आमच्या सुट्टीची गोष्ट

शिक्षण विवेक    06-May-2023
Total Views |


आमच्या सुट्टीची गोष्ट

माझ्या एका छोट्या मित्रानं मला विचारलं, ‘तुमच्या लहानपणी इंटरनेट नव्हतं, व्हॉसअॅप, फेसबुक नव्हतं ना? मग तुम्ही सुट्टीत काय करायचा?’ मग मला एकदम लक्षात आलं, खरंच की! या सगळ्याशिवाय कशी घालवायचो आपण सुट्टी? पण तेव्हा नं खूप काही असं होतं, जे पैसे देताही मिळत होतं. म्हणजे, खूप मोकळी मैदानं होती. कितीही वेळ खेळलं, तरी कुणी काही बोलायचं नाही. आजूबाजूला इतकी झाडं होती की, विचारू नका. त्यावर चढून बसायचं, सूरपारंब्या खेळायचं. वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लटकून झोका घ्यायचा. पोहायला किती तरी तळी, तलाव, विहिरी होत्या. पोहायचेक्लासेसनव्हते. ज्याला पोहता यायचं असा कुणी तरी मोठा दादा किंवा कुणाचे तरी मामा-काका धरायचे आणि ढकलायचे पाण्यात. आम्ही रडायचो, घाबरायचो आणि दोन दिवसात पोहणं शिकून दुसर्याला पाण्यात बुचकळून काढायला तयार व्हायचो!

उन्हाळ्याची सुटी म्हणजे सायकल चालवायला शिकणं असायचं. धडपडून पोरगं सायकल केव्हा शिकलं हे घरच्यांनाही कळायचं नाही. मुळात घरचे फार लुडबुडही करायचे नाहीत की, फार सुरक्षाही देत बसायचे नाहीत. ‘प्रोटेक्शननावाची गोष्ट नव्हती तेव्हा. उलट, ‘गुडघे फुटणारंच, हात खरचटणारंच. त्यात सांगण्यासारखं काय आहे? फार तर, रडा दोन चार मिनिटं, लावा झाडपाला’, असा मोठ्यांचा सूर असायचा. होय, तेव्हा औषधं वगैरे लागायची नाहीतच. दगडीपाला बरोब्बर माहीत होता सर्वांना. तो ठेचायचा आणि लावायचा. आणि झालं की दुखणं बरं. आणि जास्त वेळ दुखतंय म्हणत बसलं तर खेळता कसं येणार? म्हणून सहन करायचं, दुर्लक्ष करायचं.

बरं, झाडाला लागणारी फळं! बोरं, चिंचा, आंबे म्हणजे सिझनल म्हणतात ना आजकाल तशी फळं. त्यावर तोडणार्याचाच अधिकार. पेरूच्या झाडाचा मालक काहीपेरूचे पैसे द्या’, असं म्हणायचा नाही. एखादा असलाच खडूस तर चोरून तोडायचे आणि मालक आला, तर धूम ठोकायची. असं काहीही खायचं आणि ते पचायचंसुद्धा. पाणी तर कुठलंही कुठल्याही नळाचं प्यायचो. पोटं बिघडायची नाहीत. खेळही बिनाखर्चाचे किंवा स्वस्तातले. गोट्या, भोवरे, आम्हीच तयार केलेली चेंडूफळी. म्हणजेबॅटबॉलबरं का. ऊन जास्त असेल, तर बैठे खेळ खेळायचे. त्यात पत्ते, सागरगोटे, एखाद्याकडेच कॅरम असायचा.

व्यापार, किंवा मेकॅनोसारखा खेळ जरा सधन श्रीमंत मुलांकडे असायचा. त्यातून वस्तू बनवायच्या आणि तेव्हाहा माझा खेळ, तो तुझा खेळ’, असं नसायचं. कुणीही कुणाचाही खेळ बिनदिक्कत वापरायचा. जसं निसर्गातलं सगळं सगळ्यांचं तसच हेसुध्दा. कधी तरी उन्हाळ्यातआईस्क्रीम पॉटआणला जायचा. मग त्यादिवशी घरात फक्त आईस्क्रीमच. दोस्त कंपनीलाहीअवताणअसायचं. आणि नाही दिलं, तरी तेही हक्कानं घुसायचे. तेव्हाची सुट्टी म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त मज्जा अशी होती.

