‌‘पथनाट्य - एक प्रभावी कला'

शिक्षण विवेक    13-Jul-2023
Total Views |


‌‘पथनाट्य - एक प्रभावी कला'

समाजातील ज्वलंत विषयांना वाचा फोडण्याचे प्रभावी साधन म्हणजे ‌‘पथनाट्य'. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणाऱ्या मोर्चे, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा ‌‘पथनाट्य' वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, राष्ट्रभक्ती, स्त्रीयांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, आरोग्य, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, प्रदूषण (पर्यावरणाचा प्रश्न), व्यसनाधिनता आदी विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांसाठी जागृतीचे विशेष काम करीत असतात.

पथनट्यातील कलाकारांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयाबरोबर उभ्या असणाऱ्या अथवा येणाऱ्या-जाणाऱ्या प्रेक्षकांना एका जागी थांबवून प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आकर्षक आणि चटकदार संवादातून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे? यासाठीच त्या कलाकारांचा सगळा प्रयत्न असतो. अभिनयाचा हा एक उत्तम मार्गही आहे. पथनाट्य सादर करताना कोणत्याही प्रकारची वेशभूषा करता संवाद करावे लागते. खरं तर समाज प्रबोधनाचे उत्कृष्ट साधन म्हणून पथनाट्याकडे पाहावे लागले. समाजाशी निगडित विषयाचे सादरीकरण करताना उत्तम कलेतून योग्य तो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

‌‘पथनाट्य' हे कलाकारांच्या जडणघडणीस साहाय्यभूत आणि जनतेच्या मनाला थेट भिडणारे प्रभावी असे प्रबोधनाचे साधन आहे. सामाजिक भान देणाऱ्या, प्रश्न मांडणाऱ्या लोक चळवळीचे ‌‘पथनाट्य' हे प्रभावी अस्त्र आहे. पथनाट्यामध्ये गायन, नृत्य, संगीत असा मिलाफ असतो. शाळा-महाविद्यालयातून एक उत्तम उपक्रम म्हणून पथनाट्याला महत्त्व दिले जाते. सामाजिक भान देणारे, वैचारिक भूमिका घेणारे नाट्य त्यामध्ये असते. गर्दीच्या ठिकाणी, बाजारात, बसस्थानकावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, चौकांमध्ये, किंबहुना गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, महानगर पालिकेच्या विशिष्ट कार्यक्रमांमध्ये हे नाट्य सादर केले जाते.

थोडक्यात काय तर अनिष्ट गोष्टींचे भान देणारा आणि उत्तमतेचे कौतुक करणारा कलाप्रकार आहे. तो निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही. ही केवळ कलेसाठी कला नव्हे, तर प्रबोधनासाठी ही कला उपयोगात आणली जाते. राज्यशासनही विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कलाकारांची मदत घेत असते. प्रौढ साक्षरता, स्त्री-पुरुष समानता, प्लास्टिक बंदी आदी विषयांवर पथनाट्य करुन घेतली जातात. पथनाट्य हे थेट लोकांपर्यंत पोहोचते.

सामाजिक आशय भाषणातून पोहोचवण्यापेक्षा, नाट्यातून दाखवला तर तो लोकांना जास्त प्रभावीपणे भिडतो, पटतो आणि रुचतोही. म्हणूनच पथनाट्याचे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही.

इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगितल्याशिवाय सदर माहितीस परिपूर्णता येणार नाही. ती गोष्ट अशी, ‌‘या माध्यमाचा प्रभावी वापर ‌‘जन नाट्य मंच'च्या माध्यमातून सफदर हाश्मी यांनी केला. पथनाट्यांचे जवळपास चार हजार प्रयोग त्यांनी केले. त्यांचेच ‌‘हल्ला बोल' हे पथनाट्य जनमानसावर प्रचंड प्रभाव करणारे होते. 1980 च्या दशकात त्याचा एक प्रयोग दिल्लीतील एका रस्त्यावर सुरू असताना काही लोकांनी सफदर हाश्मी यांची हत्या केली होती. चळवळीचे हे माध्यम इतके प्रभावी आहे की, लोकांनी त्यासाठी रक्त सांडल्याचे उदाहरण इतिहासात नोंदवले गेले. आजही सफदर हाश्मी यांचे नाव कला प्रांतात अभिमानाने घेतले जाते.'

अशी पथनाट्यात्मक कला विद्यार्थ्यांनी जोपासल्यास अभिनय, संवाद आणि धिटपणा प्रगल्भ होईल. हे नसे थोडके.

‌‘चला आपल्या कलेतून राष्ट्रभक्ती घडवू या...

अभिनय विश्वामध्ये आता उत्तम ठसा उमटवू या'

- विजय मराठे, प्रध्यापक,

सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे