सुट्टीची किमया

17 Apr 2023 11:47:39


सुट्टीची किमया

सुट्टीअसा नुसता शब्द उच्चारला, तरी मनाला किती दिलासा मिळतो. आपण कोणत्याही वयाचे असलो, तरी सुट्टीचा आनंद उपभोगता यावा यासाठी सुट्टीची आतुरतेने वाट बघत असतो.

सुट्टी छोटी असो वा मोठी. तिची किमयाच काही वेगळी असते. याच सुट्टीत नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न केले जातात, पर्यटनाचे बेत ठरतात, विसाव्याचे क्षण मिळतात, छंद जोपासले जातात आणि असं बरचं काही होतं. सुट्टी रविवारची असेल किंवा मे महिन्याची, ती आनंददायीच असते.

सुट्टीची चाहूल लागताच मन आनंदून जाते. सुट्टीमुळेच, तर प्रत्येकाला विश्रांती मिळून नव्याने काम करण्याची उभारी मिळते. त्यामुळेच सुट्टीचं महत्त्व प्रत्येकासाठी खास आहे.

याच सुट्टीबद्दल काव्यात म्हणावेसे वाटते...

आवडता सुट्टीचा दिवस

खूप हवाहवासा वाटतो

लहानथोर सगळ्यांनाच

वाट बघायला लावतो

सुट्टीचा दिवस खास

सार्यांना तो आवडतो

अन् अनेकांच्या मनात

नव्या कल्पना जागवतो

प्रवासाचे होई निमित्त

प्रेरणा भावी नियोजनाची

आठवणींच्या गाठोड्यात

मग जपणूक या दिवसाची

- सायली कुलकर्णी, शिक्षिका

विद्यामंदिर मांडा,टिटवाळा

Powered By Sangraha 9.0