आमची संस्कृती, आमची ओळख...

शिक्षण विवेक    05-Jun-2023
Total Views |


आमची संस्कृती, आमची ओळख...

खरं तर भारतसारख्या देशात कला-संस्कृती राष्ट्रभक्ती असं वेगळ होऊच शकणार नाही. कारण राष्ट्राच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अनेक गोष्टींबरोबर कला-संस्कृती हे तितकंच महत्त्वाचं अंग आहे. म्हणून अनेक वर्षांपासून या देशात एक सूत्र सतत मांडले गेले, ‌‘कलेसाठी कला नसून जीवनासाठी कला.' राष्ट्र जीवनात कला, संस्कृती, परंपरा याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ती टिकविणे आणि संवर्धन करत असताना पुढील पिढीत संक्रमित करणे, हेच मोठे देशभक्तीचे कार्य आहे.

आमची संस्कृती, आमची ओळख...

एखाद्या देशाची ओळख ही त्या देशातील कला-संस्कृतीवरून ओळखली जाते. भारताला हजारो वर्षांपासूनची कलेची थोर परंपरा लाभलेली आहे. हे आज आपण पाहतो. आपले सारे सण, उत्सव, कुटुंब व्यवस्था, विविधता असूनही एकतेचा भाव, समरसता, दुसऱ्याला मदत करण्याचा सहज स्वभाव. यालाच संस्कृती म्हणतात. इतक्या वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळं राहणीमान, खानपान, हवामान, निसर्ग, जाज्वल्य इतिहास, अनेक आक्रमण पचवण्याची प्रचंड ताकद, कधीही कोणाकडून ओरबाडून घेतले नाही आणि कधीही दुसऱ्या देशांवर कब्जा करण्यासाठी स्वत:हून आक्रमण केले नाही. ही आमची संस्कृती, आमची ओळख आहे.

आपल्या देशात येणाऱ्या, भारताचा अभ्यास करणाऱ्या किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना इथल्या कला-संस्कृती संबंधात कमालीची उत्सुकता आहे. इतकी आक्रमणं होऊनही हा देश, धर्म, संस्कृती कशी टिकली याचे त्यांना आश्चर्य वाटते. भारतातील द्रष्ट्‌‍या ऋषीमूनींनी लोकजागरण केले, समाजव्यवस्था नीट राहण्यासाठी समाजसुधारकांनी शिक्षण-ज्ञान-संस्कार यांवर काम केले, क्रांतिकारकांनी बाहेरील आक्रमणांना सशस्त्र लढा करून घालून लावले, कलावंतांनी कलेच्या माध्यमातून समाज सुसंस्कृंत, सशक्त कसा होईल यासाठी आपल्या पूर्वजांनी आपलं सार आयुष्य या देशाला समर्पित केलं हे विसरून चालणार नाही. आज जे काही आपल्या वाटेला सुख-समाधान आलं आहे, ते त्यांनी केलेल्या त्यागामुळेच आहे.

कलेतून राष्ट्रभक्ती...

देश पारतंत्र्यात असल्याच्या आधीपासून आपला देश हा सर्वार्थाने समृद्ध होता. आर्थिक असो, ज्ञानाच्या क्षेत्रात असो वा कलेच्या क्षेत्रात. त्या काळी लोक म्हणायचे भारतात सोन्याचा धूर निघायचा, ज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याकडे ग्रंथसंपदा, लिखित साहित्य इतके होते आणि आजही आहे. त्या वेळी नालंदा विश्वविद्यालय मोघल आक्रमकांनी जाळले तर ते कित्येक दिवस जळतच होते. त्याआधीपासून आपल्याकडे मौखिक परंपरा ही चालत आल्यामुळे ते ज्ञान अनेकांना मुखोद्गद होते. ते कोणीही पुसूच शकणार नाही. इतकी अफाट विचारशक्ती आपल्या लोकांमध्ये होती.

आपली मंदिरे, भित्तीचित्रे ही साक्षात कलासंस्कृतीचा फार मोठा ठेवा आहे. मधल्या कालखंडातील अनेक मंदिरे मोघल आक्रमकांनी ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. धर्मांधांनी अनेक मूर्ती फोडून टाकल्या. त्या काळात शिल्पकारांनी जी मंदिर निर्माण केली, ती केवळ देवपूजा एवढ्याच मर्यादित विचार नव्हता केला. ही मंदिरे समाज व्यवस्थेतील संस्कारकेंद्रे होती आणि आजही आहेत. भारतीय कलांचा उद्गम या मंदिरांतूनच झाला आहे. संगीत, साहित्य, नृत्य, शिल्प याचे दर्शन मंदिरातील शिल्पांवर तर होतेच, परंतु त्या शिल्पांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान देण्याचाही प्रयत्न त्या काळातील कलाकारांनी केलेला दिसतो. मंदिरातील देवापुढे या कलांचे प्रगटीकरण म्हणजे समर्पणचा संस्कार. मंदिरात येणारे सर्व सामान्य नागरिक अभिरूची संपन्न रसिक तयार होण्याचे स्थान. मंदिरामुळे कलांचे पावित्र्य निर्माण झाले. सुदूर जंगलात राहणारे, ग्रामीण भागात राहणाऱ्यांचे जनजीवनात आनंद निर्माण करणारी कलाच आहे. त्यांच्या जीवनपद्धतीतून लोकसंगीत, लोकनृत्य, चित्र-शिल्प, लोकनाट्य, लोकसाहित्य असे अनेक विविध कलांचे प्रकार हे त्यांच्या जीवनाचं अंगच होतं आणि आजही आहे.

देशावर ज्या ज्या वेळी संकटे आली, बाहेरून आक्रमण झाली. त्या वेळी कलेचं योगदान फार महत्त्वाचे होते. कलावंतांनी त्यांच्या कलेतून समाजाला उभारी दिली, लोकांचे मनोरंजन करताकरता प्रबोधनही केले. शाहिरीसारखा देशभक्ती जागवणाऱ्या वगाने समाजाला जागृत करण्याचे काम केले.

3000 वर्षांपूर्वी भरतमूनींसारख्या ऋषीने लिहून ठेवलेला ‌‘नाट्यशास्त्र' ग्रंथ आजही जो विश्वातील कलाकारांना मार्गदर्शक ठरेल. कलेसाठी कला नसून ‌‘कला ही जीवनासाठी, राष्ट्रासाठी' हा विचार त्यांनी दिलेला आहे. शेवटी मानवाचे जीवन हे केवळ अर्थाजनावर समृद्ध ठरत नाही ते परिपूर्ण होण्यासाठी कला-संस्कृतीची जोड नसेल तर अपूर्णच राहील. म्हणूनच कलावंतांनी आपली कला केवळ स्वत:पुरती ठेवता ती समाजासाठी आहे. ही भावना कायम आफल्या मनात ठेवणे आवश्यक वाटते. कलेच्या माध्यमातून एक सुसंस्कृत समाज घडवण्यात माझाही खारीचा वाटा मला उचलायचा आहे. जी कला माणसाला कसं जगायचं ते शिकविते, त्या कलेचे आपण पाईक आहोत. मला वाटत कलेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचं प्रगटीकरण अजून वेगळ काय असतं?

- रवींद्र देव