फणस

02 Jun 2023 17:23:31


फणस

(पडदा उघडतो तेव्हा एक मुलगा रंगमंचावर उभा आहे. प्रेक्षकांना पाहताच तो हसतो. मग हसतच, पण थोड्या नाटकी सुरात बोलायला सुरुवात करतो)

.... नमस्कार.

म्हणजे (एक हात उंचावून) हाऽऽय.

माझ नाव निवान.(जरा मोठ्या आवाजात)निवांत नव्हे हां!

मला मस्ती करायला, धडपडायला, चुळबुळ करायला आवडतं. म्हणून तर घरातली मोठी माणसं मला नेहमी म्हणतात, “अरे निवाऽऽऽन, जरा राहा रे निवांऽऽऽत.”

हां.. तर या मोठ्या माणसांविषयीच मी तुम्हाला सांगणार आहे.

मोठ्या मोठ्या माणसांना, छोटी छोटी गणितं अजिबात सोडवता येत नाहीत. म्हणजे मोठी माणसं, छोटी गणितं सोडवतात पऽऽण ती बरोबर नसतात, इतकंच!

हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, ‌‘तुला कसं काय कळलं रे निवान? तू तर आहेस एव्हढासा, इयत्ता पहिलीतला!'

अगदी बरोबर! हेच तर मी तुम्हाला आज सांगणार आहे. अहो अगदी खराखुरा घडलेला प्रसंग आहे हा.

मग ऐका आणि ठरवा.

काल आमच्याकडे आली रेखा मावशी. (आवाज बदलून आणि जागा बदलून) मावशी म्हणाली, “निवू, तुला एक गणित घालू? बघ, बरोबर उत्तर दिलंस तर मी तुला एक गंमत जंमत देईन! एक टॉप बक्षिस देईन! बोल..”

मी थोडासा विचार करुन म्हंटलं, “ठीऽऽऽक हाय.”

मावशी तयारीतच आली होती. ती म्हणाली, “हे बघ, मी तुला पाच चॉकलेटं दिली आणि त्यातली तू दोन चॉकलेटं खाल्लीस. तर.. तर.. निवान, तुझ्याकडे किती चॉकलेटं राहिली? आता उत्तर सांग चटकन चटकन आणि बक्षिस घे पटकन पटकन.”

मी चटकन पटकन म्हणालो, “पाऽऽच. पाच

माझं उत्तर ऐकताच, मावशी जरा गांगरली, म्हणालीकसं काय रे?”

मी टाळी वाजवून म्हणालो, “अगं त्यात काय? दोन चॉकलेटं पोटात आणि तीन चॉकलेटं हातात! .. झाली की पाच!! काऽऽय? चल दे मला बक्षिस!”

मला चिडवत मावशी म्हणाली, “अरे खाल्लेली चॉकलेटं मोजायची नाहीत. त्यामुळे तुझं उत्तर चूक चूक चूक!”

मी रागावून म्हणालो,“कसं काय चूक गं? अगं मावशे, तू मला विचारलंस ‌‘तुझ्याकडे' किती चॉकलेटं राहिली? अगं खाल्ल्यावर चॉकलेटं आपल्याकडेच राहतात की, कुठे दुसरीकडे जातात? सांग ना सांग?”

मावशीला काही नीट उत्तर देताच आलं नाही. ती थोडा विचार करुन म्हणाली, “बराऽऽय.. बराऽऽय.. आता मी तुला एक सोपं गणित घालते. तू जर याचं उत्तर बरोबर दिलंस तऽऽर...”

(दोन्ही हात ऊंचावत) मी ओरडलो, “होऽऽऽ होऽऽऽ. गणित सांग..”

ऐक. मी तुला पाच फणस दिले आणि त्यातले तू तीन फणस खाल्लेस, तर तुझ्याकडे किती फणस राहिले? हां.. हे बघ, ते खाल्लेले फणस अजिबात मोजायचे नाहीत हं. हां आधीच सांगून ठेवतेय. चल आता उत्तर सांग चटकन चटकन आणि बक्षिस घे पटकन पटकन.”

