मित्र-मैत्रिणींनो! उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता सुरू झाल्या असतील. दोन वर्षे घरी बसून तुम्हालाही कंटाळा आला असेल. आई-बाबांबरोबर बाहेर फिरायला जायचे बेतही तुम्ही आखले असतील; पण तरीही सुट्टीचा काही वेळ हातात शिल्लक राहीलच. मग बाहेर उन्हात उनाडपणे फिरण्यापेक्षा दुपारचा वेळ आपण आपल्याच घरी बसून ‘आलापल्ली’ला फेरफटका मारून येऊ शकतो का? त्यासाठी तुम्हाला मदत करेल हे छानसं पुस्तक, ज्याचं नाव आहे, ‘दिवस आलापल्लीचे’.
या पुस्तकाची लेखिका तुमच्याएवढी असताना आल्लापल्ली या गावात तीन वर्षे राहिली आहे. त्यामुळे वाचताना असं वाटतं की, ती तिच्याचबरोबर आपल्याला या गावाची सफर घडवते आहे. लेखिकेला ती नऊ-दहा वर्षांची असताना वडिलांच्या बँकेच्या नोकरीतल्या बदलीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आलापल्ली या गावात राहायची संधी मिळाली. निसर्गसंपन्न; पण नक्षलवादाच्या छायेत असलेल्या, आदिवासींची वस्ती असलेलं हे गाव आहे.
वडिलांच्या बँकेतील नोकरीमुळे लेखिकेच्या आईला बदलीची असलेली सवय, त्यासाठी आई कशी तयारी करायची, आई किती नीटनेटकी, टापटीप आणि हौशी होती हे सगळं लेखिका सहजपणे सांगते. लेखिकेने तिचे वडील आणि भावंडांविषयीच्या अनेक गमतीजमतीदेखील दिल्या आहेत.
आलापल्लीला राहायला येण्यासाठी केलेल्या कसरतीपासूनची गोष्ट सांगायला लेखिका सुरुवात करते. आलापल्लीचा निसर्गाने नटलेला भाग, नवं टुमदार घर, तिथल्या घरांची रचना आणि शेजारपाजार हे सगळं आपण समोर पाहत आहोत असंच वाटतं वाचताना!
भावंडांबरोबर केलेल्या मस्ती-दंग्याच्या जोडीने या शाळकरी मुलीच्या आयुष्यातल्या खूप गमतीजमती आपल्याला खिळवून ठेवतात. तिच्या मैत्रिणी जानकी, शाहिना, सुफिया; वडाच्या मोठ्या झाडाच्या सावलीतले सुट्ट्यांमधले खेळ, गावातली अन्य मातब्बर मंडळी यांची व्यक्तिचित्रं वाचताना ही सगळी माणसं आपल्याही ओळखीची होऊन जातात.
होळी आणि दसर्यासारखे सण, गावातल्या उच्चभ्रू अधिकारीवर्गात साजरे होणारे कार्यक्रम याचंही रसभरित आणि तपशीलवार वर्णन लेखिका करते. आलापल्लीमधले स्थानिक आदिवासी बांधव, भगिनी, नर्स अम्मा, घरात काम करणारी सखुबाई, देवी अंगात येणारी मुन्थी यांच्या चित्रणातून आलापल्लीसारख्या छोट्या जंगल भागातील लोकांची भाषा, कपडे, राहणीमान, विचार, जगण्याची पद्धत यांची ओळखही पुस्तकातून सहज होते.
तुम्हा मुलांना वाचायला विशेष आवडेल असं प्रकरण म्हणजे हत्तीची अंघोळ! लेखिकेच्या मैत्रिणीचे वडील माहूत असल्याने त्यांच्या हत्तीला तिला जवळून पाहायला मिळालं. त्या वेळी तिला काय मज्जा वाटली, याचं वर्णन, तर पुन्हापुन्हा वाचावसं वाटतं.
आलापल्लीला निसर्ग समृद्ध असल्याने तिथला पावसाळाही कसा आल्हाददायक होता, उन्हाळा कसा त्रास देई, मग त्यावर काय उपाय होते याचं वर्णन वाचताना आपणही लेखिकेबरोबर उन्हाळ्यात अंगणात घातलेल्या पलंगांवर झोपून रात्री चांदण्या मोजत गार वार्यात गाणी ऐकू लागतो. मला आवडलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही छोटी लेखिका आणि तिच्या मैत्रिणींचं अतिशय निरागस, चिमुकलं विश्व आणि त्यांचा एकमेकींवर असलेला विश्वास!
हे संपूर्ण पुस्तक आपण लेखिकेबरोबर शब्दशः जगतो. आता मी बाकीचेही सगळे तपशील सांगितले, तर तुम्हाला वाचताना उत्सुकताच नाही नं उरणार! त्यामुळे आता बाकीची मजा तुम्ही स्वतःच वाचा आणि आलापल्लीची सफर करा. मलाही सांगा आलापल्लीची ही फेरी तुम्हाला कशी वाटली?
पुस्तकाचे नाव- दिवस आलापल्लीचे
लेखिका - नीलिमा क्षत्रिय
प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन
एकूण पाने – 175
- डॉ. आर्या जोशी