लेखक : गोपाळ नीलकंठ दांडेकर
प्रकाशन : मृण्मयी प्रकाशन
सहावी आवृत्ती
किंमत : 300.00
पृष्ठे - 227
पुस्तक परिचय या आपल्या सदरासाठी या महिन्यात निवडलेल्या पुस्तकाचं नाव आहे. ‘आईची देणगी'. या पुस्तकाचे लेखक आहेत गोपाळ नीलकंठ दांडेकर अर्थात गो. नि. दांडेकर. गो. नि दांडेकर ही मराठी साहित्यातले अतिशय लोकप्रिय लेखक होते. तितकेच नव्हे तर ते कुशल छायाचित्रकार आणि अभ्यासू दुर्गप्रेमी सुद्धा होते.
‘माचीवरला बुधा', ‘शितू', ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा', ‘दास डोंगरी राहतो', ‘जैत रे जैत', ‘पवनाकाठचा धोंडी' अशी अनेक उत्तम पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ऐतिहासिक, चरित्रात्मक, कादंबरी, प्रवासवर्णन, धार्मिक, संत वाङ्मय असे अनेक प्रकारचे लेखन त्यांनी केले.
‘आईची देणगी' कथांचा संग्रह त्यांनी खास कुमारांसाठी लिहिला आहे. यामध्ये एकूण 42 कथा आहेत. राम, कृष्ण, एकलव्यापासून, ज्ञानेश्वर, तुकाराम, ते अगदी अलीकडच्या काळातील टिळक, आगरकरांपर्यंत ऐतिहासिक महापुरुषांच्या कथा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. कथा वाचत असताना आपण त्या वाचत नसून ऐकतो आहोत असा भास व्हावा इतकं गोनिदांचं लेखन संवादी आहे. इतिहास हा विषय रुक्ष न वाटता तो गोष्टीरूपात अतिशय रसाळ पद्धतीने मुलांसामोर मांडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ आहे आणि हे या कथासंग्रहात पानोपानी जाणवतं. प्रत्येक गोष्टीतला वेगवेगळा कालखंड गोनिदा अतिशय प्रभावीपणे आपल्यासमोर उभा करतात मग तो बंधुप्रेमापोटी रामबरोबर लक्ष्मणही कसा हट्टाने वनवासाला गेला तो प्रसंग असेल, सुभाषचंद्र बोस यांचा देशभक्त होण्याचा प्रवास असेल., पानिपतावरचा रणसंग्राम असेल. प्रत्यक्ष येऊन पांडुरंगाला नैवेद्य ग्रहण करायला लावणाऱ्या छोट्या नामदेवांच्या हट्टाचा प्रसंग असेल. आर्यपुत्र चाणक्यांची कथा असेल, रात्रभर जागून एका पैची चूक शोधून काढणाऱ्या एकनाथांची कथा असेल. अढळपद मिळविणाऱ्या ध्रुवाची कथा असेल. राका कुंभार, रांगो बापुजी, जनकोजी शिंदे, चिमाजी आप्पा अशा अनेक थोरांच्या कथा गोनिदांची लेखणी अतिशय भावपूर्ण पद्धतीने आपल्या समोर मांडते. प्रत्येक कथा आपल्याला त्यातल्या प्रसंगांचा प्रत्यक्षदर्शी अनुभव देते.
पुस्तकं कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवतात.. संकटांचा सामना करायला, अडचणींवर मात करायला, आनंदी राहायला, यशस्वी व्हायला, मोठ्यांचा आदर करायला, माणसांबरोबरच निसर्गावर, प्राणिमात्रांवर प्रेम करायला अशा कितीतरी गोष्टी. आणि या दृष्टीने म्हणाल तर ‘आईची देणगी' या पुस्तकातल्या गोष्टी आहेत शौर्याच्या, धाडसाच्या, गुरुभक्तीच्या, मातृभक्तीच्या, देशभक्तीच्या, पराक्रमाच्या, परिश्रमाचं महत्त्व सांगणाऱ्या, उदारतेची उदाहरणं सांगणाऱ्या..
तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा हे तर झालंच पण ते वाचून तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला सांगायला विसरू नका बरं का!