन्नता, रंगांची उधळण आणि सण-उत्सवांची रेलचेल घेऊन येतो.
वसंत ऋतू हा चैत्र महिन्यात येतो. चैत्र आणि वैशाखात वसंताचे वैभव आपल्याला शुभारंभाचे संकेत देत असतात. पण हा वसंत ऋतू मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च-एप्रिलमध्ये येतो आणि त्याच्या स्वागताची तयारी माघ महिन्याच्या पंचमीपासून सुरू होते; ज्याला आपण वसंत पंचमी किंवा श्री पंचमी म्हणतो. वसंत ऋतूमध्ये उत्तरायण असते. वसंतोत्सव अमर आशावादाचेही प्रतीक आहे. वसंताची पूजा करणारा जीवनात कधीही निराश होत नाही. शिशिरातल्या पानगळीप्रमाणे निराशाही त्याच्या आयुष्यातून गळून जाते. निराशेने ग्रासलेल्या आयुष्यासाठी वसंत हा आशेचा किरण असतो. गीतेत विभूतियोगाच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘पृथ्वीवरचा ‘कुसुमाकर’ म्हणजेच वसंत ऋतू तो म्हणजे मीच’. यावरून आपण अनन्यसाधारण वसंत ऋतूचे महत्त्व जाणू शकतो.
वसंत ऋतूत वसंतपंचमी, महाशिवरात्र, होळी, धुळवड किंवा रंगपंचमी, चैत्र नवरात्री, रामनवमी, नवीन संवत्सर अर्थात गुढीपाडवा, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वैशाख किंवा बुद्धपौर्णिमा असे महत्त्वाचे सण-उत्सव येतात.
वसंत पंचमी : अगदी पुरातन काळापासून वसंत पंचमीला कला आणि विद्यादात्री सरस्वती देवीची पूजा केली जाते. हा देवी सरस्वतीचा जन्मदिवस मानला जातो. त्यामुळे प्रत्येक कलाकार; मग तो लेखक असो, कवी असो वा वादक असो सरस्वतीकडे आवर्जून ‘आपली कला बहरू दे’ अशी प्रार्थना करतो.
होळी : वसंत ऋतूच्या आगमनासाठी अनिष्ट रुढी, दुर्वासना, दुष्टबुद्धी, शिशिरात सुकलेला पालापाचोळा आदी गोष्टी जाळून थंडीमुळे आलेली निसर्गातील आणि मनातील मरगळ दूर होण्यास मदत होते. धुळवड आणि रंगपंचमीच्या निमित्ताने आबालवृद्ध एकत्र येतात आणि रंग खेळून एकमेकांचे जीवन रंगीबेरंगी बनवतात.
गुढीपाडवा : गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारीत होते. या दिवसापासून ‘शालिवाहन शक’ सुरू होते. कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ साजरा केला जातो. बहरत चाललेला आंब्याचा मोहोर, कोकिळचा स्वर, नवीन पालवी यांची गुढी उभारून आपणही आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींची गुढी उभारावी असेच आपल्याला गुढीपाडवा सांगून जातो.
अक्षयतृतीया : साडेतीन पवित्र मुहुर्तांमधील एक मुहूर्त. असे म्हणतात की, श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, ‘या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही.’ या सुमुहूर्ताचा आनंद आपल्याला शिकवून जातो की, तुम्ही चांगले आणि अक्षय टिकणारे कार्य करा आणि अमर व्हा.. माणसाने माणुसकीचा, एकमेकांचा गौरव करा.
वैशाख पौर्णिमा : याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतांवरून तथागत बुद्ध विश्‍वातील सर्वांत महान महापुरुष होते, असे मानले जाते. स्वत:चे घरदार सोडून त्यांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्षे कठोर तपश्‍चर्या व साधना केली आणि त्यांना एका बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पूर्णत्वाचा शोध घेताना ‘स्वत:च स्वत:चे दीप व्हा’, ‘बुद्धांची शिकवण आपण पाळली, तर आपण निश्‍चितच स्वयंप्रकशित होऊ’, हा महत्त्वपूर्ण संदेश आपल्याला या पौर्णिमेमुळे मिळतो.
अशा वसंत ऋतूमधील अनेक सण-उत्सव, त्याच्याशी संबंधित गोष्टी यांमुळे वसंतातला प्रत्येक दिवस स्मरणीय करतात.
ज्योती कपिले