
‘गुरुविणा न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरुराया'
भारतीय संस्कृतीमध्ये कित्येक मान्यवर शिक्षक आणि विद्यार्थांच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यात सर्वात लोकप्रिय आहे ती द्रोणाचार्य आणि त्यांचा प्रसिद्ध शिष्य अर्जुन यांची. त्याचबरोबर एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरु मानून जे साध्य केले, ती कथाही प्रसिद्ध आहे. अर्जुन आणि एकलव्य हे दोघेही त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. पण त्यानंतर द्रोणचार्यांनी गुरुदक्षिणेची मागणी केली आणि एकलव्याने जे कौशल्य प्राप्त केले होते, तेच काढून घेतले. कदाचित त्याची कला ही त्यावेळी अर्जुनापेक्षा सरस ठरली असती. आता वाद असा झडतो की, खरा गुरु कोण होता? आणि खरा शिष्य कोण होता? एकलव्य आपल्या समर्पणासठी ओळखला जातो. प्रत्येक देश आणि तिथली मानवी संस्कृती वेगळी आहे आणि त्याबद्दल काही समज आहेत, काही महाकाव्ये आहेत, काही लोककथा आहेत. लोककलांमध्ये शिक्षक आणि त्यांचे शिष्य यांच्यासाठी संबंधांविषयी प्रसंसोद्गार येतात. जगभरात कुठेही गुरुंना आणि शिक्षकांना सर्वसाधारणपणे आदर दिला जातो. काहींना आदर आणि काहींना प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाहीत, तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. काळ बदलतो, भुमिका बदलतात तसेच आकाराला येणाऱ्या आयुष्यातील बदलाप्रमाणे आयुष्याचा अर्थही बदलतो. त्यामुळे नातेसंबंधांचा अर्थही बदलतो. आजचा इंटरनेट आणि फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉगच्या जमान्यात, प्रश्नांची उत्तरे देण्याचा अधिकार पालकांकडे आणि शिक्षकांकडे राहत नाही. तो अधिकार आता इंटरनेटने हिरावून घेतला आहे. विद्यार्थ्यांना वृद्धी आणि संवेदशीलता आणि प्रतिष्ठा यांच्या आघाडीवर घेऊन जाण्याचे काम शिक्षकांना करावे लागते. शिक्षकांना तेथे बाहुल्य आणि वैविध्य आणवे लागते.
शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा, अत पावित्र्याचा
एक आदरणीय कोपरा, प्रत्येक व्यक्तीच्या मनातला
शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा,
शिक्षक निर्माता, भावि पिढीचा अन् समाजाचा
- रेणुका चव्हाण
कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळा