राजा ! तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे !

राज्यभिषेक झालाच पाहिजे

शिक्षण विवेक    03-Apr-2023
Total Views |

राजा ! तुला राज्याभिषेक झालाच पाहिजे !
 
 
 
 शिवराय गेली 30-32 वर्ष अविश्रांत लढत होते, समोर असलेल्या 300 वर्षांच्या पारतंत्र्याशी. त्यांच्या मोहिमांची कीर्ती ऐकून कुणी छत्रसाल बुंदेला म्हणे रायगडी येऊन राहिला आणि जाताना प्रेरणा घेऊन निघाला, गुलामगिरी तोडून टाकण्याची! वेदोनारायण गागाभट्ट काशीहून निघाले तेही एका मराठा पोरानं हिमतीने उभारलेलं राज्य बघण्याच्या इराद्यानेचं. ते काशीचे असले तरी त्यांचं मूळ महाराष्ट्राचं! मुसलमान राजवटीच्या तडाख्याने त्यांच्या पूर्वजांना हा जागृत मुलूख सोडावा लागला. कित्येक वर्षांनी ते आले आणि त्यांनी शिवराज्यात जेजे पाहिलं, तेते केवळ विलक्षण होतं. आजपावेतो त्यांनी पाहिलं होतं की, मुसलमान बादशहा तख्तावर बसतात, मस्तकावर छत्र धरवून पातशाही करतात. पण.. पण इथे तर, ज्या शिवरायांनी चार पातशाह्या आपल्या शक्तीयुक्तीने दाबल्या, त्याच्या डोक्यावर छत्र नाही? त्यांचा राज्याभिषेक करायलाच हवा.
खरं तर राज्याभिषेक करायचा या इराद्याने गागाभट्ट आले नव्हते, तरी त्यांना वाटलं, राजांचा राज्याभिषेक झालाच पाहिजे. कारण, भारतात यापूर्वीसुद्धा राजे बरेच झाले, पण असा राजा होता का? औरंगजेब किंवा आदिलशहाने दिलेले राजे हे खिताब वेगळे, असे जहागीरदार अनेक असतील, पण हे राज्य वडिलांच्या गादीमुळे किंवा कुणाच्या मेहेरबानीमुळे मिळालेलं नव्हतं, ते रक्ताचं शिंपण घालून कमावलेलं होतं.
शहाजीराजांनी आपल्या पोराला पुणे, सुपे, चाकण प्रांतातल्या 36 गावांचा मोकासा आणि नंतर जहांगिरी दिली होती. शिवरायांनी ती नुसती राखलीच नाही तर अपार वाढवली. म्हणूनच हा मुकुट काटेरी होता. पुढे या सीमा रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात वाढल्या. हे मराठी राज्य महाराष्ट्राच्या बाहेरही झेपावलं, कर्नाटकचा काही भाग होता त्यात! त्यात जिंजी होती, तंजावरसुद्धा होतं. आपल्या माणसांचे राज्य हवे हाच होता राजांचा मनसुबा. त्यांनी सुरतेपासून साल्हेरपर्यंत मजल मारली होती. हे राज्य काशीविशेश्वरापावेतो वाढवणे ही होती ‘श्रीं’ची इच्छा.
या राज्यात आता सुमारे 240 गडकोट होते, आरमार होतं, घोडदळ, पायदळ, तोफा असं सैन्य होतं, सेनापती होते, चतुर मंत्री होते, या सर्वांवर शिवरायांची माया होती आणि तरीही त्यांचा शत्रूवर जबरदस्त दरारा होता. शिवरायांनी नवी सृष्टीच निर्माण केली होती. ‘आनंदवनभुवन’च ते!
गागाभट्टांनी जाणले की, ‘संतसज्जनांचे आणि गरीब रयतेचे रक्षण या शिवराज्यात होईल. इथे लोकमताला प्रतिष्ठा लाभेल, सार्वभौम सुख नांदेल. हे शिवाजी महाराज रामकृष्णाप्रमाणे धर्मराज्य करतील. ‘आधी केले मग सांगितले’, असं शिवराय स्वतः वागले आहेत, हे गागाभट्ट आपल्या डोळ्यांनी बघत होते. नाहीतर उगाच का ते अफझुल्याला सामोरे गेले असते? उगाच का त्यांनी लालमहालात शाहिस्त्याला चिरला असता? आग्र्याहून ते सुटले हा तर जगाच्या दृष्टीने अचंबा होता. राजे स्वतः पराक्रमी होते, अंगावर वार झेलत होते. म्हणूनच लोकही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होती, चाकणचा किल्ला पडू नये म्हणून लढणारा फिरंगोजी, घोडखिंडीतला बाजी, पोराचं लगीन टाकून कोंढाण्यावर चढणारा ढाण्या तानाजी हे सगळे सगळे आपला जीव तळहातावर ठेवून फक्त राजांच्या शब्दाखातर लढत होते, स्वराज्यासाठी! हा राजा तख्ती बैसण्याआधीच, ‘बहुत जनांसी आधारु’ झालेला आहे, हे सर्व जण जाणत होते. आपली काळजी करणारे ‘शिवाजी’ सिंहासनाधिश्वर व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा होती, पण बोलणार कोण? सांगणार कसं? इतिहास सांगतो, या आधी हे बोलून दाखवलं होतं फक्त समर्थांनीचं! आणि.. आणि इतक्यात गागाभट्ट आले, त्यांनी हे शिवराज्य पाहिलं, अवघा अवघा महाराष्ट्र गगभट्टांच्या मुखातून शिवरायांना सांगू लागला, राजे!
आता तुम्ही राज्याभिषेक करवून घेतलाच पाहिजे!
शिवाजी शहाजी भोसले...
अंहं...
प्रौढप्रतापपुरंदर, सिंहासनाधीश्वर, क्षत्रियकुलावतंस, म्लेंच्छक्षयदीक्षित, राजा शिवछत्रपती!
मराठ्यांना आपला हक्काचा राजा मिळाला....
आणि... दिल्लीला ही खबर धडकली, आलमगीर बादशहाने स्वतःला आपल्या खासेखान्यात कोंडूनच घेतले, दोन दिवस तो अन्नपाण्याविना रागराग करत राहिला. त्याच्या खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्याला तख्त दिले, आता मात्र हद्दच झाली!
कृष्णाजी अनंत सभासदांची बखर सांगते, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मराठा पातशहा येवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. राज्याभिषेक झाला आणि मुसलमानी चिखलात, मराठी मुलुख अभिमानाने डौलू लागला, अगदी कमलपुष्पाच्या दिमाखात!
संदर्भ
1. कृष्णाजी अनंत सभासद - शिवाजी महाराजांची बखर
2. अशी होती शिवशाही - अ. रा. कुलकर्णी
3. शिवाजी महाराज जीवन रहस्य - नरहर कुरुंदकर
4. राजा शिवछत्रपती ( उत्तरार्ध - ब.मो. पुरंदरे
5. शिवाजी महाराज ( उत्तरार्ध - वा.सी. बेंद्रे
6. शककर्ते शिवराय ( उत्तरार्ध - विजय देशमुख
 
 - पार्थ बावस्कर