दहा, दहा, दहा.....शंभर, शंभर.... ?
एक होती ‘चौकस चौकडी'. तिचे सभासद होते अमन, ईशा, लारा आणि अशोक. संदेश काकांबरोबर त्यांची खूप गट्टी होती. संदेशकाका त्यांच्याबरोबर, ‘खेळ खेळू या गणिताशी' हा खेळ खेळायचे. सगळ्यांना त्यात खूप गंमत यायची.
त्या दिवशी चारही जण संदेश काकांच्या सभोवती बसले होते. काकांनी विचारले, पटकन उत्तर कोण देणार? मी.., मी.., मी.., मी..! सगळे एका सुरात ओरडू लागले. काका म्हणाले, अरे हो... आधी नीट ऐका आणि मग पटकन उत्तर द्या.
‘दहा मुले, दहा मिनिटात, दहा निसर्गचित्रे काढतात. तर शंभर मुलांना, शंभर निसर्गचित्रे काढायला किती वेळ लागेल बरे..?'
सोप्पं! शंभर! पटकन एक आवाज आला.
संदेश काकांनी यावेळी ‘शाबास, कोणी उत्तर दिले? हात वर करा' असे विचारले नाही. थोडा वेळ शांत बसून ते म्हणाले, “शंभर हे उत्तर चूक आहे. बरोबर उत्तर काय असेल याचा शांतपणे विचार करून सांगा आणि एक नेहमी लक्षात ठेवा, कोणीही ‘पटकन उत्तर दे' असे म्हणून आपल्या मागे लागले तरी, आपण नेहमी शांतपणे विचार करूनच उत्तर द्यायचे. ‘घाई करेल त्याचे उत्तर चुकेल' ही म्हण माहित आहे ना तुम्हाला?” त्यावर अशोक मिश्कीलपणे हसत म्हणाला, “काका आतापर्यंत ही म्हण कुणालाच माहिती नव्हती. आता ती पाच जणांना माहिती आहे.”
संदेशकाकांनी घातलेल्या गणिती कोड्याचे उत्तर शांतपणे विचार करून तुम्ही देणार ना? तुम्हीही असे एक गणिती कोडे तयार करू शकाल का?
(उत्तर अंकात इतरत्र)
उत्तर:
दहा मुले दहा मिनिटात दहा निसर्गचित्रे काढतात, याचा अर्थ प्रत्येक मुलगा दहा मिनिटात एक निसर्गचित्र काढतो. त्यामुळे शंभर मुलांना शंभर निसर्गचित्रे काढायला दहा मिनिटे लागतील. दहा - दहा - दहा हा एकच आकडा पुन्हा पुन्हा आला असल्यामुळे, आपले मन त्याच रीतीने विचार करू लागते आणि पटकन शंभर हे उत्तर देते. कोणतेही गणित सोडवण्याची पहिली पायरी ते गणित नीट वाचणे आणि नेमके काय विचारले आहे, ते पक्के समजून घेणे ही असते.
- प्रसन्न दाभोळकर