मावशीने इतकं सोपं गणित घालताच मी जोरात ओरडलो, “पाच..पाच..पाऽऽऽच!”

माझं बरोब्बर उत्तर ऐकताच मावशीला जरा गरगरलं. डोकं धरुन तिने विचारलं, “आँऽऽऽ कसं काय रे?”

मी (उड्या मारत) म्हणालो, “अगं एकदम सोपं. आम्ही लहान मुलं एकावेळी तीन फणस खातच नाही. म्हणून मी फणस खाल्लेच नाहीत. मी ते फणस खाल्लेच नाहीत म्हणून ते फणस मोजलेच नाहीत.

म्हणून उत्तर पाच..पाच..पाच. बक्षिस दे लवकर, मी करतो नाच..नाच..नाच.”

माझं उत्तर ऐकताच मावशी गांगरली, गडबडली, थोडीशी घाबरली आणि मटकन खाली बसली.

मी तिला धीर देत म्हणालो, “अगं, असं काय करतेस? थांब.. मी तुला एक छोटंस कोडं घालतो, त्याचं बरोबर उत्तर सांगशील?”

मावशीने कशीबशी मान डोलावली.

अं... सांग पाहू, असं कोण आहे ज्याला सहा पाय, चार डोळे, दोन हात आणि एक शेपटी आहे?”

मी असं विचारताच मावशी भितीने थरथरली. तिने क्षणभर दोन्ही हातांनी डोकं गच्चं धरलं.

मावशी चाचरत म्हणाली, “.... मला नाही माहित! हे काय विचित्रच? सहा पाय, चार डोळे, दोन हात आणि एक शेपटीऽऽ? ईऽऽऽ मला बाई असले चित्र विचित्र प्राणी माहित नाही.

शहारलेली मावशी पाहात, “मी म्हणालो, अगं मावशेऽऽ हे प्राणी तुझ्या ओळखीचे आहेत.”

पण मावशीला काही कळलंच नाही.

शेवटी मी समजुतीच्या सुरात तिला म्हणालो,“अगं सहा पाय, चार डोळे, दोन हात आणि एक शेपटी.. असं कोण? म्हणजे.. घोड्यावर बसलेला माणूस! काऽऽय? कशी जिरवली?”

माझं उत्तर ऐकताच जमिनीवर बसलेली मावशी घोड्यासारखी टुणकन उभी राहिली.

माझी पाठ थोपटत मावशी म्हणाली, “व्वा! व्वा! तुझं कोडं एकदम सही!! तुझ्या कोड्याचं उत्तर मला आयुष्यात देता आलं नसतं...”

अगदी घोड्यावर बसली असतीस तरी सुध्दा?”, मी असं पटकन विचारताच मावशी खींऽऽऽ खींऽऽऽ खीं करत हसली.

मी खुशीत येऊन मावशीला विचारलं, “मावशी.. मावशी मी तुला आणखी एक कोडं घालू?”

माझा गालगुच्चा घेत ती म्हणाली, “नको. नको. आज इतकंच पुरे! मी तुझ्यावर खूश आहे. बोल तुला काय पाहिजे? तू जे मागशील ते मी तुला देईन! सांग..”

मी चटकन पटकन म्हणालो, “मला फणसाएव्हढं चॉकलेट पाहिजे!”

हे ऐकताच मावशीचा चेहरा फणसासारखा झाला!!

काय कळलं ना?

तेव्हा पासून मी, मोठ्या मोठ्या माणसांना, छोटी छोटी कोडी घालत नाही.

हो.. उगाच त्यांचे फणस व्हायला नकोत.

...........................................................................................

- राजीव तांबे

- rajcoppergmail.com

(ही एकपात्रिका सादर करण्यासाठी लेखकाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. या एकपात्रिकेत मुलांच्या सोयीसाठी काही बदल करणे आवश्यक वाटले तर ते करावेत. काही मदत हवी असल्यास मला इमेल करावा.)

Powered By Sangraha 9.0