ऐक कहाणी पाण्याची

08 Apr 2023 09:00:43



ऐक कहाणी पाण्याची

हिरवाईची केली कत्तल सुखसोयीच्या नादाने

थेंबासाठी व्याकुळ होशील, ऐक कहाणी पाण्याची

किती संकटे आली गेली, तुझ्या मानवा करणीने

नको करू तू कयास आता निसर्गापुढे जाण्याची

पुराणातही कथा रंगल्या त्या पाण्याच्या थेंबाने

गंगा आली धरतीवरती भगीरथाच्या हवनाने

प्रचंड पाणी धरतीवरती आहेच कुठे उपयोगी

खारे बनले सागर सारे हिमकन्येच्या शापाने

झाडे लावा, झाडे जगवा शिवरायांची फर्माने

रायगडावर साक्ष अजुनी महान त्यांची जलनीती

चक्र सृष्टीचे फिरते कारण जलदा आहे मोलाची

हिरे माणिके मोती सारे क्षुल्लक आहे या जगती

सीमावर्ती वादाने, तर सरितासुद्धा दुभंगली

पाण्यासाठी रान पेटले, झाली कितीक उपोषणे

प्राणवायुचा आज तुटवडा भाकित आहे युद्धाचे

गुदमरलेले श्वास तयांचे तुला लागतील बघ दुषणे

अनंत चटके अंगावरती टोक बोचती काटेरी

तप्त उन्हाच्या असह्य ज्वाळा लाहि करतील देहाचे

जलविन अवनी अचेत आहे ब्रीद मनाशी ठासुन घे

स्वार्थ सोडुनी कर संवर्धन सुंदर निसर्ग सृष्टीचे

आनंद घोडके, पालक,

कै.वि.मो.मेहता प्रशाला, जुळे सोलापूर

Powered By Sangraha 9.0