रेडिओ दुर्बीण

शिक्षण विवेक    02-Jun-2023
Total Views |


रेडिओ दुर्बीण

दुर्बीणीच्या साहाय्याने मूळ दृश्य प्रकाशझोताची तीव्रता मोजणे, संगणक वापरून प्रकाशातील फोटॉनचे कमी-अधिक प्रमाण दाखवणे, तारकांचे वर्णपट घेणे यांसारखी निरीक्षणे केली जात होती. अशी प्रगती होत असताना रेडीओ लहरींचा वेध घेऊन सर्वप्रथम खगोल निरीक्षण केले, ते कार्ल्स जान्स्की या अभियंत्याने. अवकाशातील तारे त्यांच्या अंतरंगात घडत असलेल्या घडामोडींमुळे, विद्युत चुंबकीय लहरींचे उत्सर्जन करत असतात. ‌‘क्ष' किरण, सूक्ष्मलहरी, टी.व्ही.च्या लहरी हे यांचेच प्रकार. त्या लहरींचा अभ्यास करायचा असेल तर तो पृथ्वीच्या वातावरणापलीकडे जाऊन करावा लागतो. या दुर्बीणींची निर्मिती करताना रेडीओ लहरींची उर्जा वाढवू शकणारे वर्धक आणि दृश्य प्रकाशापेक्षा कित्येक पट असणाऱ्या तरंग लांबीला ग्रहण करण्यासाठी तिचा महाप्रचंड आकार लक्षात घ्यावा लागतो.

(जीएमआरटीमधील रेडिओ दुर्बीणींचा समूह)

दुर्बीण आकाराने जितकी मोठी, तितकी ती फिरवायला कठीण असते म्हणून अनेक दुर्बीणींचा एक समूह तयार केला जातो. अशीच एक महाकाय दुर्बीण आपल्या पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात ‌‘खोडद' या ठिकाणी आहे. मीटर तरंगलांबी असणाऱ्या लहरींचा वापर करणारी महाकाय दुर्बीण. इथे साधारणपणे 20 से.मी. ते 2 मीटर तरंगलांबी असलेल्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला जातो. इथे 45 मीटर व्यास असणारे 30 डिश अँटेना आहेत. एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर असणारे 2 किंवा अधिक रेडिओ अँटेना, एखाद्या रेडिओ स्त्रोताची उगवल्यापासून मावळेपर्यंतची, पुष्कळ निरीक्षणे घेतात. त्यातून एकत्रित निष्कर्ष काढून, त्यावर गणिती प्रक्रिया करून, त्या रेडिओ स्त्रोताची एक प्रतिमा तयार केली जाते. ती जवळजवळ एकाच मोठ्या दुर्बीणीतून निरीक्षण घेऊन तयार केलेल्या प्रतिमेइतकी चांगली असते. या अँटेनाच्या खोलगट डिशवर असणाऱ्या आरशावरून, अवकाशातल्या रेडिओ स्त्रोतांकडून येणाऱ्या लहरी परावर्तित होऊन, त्या दुसऱ्या अँटेनाकडे पाठवल्या जातात. तो अँटेना या विद्युतचुंबकीय लहरींचे विद्युतप्रवाहात रूपांतर करतो. या समुहातील दुर्बीणींच्या मदतीने, पल्सार ताऱ्यांचा बारकाईने अभ्यास आणि विश्वाच्या आदिकाळातल्या तारकाविश्वांच्या निर्मितीतून उमटणाऱ्या लहरी इत्यादींची माहिती मिळवणे चालू आहे.

- नंदिता केळकर