माझ्या इयत्ता 7वीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. मी दीदीच्या लग्नाच्या तयारीत होते. तिचे लग्न आमच्या गावाला असल्याने आम्हांला जरा सावधपणे कोरोनापासून लपतछपत गावाला पोहोचायचे होते. खरं तर हे लग्न घरगुती स्वरूपाचे, अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार होते. लग्नात आम्ही एवढी धम्माल मस्ती केली की काय सांगू. फक्त आवरायचे, फोटो काढायचे, नाचायचे, खेळायचे फक्त मज्जाच मज्जा. लग्न आनंदात पार पडले आणि आम्ही परत पुण्यात यायला निघालो. पुण्यात पोहोचल्यावर आम्ही लग्नाच्या आठवणीतच होतो की, एके दिवशी आई आजारी पडली. आजार काही गंभीर नव्हे फक्त थोडासा ताप आणि खोकला. त्याला काय एवढे घाबरायचे, गावावरून आल्यावर तसे पण आपण आजारी पडतोच ना? आईला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि त्यांनी थोडा औषध उपचार करण्यास सांगितले. थोडे दिवस गेले पण आईचा ताप, खोकला काही कमी होईना. मग नाइलाजाने आम्ही ठरविले की, कोरोना चाचणी करूनच घेऊ. म्हणजे एकदाची शंका तरी मिटेल. ज्या दिवशी चाचणी करायला जाणार होतो, त्याच दिवशी मला सुद्धा ताप आला पण त्याची आम्ही एवढी काळजी नाही घेतली. शेवटी आजार भीतीने जास्त वाढतो. म्हणून आईची कोरोना चाचणी केली. रिपोर्ट 15-20 मिनिटात येणार म्हणून आम्ही तिथेच थांबलो आणि रिपोर्ट पॉसिटीव्ह आले. रिपोर्ट ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली, आमच्या अवस्थेत कोणी दुसरे असते, तर तोही तेवढाच घाबरला असता. आम्ही डॉक्टरांना रिपोर्ट दाखविले आणि त्यांनी आम्हाला सर्वांना चाचणी करायला सांगितले आणि आम्ही सर्वांनी चाचणी केली. आजीचा धक्का कमी होता की, अजून एक, मी आणि माझे बाबा पॉसिटीव्ह आलो. फक्त दादाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता. आम्ही घरी आलो पण आतून खूपच खचलो होतो. या अवघड परिस्थितीमध्ये आम्हाला आमचे काही शेजारी, किराणा दुकानदार, फळभाजीवाले , मेडिकल चालक यांनी खूप मोलाची मदत केली. जसे किराणा दुकानदाराकडून किराणा सामान घरपोच मिळणे, भाजीपाला फळे, औषधे घरपोच आणून दिली. आमचे नातेवाईक, मित्रपरिवार या सगळ्यांनी वेळोवेळी आमच्या तब्बेतीची चौकशी करून आम्हाला मानसिक आधार देण्याचे काम केले. या पलीकडे जाऊन काही मित्र परिवाराने आर्थिक मदत सुद्धा देऊ केली. अशा प्रकारे आमचे वैद्यकीय उपचार चालू असतांना मी आणि माझ्या आईची तब्बेत बरी व्हायला सुरुवात झाली, पण हे सगळे घडत असतांना माझ्या बाबांची तब्येत जास्तच खालावली. औषधोपचार चालू असून देखील त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. अखेरीस त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. आता आमच्या समोर कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला, कारण त्यावेळी कोणत्याही रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध होत नव्हते. पण याही वेळी नशिबानेच का होईना आमच्या घराजवळील रुग्णालयामध्ये माझ्या बाबांना दाखल करण्यात आले. एका रात्री माझ्या बाबांची तब्येत अधिकच खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांची ऑक्सिजन पातळी 55 पर्यंत खाली आली. पुढच्याच दिवशी असे ठरले की, बाबांना रेमडीसीव्हरची लस देण्याची गरज आहे. हेही देवाच्या कृपेने म्हणावे की,बाबांना रेमडीसीव्हरची लस ही डॉक्टरांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाली. थोड्याच दिवसात बाबांची तब्येत बरी झाली आणि ते सुखरूप घरी आले. अशा प्रकारे आम्ही सर्व या कोरोना नावाच्या संकटातून बाहेर पडलो. या जगामध्ये आम्हाला डॉक्टर, मित्र, नातेवाईक, शेजारी यांच्या रूपात देव दिसला, आम्ही या सर्वांचे सहृदय आभार मानतो.
हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग ठरला, यामुळे माझ्यातील धैर्य, संकटांना सामोरे जाण्याची वृत्ती, कुटुंबातील सदस्यांचे प्रेम या गोष्टींची जाणीव झाली.
-प्रज्ञा पाटील, 9वी
व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल नऱ्हे, पुणे