घराशी हितगुज

07 Apr 2023 09:00:33


घराशी हितगुज

जन्मापासून लग्न होईपर्यंत ज्या घरात आपण राहतो, जिथे सर्व बालपण, अनेक सुख-दु:खे अनुभवतो, त्या घराबद्दल आत्मीयता तर निश्चितपणे असतेच. मात्र, लग्नानंतर खूप वर्षांनी मी आमच्या शेजार्यांच्या घरी जाणार होते. आमच्यात्याघरात आता माहेरचे कोणी राहत नाही. त्यामुळे तेघरपुनर्बांधणीसाठी नुकतेच पाडले होते. त्या घराच्या जवळ जसजशी मी जात होते. तसतशी माझ्या हृदयातील धडधड वाढत होती. एक अनाहूत अस्वस्थता जाणवत होती. आपल्या जिवाभावाची, अगदी जवळची व्यक्ती आता अस्तित्त्वात नाही, असं समजल्यावर वाटतं तसंच मला वाटत होतं.

... आणि तो क्षण आलाच. मी आमच्यात्याघरासमोर जाऊन पोहोचले. त्या जुन्या वास्तूकडे पाहून नकळतच माझ्या डोळ्यांत अश्रू आले. पायातला त्राण गेल्यासारखं वाटलं. तिथून निघणार, तेवढ्यात त्या पाडलेल्या घराने मला हाक दिल्यासारखं वाटलं आणि मी थबकलेच. मग मनोमन आमच्यात संवाद सुरू झाला.

घर : का गं, अशी उदास, अस्वस्थ का दिसतेस?

मी : नाही, कुठं काय, काहीच नाही. (डोळ्यांत आलेले अश्रू अलगद पुसत.)

घर : अगं, मी तुला काय आजच ओळखते का? तुझ्या बालपणापासून सगळी स्थित्यंतरं, प्रसंग, तुझं माझ्या अंगणातलं बागडणं मी पाहिलं आहे. तुझ्या मनातलं मी ओळखतो.

मी : हो ना! इतक्या वर्षांनंतरही स्वप्नात माझ्या बालपणीचं घर मला दिसतं. तुझ्याशी असलेले माझे भावबंध असे संपणार नाहीत. माझ्या आठवणी अशा संपणार नाहीत. माझ्या आठवणी, सुख-दुःख, चढ-उतार अशा सर्व गोष्टींची साक्षीदार आहेस तू.

घर : एवढी अस्वस्थ नको होऊस. माझे फक्त रूप बदलत आहे. मी तर अजूनही तुझे माहेरचे घरच आहे ना. तुला माझ्या नव्या रूपाचाही लळा लागेल.

मी : खरंच आहे. जशी एखादी आवडती साडी जुनी झाली म्हणून टाकून न देता तिचा पुनर्वापर करून नवीन पद्धतीचा ड्रेस शिवून आनंद घेतो. अगदी तसेच आहे ना हे पण! तुझ्याशी बोलून खूप हलके वाटले. चल तर मग.. काही महिन्यांनी मी परत येईन. तुझे बदललेले रूप बघायला आणि तुझ्याशी हितगुज करायला.

घराशी झालेल्या या संवादाने मी थोडी सुखावून गेले. अनेक निर्जीव, सजीव वस्तू/ वास्तू/नाती आयुष्यात येतात. त्यांच्यासोबत आपले भावविश्व जोडलेले असते. त्या आपल्या आयुष्याशी जोडलेल्या असतात. त्या आपल्यापासून दूर गेल्या, तरी त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व कमी होत नाही. अशा वेळी नकळतपणे कवितेच्या ओळी माझ्या ओठांवर येतात की...

सारे अंगण पाहता

पाणी पापण्यांच्या आत दडे

पुन्हा येण्याच्या आशेने

आठवणी मागे पडे

- अर्चना कडू, पालक,

महिलाश्रम हायस्कूल, कर्वेनगर

Powered By Sangraha 9.0