आजूबाजूच्या निसर्गातून आणि एकमेकांच्या सहवासातून आनंद शोधायचा, हे साधं सोपं सूत्रं होतं. त्यातूनही आम्ही काहीकाही आयडीया काढायचो. छोट्यांचं नाटक करायचं. मग त्यासाठी कोळसा, फेस पावडरचा वापर करून सोंग रंगवायचो. चादरी, सतरंज्या वापरून पडदे करायचो. आणि आत बसून म्युझिक वाजवायचो. डबे, थाळ्या, करवंट्या वापरून संगीत तयार व्हायचं. असलीच कुणाकडे, तर बासरी, हार्मोनियम. नाटकाची शिबिरं नव्हती; पण हेच प्रशिक्षण होतं, तेही आपलं आपणच घेतलेलं. या सगळ्यात एक मजा होती. झिंग होती.

बरं, काही मामाच्या गावाला म्हणजे नातेवाईकांकडे गेलेले असायचे, तर काही मामाकडे आलेले असायचे; पण हा ओळखीचा, हा परका असं काही नव्हतंच. आला की झाला सामिल. झाला आपल्यातलाच. इतकं साधं सरळ होतं सगळं.

आमच्या घरी खूप पुस्तकं होती. नातेवाईकांनी भेट दिलेली, कशाकशात बक्षीस म्हणून मिळालेली. ती सगळी आणि मित्रांकडची अशी आम्ही एकत्र करायचो. मला आठवतं एक पुस्तक पन्नास पैसे असायचं. जादूपय, सिंहासनबत्तीशी, वेताळ पंचवीशी वगैरे. आम्ही त्याचं ग्रंथालय करायचो. पन्नास पैसे अनामत रक्कम घ्यायचो आणि एक-दोन पैसे दर पुस्तकाला वर्गणी. आजूबाजूची खूप मुलं यायची वर्गणीदार व्हायला. मग रोज एकाने ठरावीक वेळ बसून खोक्यातून पुस्तकं काढून द्यायची, नावं लिहून घ्यायची. खूप मजा यायची आणि या निमित्ताने वाचनही व्हायचं.

सुट्टीत आम्हाला एक मोठं आकर्षण होतं. तुम्हाला आज विश्वास नाही बसणार; पण उन्हाळ्याच्या सुट्टीत चक्क एक सिनेमा बघायला मिळायचा. काय दिवस असायचा तो. सिनेमाला जायचं म्हणे अगदी नटून व्हायचं. चार दिवस आधी सगळीकडे दवंडी पिटायचो की, आम्ही ह्याह्या सिनेमाला जाणारेय आणि सिनेमा पाहिल्यावर पुढला आठवडा त्याची गोष्ट सांगत बसायचं. मला आजही तेव्हा पाहिलेले सिनेमा जितके आठवतात ना तितका काल-परवा पाहिलेलाही आठवत नाही. कारण तेव्हा काहीही करायचं ते आनंदासाठी इतकंच माहीत होतं. त्यामागे करिअर, स्पर्धा हे तुझं, हे माझं असं नव्हतं. दहावीच्या परिक्षेचासुद्धा बाऊ नव्हता. हां, अधूनमधून परीक्षेचा निकाल लागलाय आणि आपण नापास झालोय किंवा गणिताचा पेपर आहे आणि आपण भाषेचीच तयारी करून गेलोय असली स्वप्नं पडायची रात्री; पण सकाळी विसरून खेळायला धूम ठोकायची. जेवायची शुद्ध नाही, की रात्र झाली याची. एकूण कसलंही वेळापत्रक नसलेला काळ म्हणजे सुट्टी असंच आमचं गणित होतं.

सुट्टीत हमखास असायची ती लग्नं. आणि एकएक लग्न चार-चार दिवस चालणारं. त्यात धमालंच. दारात मांडव घातलेला आणि खायची चंगळ. नवे कपडेही मिळायचे बरं का सुट्टीत, ते वर्षभर नीट वापरावे लागायचे. अधेमधे शॉपिंगबिपिंग नाही!

लहानपणी आजच्या तुलनेत खूप काही नव्हतं; पण खूप काही होतंसुद्धा. आम्ही तेमिसकरतो. आणि आम्हालाही आश्चर्य वाटतं काहीच नसतानाही आपण कित्ती छान वेळ घालवला. कदाचित निसर्ग आणि सोबती यांच्यामुळे असेल. आजही उन्हाळा येतो आणि आठवतात ते दिवस. सुट्टी कुठे प्लॅन करायची यावर घमासान सुरू होते आणि वाटतं, सुट्टी प्लॅन थोडीच करायची असते! झर्याचं पाणी जसं वेडंवाकडं, खळाळत वहात जातं, तसं काहीही नियम, अटी, वेळापत्रक, बंधनं, नियम जुमानता खळाळत रहाणं म्हणजेच सुट्टी नं?

अशी होती आमची उन्हाळ्याची सुट्टी, जिला कसलंच कुंपण नव्हतं! अनप्लॅन्ड आनंदाचं नाव म्हणजेच सुट्टी!

- अभिराम भडकमक