पुण्यात कोथरूडमध्ये रेवा नावाची एक मुलगी राहायची. तिचा स्वभाव खूप बोलका होता. तिला मेकअपची खूप आवड होती. उन्हाळी सुट्टी नुकतीच संपली होती. ती दुसरीत गेली होती. शाळेचा दुसरा दिवस होता.
रेवाला उशीर झाला, दारात बस उभी होती. रेवा आईला म्हणाली, ‘अग, त्या बसला जरा थांबायला सांग. ही लिपस्टिक पण संपत आली आहे.' ‘खरं तर तुझं मेकअपचं साहित्य टाकून दिलं पाहिजे', आई रागात म्हणाली.
तेवढ्यात बसचा हॉर्न वाजायला लागला. पीप पीप, पीप पीप. रेवा पाय आपटत बसमध्ये चढली आणि तिची मैत्रीण मृदुला जवळ जाऊन बसली. रेवाचा रुसलेला चेहरा पाहून मृदुला म्हणाली, ‘काय गं रेवा काय झालं रुसायला, एक तर रोज उशिरा येतेस वर किती ते चेहऱ्याला लावून येतेस. ‘वा, आता तू पण मेकअप वरून बोल मला. जाऊ दे मी पुढच्या जन्मी मेकअपच्या जगात जन्म घेईन. मेकअपच जग कुठे मिळणार तुला?', मृदुलाने विचारला. ‘अगं ते सूर्यापासून खूप लांब आहे तिथे सूर्याचा प्रकाश पडत नाही.' मृदुलाने हसतहसत विचारले, ‘तिथेच का बरं?' रेवा म्हणाली, ‘कारण तिथे सूर्याचा प्रकाश येणार नाही आणि त्या हानिकारक प्रकाशामुळे माझा चेहरा खराब होणार नाही म्हणून.' मृदुलाला हसू आवरेनासं झालं.
शाळा सुटल्यावर परत दोघी शेजारीशेजारी बसल्या. रेवाच्या कल्पनेतलं मेकअपचं जग कसं आहे हे बघण्यासाठी मृदुलाने रेवाला विचारलं, ‘ए रेवा, तुझ्या मनातलं मेकअपचे जग मला पण सांग ना. आवडलं तर पुढच्या जन्मी मी पण तिथेच जन्म घेईन.' रेवाला आनंद झाला तिने उत्साहाने सांगायला सुरुवात केली.
‘मी तुला मेकअपच जग नको, शाळा सांगते जग संपायला वर्ष जाईल शाळा कशी घरी जाईस्तोवर संपेल.'
मेकअपची शाळा असती तर किती मज्जा आली असती ना. शाळेच्या बसमधे पुढच्या सीटच्या मागे आरसा असावा म्हणजे बसल्याजागी मेकअप. बागेमध्ये एक कप्पा मेकअप बॉक्सनेच भरावा. शाळेत गेल्यावर मेकअपची प्रार्थना घ्यावी. पुस्तकांवर शाळेची नाव नसून मेकअपचे चित्र असावे. इंग्लिश विषयात मेकअपचे प्रकार शिकवावे. गणितात मेकअपचा पाढा, मेकअप एके मेकअप, मेकअप दुने लिपस्टिक, मेकप त्रिक पावडर असं काहीसं. विज्ञान विषयामध्ये मेकअपचे गुण सांगावेत, अवगुण नाही आणि इतिहासामध्ये मेकअपचा शोध कोणी लावला याच्याबद्दल माहिती. आणि हो फळ्यावर लिपस्टिकने लिहावं. व्हाईट बोर्डवर आय लाइनरने लिहावं. रिसेसमध्ये डब्यातसुद्धा मेकअपसारखं रंगीबेरंगी जेवण असावं. शाळेचे युनिफॉर्मसुद्धा रंगीबेरंगी असावं. नंतर गाण्याचा तास असावा, त्यात मस्त मेकअपची गाणी असावीत. शाळेतून येताना मेकअप नीट राहिलाय का हे बघत बसावं.
मेकअपच्या शाळेत रमलेल्या रेवाला उठवत ड्रायव्हर काका म्हणाले, ‘अगं ए, रेवा राहिलाय तुझा मेकअप नीट अजून आणि लक्षात ठेवा मेकअप जास्त करू नका नाहीतर लहानपणी चेहरा चांगला दिसावा म्हणून मेकअप कराल आणि मोठेपणी मेकअप करून घाण झालेला चेहरा लपविण्यासाठी मेकअप करायला लागेल.'
या वाक्यावरून सर्व मुलं रेवाला चिडवू लागली व रेवा परत रूसवा चेहरा घेऊन घरी परतली.
- मुदृला जाधव