झुकूझुकू झुकूझुकू आगिनगाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहू या,
मामाच्या गावाला जाऊ या.....
सुट्टीत मामाच्या गावाला जाण्याची गंमत काही औरच असते नाही का? ‘मामाचा गाव’, ‘मामाचं घर’, ‘आजोळ’ ही कल्पना लहान-थोर प्रत्येकाच्याच मनातला जिव्हाळ्याचा विषय आहे.
आपल्या घरासारखंच घर, आपल्या घरासारखीच आतली रचना, आपल्या घरात असतात तशीच माणसं असं असलं तरीही किंवा आपल्या शहरी वातावरणापेक्षा गावातलं आजोळ/गावातल्या वातावरणापेक्षा शहरातलं आजोळ असलं तरीही... आजोळी प्रत्येकाला आवडतं. कोकणातलं/ विदर्भातलं/ मराठवाड्यातलं / मुंबईतलं /पश्चिम महाराष्ट्रातलं आजोळ.... किती कोन आहेत न, आजोळ या संकल्पनेला? तिथल्यातिथल्या भौगोलिक, सामाजिक, सांपत्तिक, भाषिक अंगांमुळे तिथे मिळणारा आनंद, येणारी मजा, येणारे अनुभव, शिकता येणार्या गोष्टी, केलेले प्रयोग, मिळणारे मित्र, त्यातून मिळणारं समाधान खूप वेगवेगळं आहे. मित्रांनो, खरं तर, तुम्हीसुद्धा तुमच्या आजोळवर असं लेखन करू शकता बरं का? शाळेतच हा प्रोजेक्ट देऊन लिहायला पाहिजे, असं थोडी आहे? आपणही स्वयंस्फूर्तीने आपले विषय ठरवून आपला प्रोजेक्ट करू शकतो. तर, मूळ विषय आहे आजोळ!
आजोळ म्हणजे वरवर दिसणारं भौतिक विश्वातलं घर, माणसं हे तर आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे, ते म्हणजे तिथल्या माणसांची माया तिथल्या माणसांचं भाचरांवर असणारं प्रेम!
या मायेचा, प्रेमाचा धागा शोधायचा झाला, तर तो सापडतो पहिलटकरणीच्या माहेरच्या बाळंतपणात, भावा-बहिणीच्या रक्षाबंधनात, लेकीच्या लग्नात पाठवणी करताना भावाने दिलेल्या आधारात! एका मुलीला जेव्हा लग्न करून मायेनं सासरी पाठवलं जातं, तेव्हा तिने जोडलेली प्रेमाची नाती तिच्यावर माया करत असतात. ती माया तिच्या मुलांपर्यंत पोहोचते आणि म्हणूनच भाच्यांसाठी आजोळ तयार होतं.
मामाकडे गेले ना की, मला कोणीच लवकर उठ म्हणत नाही. मामी आम्हाला मस्त खाऊ करून देते. मामाकडे जायचं म्हणजे समुद्रावर जायचं, आंबे खायचे, आईस्क्रीम खायचं हे ठरलेलंच. मामीने मला तिच्या मुलाच्या लग्नाची साडी घेतली. असं मामाकडे किंवा आजोळी जाण्याचं कौतुक बहुतेक सर्व जणांना असतं. यात वयाचं बंधन नसतं. तुम्ही तुमचे आई-वडील, आजी आजोबा यांच्याकडून त्यांच्या आजोळच्या कथाही नक्की ऐका.
एका 90च्या आजोबांनीही ते त्यांच्या लहानपणी मामाकडे गेल्यावर कसे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचे हे आठवून, आनंदात सांगताना मी पाहिलं आहे, तर एक 85 वर्षांच्या आजी नेहमी त्यांच्या आजोळी कसे सगळे मिलिटरी, नेव्ही, हवाई दल यात होते हे सांगत साडीला नसलेली कॉलर ताठ करताना पाहिलं आहे. आजी आजोबा, मामा मामी, मावशी यांचं सुख, यांचा सहवास म्हणजे आजोळ!
मला स्वतःला आजोळच्या दोन आठवणी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. एक माझ्या आईचं माहेर, जिथे आम्ही सुट्टीत खूप धमाल करायचो आणि आजही तिथे गेलं की, खूप माया, प्रेम मिळतं. पूर्वी सगळे मामा एका घरात राहायचे, आता मुलांच्या नोकर्यांमुळे सगळे देशाच्या विविध भागांत आहेत; पण आजही कोणत्याही मामाकडे गेलं, तरीही ते ‘आजोळ’च असतं. खरं तर कुठल्याही मामेभावाकडे गेलं, तरीही ते ‘आजोळ’ असतं.
दुसरा अनुभव म्हणजे, माझ्या वडिलांनी भाच्यांना दिलेलं आजोळ! आमच्याकडे लहानपणापासूनच त्यांची सख्खी, चुलत अशी सगळी भावंडं आणि त्यांची मुलं राहायला यायची. त्या मुलांचं आणि आमचं गूळपीठ व्हायचं. आई - बाबा म्हणजे त्यांचे मामा-मामी त्यांच्यासाठी छान कार्यक्रम आखायचे. त्यांना शैक्षणिक सहलीला न्यायचे, समुद्रावर डोंगरांमध्ये न्यायचे, छानछान खाऊ करायचे. अर्थातच यात माझे आजी-आजोबाही सक्रिय असायचे. म्हणूनच आई-बाबा नोकरी सांभाळून भाच्यांचे लाड करू शकायचे.
आपल्याला जितकं प्रेम आजोळी मिळतं, तितकंच ते आपणही इतरांना देतो किंवा ज्यांना ते प्रेम काही कारणाने मिळत नाही अशाही व्यक्ती ते प्रेम त्यांच्या भाचरांना ‘आजोळ’च्या रूपाने देण्याचा प्रयत्न करतात. आधी म्हटल्याप्रमाणे घरासारखं घर असतं, माणसांसारखीच माणसं असतात. फक्त नातं बदलल्यामुळे मनातला मायेचा ओघ बदलतो आणि म्हणूनच आजोळ हा प्रेमाचा जिवंत झरा असतो. तो कधीच आटत नाही.
- पल्लवी गाडगीळ